पालघर : ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मुंबई) यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असणारे पालघर येथील आरोग्य पथकाची असणारी इमारत धोकादायक ठरल्याने त्या इमारतीचे पाडकाम हाती घेण्यात आली असून त्या जागी १०० खाटांचे अद्ययावत शासकीय रुग्णालय उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या वर्षाभरात या नवीन रुग्णालयाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अभ्यासक्रमातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात रुग्णसेवा करण्याचा अनुभव मिळावा या उद्देशाने आरोग्य पथकाची निर्मिती करण्यात आली होती. १९४८ साली पालघर येथे उभारण्यात आलेल्या कै.सौ. रमाबाई दांडेकर प्रसुतीगृह व बाल संगोपन केंद्रामध्ये प्रसुती व दंत चिकित्सा करण्यासाठी व्यवस्था होती. याखेरीज सर जे.जी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी परिसरातील उपकेंद्रांमधून नागरिकांना वैद्यकीय सेवा देत असत. १९४८ साली बांधलेली इमारत जीर्ण व धोकादायक झाल्याने या ठिकाणी कार्यरत असणारे आरोग्य पथक या संस्थेच्या अन्य आस्थापनेत सन २०२२- २३ दरम्यान हलवण्यात आले.

जुन्या प्रसुतीगृहाच्या ठिकाणी तळमजल्यासह चार मजल्यांचे अद्ययावत १०० खाटांचे रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तर्फे राज्य शासनाला सादर करण्यात आला. या २८.७० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मार्च २०२४ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर बांधकामाकरिता २१.४२ कोटी रुपयांची तांत्रिक मान्यता सप्टेंबर २०२४ तर विद्युत कामासाठीची ३.१८ कोटीं रुपयांची तांत्रिक मान्यता डिसेंबर २०२४ मध्ये देण्यात आली आहे.

प्रस्तावित रुग्णालयाच्या तळमजल्यावर बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी), कॅज्युअल्टी व स्वागत कक्ष (रिसेप्शन) राहणार असून पहिल्या मजल्यावर प्रसूती, दुसऱ्या मजल्यावर पुरुष, महिला व बालकांसाठी स्वतंत्र वॉर्ड, तिसरा मजल्यावर अतिदक्षता विभाग, प्रयोगशाळा व औषधालय तर चौथ्या मजल्यावर प्रशिक्षणाची सोय व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. एकंदर ७०२२ चौरस मीटर क्षेत्रफळ असणारे हे रुग्णालय ऑक्टोबर २०२६ मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ऑक्टोबर २०२५ मध्ये जुन्या वास्तूच्या तोडकम करून नवीन वास्तू उभारण्यासाठी कार्यादेश देण्यात आले आहेत.

दरम्यान या रुग्णालयाच्या उभारणीचे काम वेगवेगळ्या कारणांमुळे प्रलंबित राहिले होते. प्रत्यक्षात जुन्या वास्तू मधील लाकडी दरवाजे खिडक्या काढण्याचे काम सुरू झाले असून लवकरच धोकादायक झालेली वास्तू पाडून त्या ठिकाणी नवीन बांधकाम करण्यास आरंभ करण्यात येईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या नवीन वास्तूसाठी सुमारे १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. यामुळे पालघर शहरांच्या बाहेर नंडोरे येथे २०० घाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय (सिविल) उभारले जात असताना पालघर शहरात १०० घाटांचे नवीन रुग्णालय रुग्णांच्या उपचारासाठी व प्रसूतीसाठी उपलब्ध होणार आहे.

नवीन रुग्णालयातील सुविधा.

जुन्या असणाऱ्या आरोग्य पथका च्या रुग्णालयात १६ खाटांची व्यवस्था कार्यरत होती. नव्याने उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयात प्रसुती, सर्जरी व मेडिसिन करिता प्रत्येकी ३० खाटा व गंभीर रुग्णांसाठी आयसीयूच्य १० खाटांची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.