पालघर : वाढवण बंदरा च्या उभारणी संदर्भातील कामाला आरंभ झाला असून या ठिकाणी स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी गेलेल्या भाजपाचे आमदार, जिल्हाध्यक्ष सह कार्यकर्त्यांना प्रवेशद्वारावर रोखून ठेवण्यात आले होते. या संदर्भात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार हरिश्चंद्र भोये यांनी मुद्दा उपस्थित केला असता पालकमंत्री गणेश नाईक यांनी खडे बोल सुनावले. त्यांनी स्थानिक व अतिक्रमण केल्याबद्दलच्या वक्तव्यां मुळे भाजपाचे अंतर्गत राजकारण पेटले आहे.
२ फेब्रुवारी रोजी वाणगाव येथील आयटीडी सिमेंटेशन इंडिया लिमिटेड (ITD cementation (CEM INDIA) या वाढवण बंदरा शी संदर्भात काम करणाऱ्या कंपनीमध्ये स्थानिकांना काम मिळावे यासाठी भाजपा प्रणित ट्रान्सपोर्ट युनियनच्या प्रतिनिधींनी कंपनीला निवेदन देण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत भाजपाचे आमदार हरिश्चंद्र भोये व जिल्हाध्यक्ष भरत राजपूत देखील होते. याप्रसंगी त्यांना प्रवेशद्वारावर रोखून ठेवण्यात आल्यानंतर जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.
४ फेब्रुवारी रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार हरिश्चंद्र भोये यांनी ही बाब सभागृहात मांडताना मद्य प्राशन केलेल्या कंपनीच्या कामगारांनी आपल्या गेट वर रोखले व सोबतच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. फाटक बंद करून प्रवेश नाकारल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर उत्तर देताना पालकमंत्री गणेश नाईक यांनी डहाणू, पालघर हे आपल्या मतदारसंघात येत आहे का? असा प्रति सवाल करत आपण आमदार राजेंद्र गावित यांच्या मतदारसंघात अतिक्रमण का केले असे सभागृहासमोर विचारले. तसेच कोणत्याही आमदाराने आपल्या क्षेत्राबाहेर जाताना स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना कल्पना देणे आवश्यक असल्याच्या काना-पिचक्या दिल्या. तसेच या प्रकल्पाविषयी काही म्हणणे असल्यास माझ्याकडे निवेदन द्या असे सांगून विषय बंद केला होता.
या दोन्ही घटनांमध्ये स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला. पालकमंत्री विरुद्ध स्थानिक भाजपा नेते असा आरंभी पासून सुरू असलेला अंतर्गत वाद उफळून येण्याचे चिन्ह दिसू लागले आहे. हा वाद चिघळण्याची शक्यता पाहता वरिष्ठ पातळीवरून हस्ताक्षेप करण्यासाठी प्रयत्न झाल्याचे देखील खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले.
अखेर या घडामोडी संदर्भात चक्र फिरल्यानंतर ५ फेब्रुवारी २०२६ रोजी पालघर च्या जिल्हाधिकारी यांच्या दालनात जेएनपीए चे चेअरमन गौरव दयाळ, सल्लागार राजीव सिन्हा, उपाध्यक्ष रवीश कुमार सिंह यांनी जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्या समक्ष बैठक घेतली. याप्रसंगी विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये, पालघरचे आमदार राजेंद्र गावित, भाजप पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, डहाणू उपनगराध्यक्ष जगदीश राजपूत आदी मंडळी उपस्थित होती. स्थानिकांना रोजगार देण्यासंदर्भात आयटीडी कंपनीला दिलेल्या निवेदना ची दखल घेऊन तसेच स्थानिकांच्या रोजगार, स्थानिकांचा विकास, जमीन अधिग्रहण, मच्छीमारांच्या समस्या या विषया बाबत विस्तृत आणी सकारात्मक चर्चा झाली असे या बैठकीला उपस्थित सूत्रांकडून सांगण्यात आले.
जेएनपीए जे अध्यक्ष गौरव दयाळ यांनी उपस्थित त्यांना आश्वस्त केले की या प्रकल्पात कुणाची ही एकाधिकारशाही चालणार नाही व स्थानिकांना सोबत घेऊन कुणाच्याही हक्कावर गदा येऊ देणार नाही असे आश्वासित केले.
बंदर उभारणीच्या पूर्वीच्या सत्रादरम्यान काही विशिष्ट लोकांनी निर्माण केलेले चित्र आपल्या कार्यकाळात बदलले असून सर्वांचा सर्व समावेशक विकास कसा करता येईल. स्थानिकांकडून प्राप्त होणाऱ्या सूचनांचा विचार करून तात्काळ अंमलबजावणी करू असे आम्हाला जेएनपीए कडून आश्वासन देण्यात आले. – भरत राजपूत, जिल्हाध्यक्ष भाजपा.
आयटीडी कंपनी व्यवस्थापन तसेच पालकमंत्री यांच्या वर्तनामुळे स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली. भरत राजपूत हे भाजपा जिल्हाध्यक्ष असताना नगरपरिषदेच्या निवडणुकीत हार झाल्यानंतर त्यांची पत घसरली का? वाढवण बंदराच्या जन सुनावणीला पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून जव्हार, मोखाड्याची नागरिक भाजप कार्यकर्त्यांनी आणले होते, तेव्हा “स्थानिक” मंडळींची व्याख्या वेगळी होती का? तसेच या बंदरामुळे संपूर्ण जिल्ह्यामधील नागरिक बाधित होत असताना मतदारसंघ निहाय हद्दी निश्चित होणार आहेत का? अशा प्रकारचे संदेश वरिष्ठान पर्यंत पोहोचवण्यात आले.
