पालघर :बोर्डी परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून बिबट्याच्या भीतीपोटी चिकूवाडी मध्ये चिकूचे फळ वेचण्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे चिकू उत्पादनावर परिणाम झाला आहे. शिवाय बोर्डी भागात नर-मादी बिबट्यासह दोन बछडे परिसरात वास्तव्य करत असल्याचे पंजाच्या ठप्प्सावरून माहिती पुढे आली आहे.

बोर्डी येथील वहिंद्र खाडी परिसरात एका बिबट्याचा वावर गेल्या आठ महिन्यांपासून आढळून आला आहे. गेल्या महिन्याभरात या बिबट्याने मानवी वस्तीमध्ये दिवसा शिरकाव केल्याचे दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान या बिबट्या सोबत एक मादी दोन बछडे परिसरात असल्याचे नागरिकांनी तसेच चिकू बागायती मधील कर्मचाऱ्यांच्या दाखल्यावरून तसेच त्यांच्या पायाच्या ठसा वरून निश्चित झाले आहेत. बिबट्याने परिसरातील गाईचे बछडे, डुक्कर व कुत्रे खाल्ल्याचे देखील आढळून आले आहे.

वन विभागाने या बछड्यावर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. त्याच्या मधील छायाचित्रित झालेल्या माहितीवरून बिबट्या बोर्डी पासून २० किलोमीटर परिसरात प्रवास करत असल्याचे दिसून आले होते, मात्र मादी व बछडे हे ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये आढळले नसल्याचे सांगण्यात येते.

बोर्डी परिसरात १५०० ते २००० एकर क्षेत्रफळावर चिकू लागवड असून चिकूचे हंगाम सुरू झाले आहे. अनेक चिकू बागांमध्ये झाडे उंच व घनदाट झाली असल्याने त्या ठिकाणी बिबट्याला वास्तव्य करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय या परिसरात बिबट्याचा वावर अनेक नागरिकांनी स्वतः पाहिल्याने बागायत कामगार कामावर यायला तयार नसल्याने चिकूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले असून बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

जंगलातील वनवे बिबट्याच्या स्थलांतराला कारणीभूत

जंगलातील वनवे रोखण्यासाठी वनविभाग अनेक उपाययोजना आखत असल्यातरीही अवैद्य शिकारी करणारी मंडळी तसेच लाकूड चोरी करण्याच्या उद्देशाने जंगलात वनवे पेटवण्याचे अजूनही सुरू आहे. गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये बोर्डी परिसरातील डोंगरामध्ये अनेकदा वनवे पेटल्याचे प्रकार घडले होते. यामुळे जंगलातील तृण नष्ट झाल्याने त्यावर अवलंबून असणारे ससे, रानडुक्कर, भेकर ही जंगलापासून समुद्रकिनाऱ्याजवळ असणाऱ्या मानवी वस्तीमध्ये व कृषी क्षेत्रामध्ये सरकल्याचे दिसून आले होते. बिबट्याला जंगलामध्ये पुरेशा प्रमाणात खाद्य मिळत नसल्याने तसेच डोंगरापासून किनारा दरम्यानच्या भागांमध्ये तृणभक्षी जनावर स्थलांतरित झाल्याने त्यांच्या पाठोपाठ मांसभक्षी असणारे बिबट्या हे पालघर जिल्ह्याच्या किनारी भागात सहजपणे वावरू लागल्याचे वनजीव अभ्यासक सूर्यहास चौधरी यांनी मत व्यक्त केले आहे. बोर्डी व डहाणू तालुक्याच्या वेगवेगळ्या भागात गावठी कुत्रे, गावठी डुकरे, ओसाड गुरांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना भक्ष केल्याच्या अनेक उदाहरणे असल्याचे त्यांनी लोकसत्ता शी बोलताना सांगितले. किनारा भागात सहजगत मिळणाऱ्या खाद्यामुळे तृण भक्षी जनावरा सोबत बिबट्या स्थिरावल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.

जंगलामध्ये जनावरांची अन्नसाखळी पुनरस्थापित करणे गरजेचे
पालघर जिल्ह्यात असणाऱ्या डोंगर रांगांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे पेटवले जाणारे वनवे रोखण्यासाठी वन विभागातर्फे अनेक उपाययोजना केल्या असल्या तरी त्यांची प्रभावी अंमलबजवणी करणे तसेच वनवे पेटवण्याऱ्याच्या विरुद्ध कारवाई करणे आवश्यक झाले आहे. त्याचप्रमाणे जंगल भागातून अनेक राष्ट्रीय प्रकल्प उभारले जात असताना वन प्राण्यांसाठी विशेष कॉरिडोर उभारणे व जंगल परिसरातील मानवी हस्तक्षेप रोखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. जंगलामधील जनावरांसाठी अन्नसाखळी पुनर स्थापित करणे आवश्यक झाले असून मानवी वस्ती परिसरात जंगली प्राण्यांना सहजगत मिळणारे खाद्य पाणी व या परिसरात असणारी घनदाट झाडी या परिसरातून त्यांना पुन्हा जंगलात सरकवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवणे आवश्यक झाले आहे.

बिबट्याचा वावर
सद्यस्थितीत बोर्डी व वहिंद्र पुलाच्या परिसरात नर व मादी बिबट्यासह दोन बछडे, गुजरातच्या सीमालगत भागात एक बिबट्या, चिखला परिसरात दोन बिबटे, धाकटी डहाणू परिसरातील खाजण परिसरात एक बिबट्या, बोईसर परिसरात दोन बिबटे व सफाळे परिसरात एक बिबट्या यांचे अस्तित्व असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान गेल्या महिन्यात चिखला येथे वन विभागाने बिबट्यासाठी लावलेल्या सापळ्या लगत काही शिकाऱ्यांनी लावलेल्या फासामध्ये अडकून एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. शिकारी करणाऱ्या मंडळींनी वन विभागाला कोणत्याही प्रकारची माहिती न देता मृत बिबट्याच्या मौल्यवान अवयवांची तस्करी केली असून वन विभागाने या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे.

पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये अनेक बिबट्यांचा वावर असून त्याला सहजगत तृण भक्षी जनावरांची उपलब्धता असल्याने अजूनही बिबट्याने परिसरात लहान मुले, विद्यार्थी अथवा मानवी वस्तीमध्ये हल्ला केला नाही. मानव हे बिबट्याचे खाद्य नसले तरीही नागरिकांमध्ये भय कायम आहे. डोंगरातील वनवे पेटण्याचे रोखणे आवश्यक झाले आहे. बिबट्याला जंगल परिसरात पुनर स्थापित करण्यासाठी जंगलातील अन्नसाखळी कायम करणे गरजेचे झाले आहे
-सूर्यहास चौधरी, वनजीव अभ्यासात बोर्डी