बोईसर : बेटेगाव महागाव रस्त्यावरून पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पसार झालेल्या सराईत चोरास जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. बोईसर पोलीस ठाणे अंतर्गत रस्त्यांवरून चालणाऱ्या महिलांकडील सोन्याचे दागिने लंपास करण्याच्या घटनांमध्ये सध्या वाढ होताना दिसत आहे. संगीता संजय गोलीम ही महिला २२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास बेटेगाव महागाव रस्त्यावरून पायी घरी जात होती. त्याच वेळेस दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने महिलेच्या गळ्यातील दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून पोबारा केला. याप्रकरणी महिलेने बोईसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

बेटेगाव महागाव या वर्दळीच्या रस्त्यावर घडलेल्या मंगळसूत्र चोरीच्या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक यतीस देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी बोईसर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार प्रदीप बॅनर्जी याला २६ सप्टेंबर रोजी यादव नगर येथून ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी आरोपी विरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे.

आरोपीकडून दोन ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र देखील जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव राठोड हे करीत आहेत. पोलीस अधीक्षक यतीस देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गोरखनाथ राठोड, संदीप सूर्यवंशी, कैलास पाटील, संजय धांगडा, कल्याण केंगार, प्रशांत निकम, वैभव जामदार यांच्या पथकाने सराईत आरोपीस अटक करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.