बोईसर : वाढते नागरिकरण आणि उद्योगधंद्यांतून होणाऱ्या जल व वायू प्रदूषणामुळे शहरी व निमशहरी भागातील हरीत क्षेत्र झपाट्याने कमी होत असून प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. शहरांनजीक हरित पट्टा कायम टिकून राहून प्रदूषण कमी व्हावे याकरिता डहाणू वनविभागातर्फे अटल आनंदवन घनवनाची ( मियावाकी पार्क) निर्मिती करण्यात आली आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्र आणि बोईसर जवळ सुमारे तीन हेक्टर जागेवर डहाणू वनविभागातर्फे अटल आनंदवन घनवन साकारले जात असून यामुळे भविष्यात हरित क्षेत्र टिकून राहण्यास मदत होणार आहे.
तारापूर बोईसर औद्योगिक वसाहती जवळील दांडीपाडा, यादव नगर, धनानी नगर,गणेश नगर, सालवड शिवाजी नगर, कोलवडे, सरावली, खैरेपाडा,बेटेगाव,मान वारंगडे या भागात गेल्या काही वर्षात मोठ्या संख्येने बांधकामे उभी राहिली आहेत. बांधकामांसाठी बेसुमार वृक्षतोड करण्यात आली असून मोठ्या क्षेत्रावरील हरितपट्टा नामशेष झाला आहे. औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांमधून होणाऱ्या प्रदूषणामुळे वायू गुणवत्ता निर्देशांक देखील मानवी आरोग्यकारिता धोकादायक पातळीवर पोचला आहे. शहरी क्षेत्रा जवळील हिरवाई कायम राखण्याच्या संकल्पनेतून वनविभागातर्फे अटल आनंदवन घनवनाची (मियावाकी पार्क) निर्मिती करण्यात येत आहे. यामध्ये कमीत कमी जागेत जास्तीत जास्त रोपांची लागवड करून चार ते पाच वर्षात घनदाट जंगल तयार तयार करण्यात येते.
बोईसर वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत शिगाव खुताड येथे एक हेक्टर आणि दांडी पाडा येथे दोन हेक्टर ओसाड वन क्षेत्रावर पंतप्रधान खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत अटल आनंदवन घनवनाची निर्मिती करण्यात आली आहे. एकूण तीन हेक्टर जमिनीवर ९० हजार रोपांची लागवड करण्यात आली असून दोन ते तीन वर्षात या ठिकाणी घनदाट जंगल निर्माण होणार आहे. घनवनामध्ये २५ ते ३० विविध देशी प्रजातीमधील रोपांची लागवड करण्यात आली आहे. अटल आनंदवन घनवन हे कमीत कमी कालावधीत तयार होणारे वन असल्यामुळे वनस्पती, विविध प्रकारचे प्राणी, पशुपक्षी, फुलपाखरे, कीटक यांच्यासाठी नैसर्गिक अधिवास निर्माण होईल. त्याचप्रमाणे परिसरातील विद्यार्थी आणि नागरिकांना जैवविविधता अभ्यास, विरंगुळा व भ्रमण करण्यासाठी या घनवनाचा उपयोग होऊ शकणार आहे.
अटल घनवनामध्ये या झाडांचा समावेश :
कदंब,खैर, काटेरी बांबू, जांभूळ, शेवगा, शिरस, फणस, वड, पिंपळ, रक्तचंदन, कांचन, आवळा, कडुलिंब, बेल, सप्तपर्णी, काजू, सागर गोटा, मोह, सिताफळ, पेरू, शिसव, काशीद, शमी, चिंच, करंज, सीता अशोक, उंबर, बेहडा
अटल घनवनाचा उद्देश :
शहरी भागातील जागेची कमतरता विचारात घेऊन छोट्या छोट्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे, रोपवनास जैविक पदार्थ, सेंद्रिय खत, पाणी अशा पूरक संसाधनाची जोड देऊन कमीत कमी कालावधीत रोपांची जलद वाढ साधणे, जिवंत रोपांची टक्केवारी जास्तीत जास्त राखणे, शहरी भागात वृक्षराजी वाढवून प्रदूषण नियंत्रित ठेवणे, नैसर्गिक जैवविविधता वाढविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
