बोईसर : पालघर जिल्ह्यातील विराज प्रोफाइल या स्टील उद्योगाच्या नियोजित विस्तारीकरण प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिकांनी भर उन्हात जन आक्रोश मोर्चा काढला. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आठ एप्रिल रोजी होणारी पर्यावरण मंजुरीसाठीची जन सुनावणी रद्द करण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चामध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले होते. आंदोलकांनी विराज कंपनी विरोधात जोरदार घोषणाबाजी करून बोईसर चिल्हार रस्त्यावरील वाहतूक काही वेळ रोखून धरली. मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नाही यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
विराज प्रोफाइल एसआरएम उद्योगाच्या विस्तारीकरणा विरोधात शनिवारी मान ग्रामपंचायत ते विराज प्रोफाइल कंपनीचे हाथी गेटपर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चामध्ये सामील झालेल्या नागरिकांनी बोईसर चिल्हार मार्ग काही वेळ रोखून धरल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
मोर्चामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे, मनसेचे जिल्हाप्रमुख समीर मोरे, भावेश चुरी, बहुजन विकास आघाडीचे प्रशांत पाटील, कुणबी सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, p डेरिल डिमेलो, आरपीआयचे सचिन लोखंडे, भाजपचे महेंद्र भोणे, अंकुर राऊत, आदिवासी एकता परिषदेच्या नीता काटकर, उलगुलान ब्रिगेडचे अशोक शिंगाडा, सरपंच अंजली भावर, राहुल पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक महिला पुरुष सहभागी झाले होते.
तारापूर औद्योगिक क्षेत्राजवळील मान वारंगडे ग्रामपंचायत हद्दीत १०५ एकर जमिनीवर विराज प्रोफाइल एसआरएम या उद्योगाचे विस्तारीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर-२ कार्यालयामार्फत ८ एप्रिल रोजी पर्यावरणीय मंजुरीसाठी कंपनीच्या हाथी गेट परिसरात जन सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. मात्र या जन सुनावणीला परिसरातील स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. मान वारांगडे ग्रामपंचायत ही पेसा ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेची परवानगी न घेता एकतर्फी आणि जबरदस्तीने जन सुनावणी आयोजित आल्याचा आरोप स्थानिक संघर्ष समितीने केला आहे.
मान वारांगडे ग्रामपंचायतीच्या २४ मार्च रोजी पार पडलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी एकमताने विराज प्रोफाइल उद्योगाच्या नियोजित विस्तारीकरण प्रकल्पाविरोधात ठराव मंजूर केला आहे. विराज प्रोफाइल उद्योगाच्या विस्तारीकरण प्रकल्पामुळे स्थानिक आदिवासी कुटुंबे विस्थापित होऊन देशोधडीला लागणार असून परिसरातील नागरिकांना जल आणि वायू प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागणार असल्याची भीती व्यक्त केली. विराज प्रोफाइल या सध्याच्या अस्तित्वातील प्रकल्पामुळे मान वारंगडे परिसरातील नैसर्गिक नाले, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आणि शेत जमिनी प्रदूषित झाल्या असून आठ एप्रिल रोजी होणारी जन सुनावणी रद्द करण्याची मागणी मोर्चामध्ये प्रामुख्याने करण्यात आली. मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
विराज प्रोफाइल उद्योगविरोधातील प्रमुख आक्षेप :
१. पेसा कायद्याचे उल्लंघन करून बेकायदेशीर पद्धतीने कंपनीच्याच आवारात आयोजन केलेली जनसुनावणी रद्द करण्यात यावी.
२. ग्रामपंचायत, मान च्या ग्रामसभेने दि. २४ मार्च २०२६ रोजी ह्या कंपनीच्या विस्तारीकरणाला एकमताने ठराव मंजूर करून विरोध केला आहे, ह्या ठरावाचा सन्मान व्हावा व हा प्रकल्पाला परवानगी देऊ नये.
३. विराज कंपनीचे मान येथे सुरू असलेले कारखाने प्रदूषण विषयक तसेच अन्य कोणत्याही कायद्यांचे पालन करीत नसल्याने व ह्या कंपनीमुळेच आजूबाजूच्या गावांना विस्थापित होण्याचा धोका असल्याने विराज कंपनी मान गावातून हद्दपार करण्यात यावी.
