पालघर : पालघर जिल्ह्यातील बोर्डी या प्रसिद्ध पर्यटन गावामध्ये ग्रामपंचायतच्या पुढाकाराने कचरा विलगीकरण केंद्र व त्या अंतर्गत प्लास्टिक पुनर्वापर प्रकल्प प्रभावीपणे काम करत असून त्यामुळे या गावातील व किनाऱ्यावरील सौंदर्यामध्ये भर पडली आहे. या प्रक्रियेत गावकऱ्यांचा तसेच शालेय विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असून प्लास्टिक च्या पुनर्वापर करून कचरा पेट्या उभारणे तसेच विद्यार्थ्यांच्या मदतीने इको ब्रिक्स संकल्पना राबवण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्याच्या उत्तर सीमेच्या भागात असणाऱ्या बोर्डी या पर्यटनासाठी तसेच चिकू लागवडीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या गावांमध्ये १५ वित्त आयोग व इतर शासकीय योजनेतून कचरा विलगीकरण करण्यासाठी शेड उभारणी, पुनर्वापर प्रकल्प तसेच इन्सिनेटर यंत्र उभारण्यात आले आहे. गावातील मरवाड या भागात फेब्रुवारी महिन्यापासून हे केंद्र कार्यरत असून या केंद्राचा प्रभाव गावातील स्वच्छतेवर दिसून येऊ लागला आहे.
या प्रकल्पांतर्गत असणाऱ्या पुनर्वापर प्रकल्पातून गोळा होणाऱ्या प्लास्टिकच्या पाण्याच्या व इतर प्लास्टिक बाटल्या एकत्र करून त्याच्यामार्फत किनाऱ्यावर कचरा पेट्या तयार करण्यात आले असून यामुळे पर्यटकां मध्ये प्लास्टिकच्या पुनर वापराबद्दल जागृती निर्माण करणे तसेच कचरा उघडावर टाकण्यास प्रतिबंध होऊ लागला आहे. या प्रकल्पाला गावातील नागरिकांनी व तज्ञांचे मार्गदर्शन व सहभाग लाभला असून यामुळे पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास गावचे उपसरपंच सौमिल राऊत यांनी लोकसत्ता कडे व्यक्त केला.
लोकसभागातून कचऱ्याची विलगीकरण
बोर्डी गावात घंटागाडी द्वारे ओला व कचरा स्वतंत्रपणे गोळा केला जात असून मरवड येथील विलगीकरण केंद्रामध्ये ओल्या कचऱ्यापासून वर्मी कल्चर व कंपोस्टिंग पद्धतीने खत निर्मिती करण्यात येते. तर सुक्या कचऱ्याचे विलगीकरण करून कपडा, कागद, काच अशा गोष्टी पुनर्वापरासाठी पाठवण्यात येतात. प्लास्टिक चा देखील पुनर्वापर करण्याच्य दृष्टीने स्थानिक पातळीवर व इतर पद्धतीने वापर करण्यात येत असल्याची माहिती पुढे आली आहे.
विद्यार्थ्यांकडून इको ब्रिक्स ची निर्मिती
शालेय विद्यार्थ्यांना या प्रकल्पात सहभागी करून घेण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये रॅपर, व इतर प्लास्टिक पदार्थ गच्च कोंबून त्याद्वारे इको ब्रिक्स तयार करण्याचे विद्यार्थ्यांना उद्दिष्ट देण्यात आले होते. दहापेक्षा अधिक इको ब्रिक्स बनवणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टेनलेस स्टील बॉटल प्रोत्साहन पर भेट म्हणून देण्यात आली होती. या शाळेतील ६१ विद्यार्थ्यांनी १० पेक्षा अधिक इको ब्रिक्स तयार केले असून काही विद्यार्थ्यांनी प्रत्येकी ५० – ६० गोबिक केल्या ची माहिती प्राप्त झाली आहे.
स्मशानभूमी नूतनीकरण प्रकल्पाचे कौतुक
बोर्डी येथील ग्रामस्थांनी लोकसभागातून स्मशानभूमीचे नूतनीकरण तसेच सुशोभीकरण केले असून या स्मशानभूमीची पाहणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केली. पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी या स्पर्शभूमीचे मुक्तकंठाने कौतुक करत लोक सहभागातून सुंदर व्यवस्था उभारल्याबद्दल बोर्डी ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे कौतुक केले.
