सौर ऊर्जेचा वापर करून बनवतात नैसर्गिक व पौष्टिक खाद्य पदार्थ
पालघर : ग्रामीण भागातील शेतकरी व महिला बचत गट यांच्या गरजा लक्षात घेऊन विकसित केलेल्या सौरऊर्जा संचालित फळ, भाजीपाला प्रक्रिया प्रणालीला भारतीय पेटंट (एकस्व) मानांकन मिळवण्यात यश बोर्डी येथील महिला शेतकरी प्रस्थापित स्टार्ट-अप संस्थेला मिळाले आहे.
यामुळे चिकू सह विविध फळ, भाजीपाला, औषधी वनस्पती, मासे जलद गतीने सुकविण्या सोबत सुकवलेल्या वस्तूंची चव व दर्जा राखण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. याचा लाभ शेतकऱ्यांना, बागायतदारांना तसेच बचत गटांना होणार असून कमी दरामुळे किंवा वाहतुकीच्या समस्येमुळे वाया जाणाऱ्या कृषी मालाला थेट औद्योगिक उत्पादनासाठी प्रक्रिया करणे शक्य होणार आहे.
१९९३ च्या सुमारास अमृत माधुरी फळ प्रक्रिया केंद्राच्या माध्यमातून बोर्डी परिसरात नैसर्गिकरित्या चिकू सुकवून त्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार करण्याला आरंभ झाला. मात्र त्याकाळी फळ प्रक्रियेकरिता असणारी मर्यादा व उत्पादनांचे प्रमाणिकरण करणे शक्य झाले नाही. सन २०१६ सौर ऊर्जेवरील ट्रायलच्या माध्यमातून चिकू फळावर प्रक्रिया अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पारंपरिक पद्धतीने वर्षाला ५० ते ८० किलो चिकू सुखावणारे शेतकरी सौर ड्रायव्हरच्या माध्यमातून वार्षिक २५० -३०० किलो सुकवू शकले. मात्र उच्च आर्द्रता असणाऱ्या चिकू फळाच्या खालच्या थराचा ओलावा कायम राहणे अथवा चकत्या सौर ऊर्जा उपकरणाला चिकटून राहण्याचे प्रकार घडत असत. इतर फळ व भाजीपाला सुकवण्यासाठी देखील आर्द्रतेशी निगडित समस्या असल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकरी सौर ड्रायर प्रक्रिया उपकरणामध्ये सुधारणा करण्याच्या प्रतीक्षेत होते.
बोर्डी येथील महिला विदुला पाटील, हिमाली वर्तक व प्रियांका राऊत यांनी स्टार्ट-अपच्या “रुवान फूडटेक – ऑरा ग्रीन” कंपनीच्या माध्यमातून कोविड काळात सौरऊर्जा ड्रायर मध्ये पूर्वीच्या यंत्रांमधील अडचणी दूर करून सुधारणा करण्याच्या कामाला, तसेच किफायतशीर दराने यंत्र उपलब्ध होण्याच्या दृष्टीने संशोधन सुरू केले.
सूर्यप्रकाशातील ऊर्जा (concave lense) अंतर्वक्र भिंग च्या तत्त्वाचा आधार घेऊन सुकविण्यासाठी तयार केलेल्या विशिष्ट काहीशा खरबरीत मंचावर (प्लॅटफॉर्म) विकेंद्रीत करण्याचे विकसित केले. खास विकसित केलेल्या मंचामध्ये उष्णता राखून ठेवण्याची क्षमता विकसित करण्यात पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत ७५ टक्के तर यापूर्वी असणाऱ्या सौर ऊर्जा प्रक्रिया यंत्राच्या ३० टक्के वेळेची बचत करत उत्पादनाचा दर्जा व मूळ चव, फायबर राखत कृषी उत्पादने सुकवण्याचे काम करत आहे.
नैसर्गिक खाद्य उत्पादनांना शहरी भागात भरघोस मागणी आहे, परंतु ग्रामीण भागातील शेतकरी व महिलांना अन्न प्रक्रिया उद्योगाच्या नियमानुसार प्रक्रिया, मूल्यवर्धन व विपणन करणे कठीण ठरते. तसेच इतर प्रक्रिया प्रणालींची किंमत, विजेची उपलब्धता व खर्च या समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्व समस्यांवर मात करून विकसित केलेली ही प्रणाली गुजरात, उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील १०० हुन अधिक शेतकऱ्यांना हे सौर ऊर्जा डायर यंत्र वरदान ठरली आहे. पालघर व रायगड जिल्हा परिषदेने अशी ५० युनिट विकत घेतली असून किफायतशीर किमतीमध्ये उपलब्ध असणारे हे सौर ड्रायर देशभरात प्रचलित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
या प्रणालीमध्ये ५० हुन अधिक फळे, भाजी, पालेभाजी, औषधी वनस्पती, मासे इत्यादीवर यशस्वी प्रयोग करण्यात आले आहेत. तीन ते १२ तासात हा शेतमाल उत्तमरित्या सुकवून १२ महिन्यांपर्यंत साठवणुकीस (सेल्फ लाइफ) योग्य ठरत आहे. नैसर्गिक निर्जली करणाच्या तुलनेत ही पेटंटेड प्रक्रिया तिप्पट अधिक कार्यक्षम आहे.
या सौर ऊर्जा प्रक्रिया उपकरणांमध्ये तयार होणारी उत्पादने थेट सूप, आईस्क्रीम, व इतर खाद्यपदार्थाची संबंधित औद्योगिक क्षेत्रांमध्ये थेट वापरली जाऊ शकणार आहेत. तसेच वेगवेगळ्या कारणामुळे विक्री न होणाऱ्या, कमी दराने विक्री होणाऱ्या, अथवा वाया जाणाऱ्या भाजीपाला व फळां वर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करणे शक्य होणार आहे.
चिकू, सुकेळी उत्पदकांसाठी वरदान
चिकू फळ प्रक्रिया व विपणना मध्ये या पेटंटेड पद्धतीने बनविलेल्या चिकू चिप्स आणि पावडर ला भारतीय बाजारपेठेत विशेष मागणी निर्माण झाली आहे. आईसक्रीम, कुल्फी, मिठाई, मिल्क शेक अशा अनेक उद्योगांना हा चिकू उपयुक्त ठरत आहे. प्रक्रिया केलेल्या फळ भाजीपाल्याची गुणवत्ता, रंग व चव उत्कृष्ट राहते, पौष्टीक तत्वे व फायबर यांचे जतन होते व ग्राहकांना शुद्ध अन्न मिळते असे जेष्ठ प्रक्रिया उद्योजिका व या प्रणालीच्या पहिल्या लाभार्थी लतिका पाटील यांनी सांगितले.
थंडी व उन्हाळ्यात पालघर जिल्ह्यात शेकडो टन चिकू शेतावर पिकतो व वाया जातो, या चिकू वर प्रक्रिया करून येथील महिलांनी आर्थिक प्रगती साधली आहे. चिकू प्रमाणेच वसई येथील प्रसिद्ध “सुकेळी” वर केलेले प्रयोग देखील यशसवी यशस्वी झाले आहेत व स्वच्छ पद्धतीने ३-४ दिवसात सुकेळी निर्मिती साध्य झाली आहे.
सौर ड्राइवर मध्ये काय सुकविले जाणार..
आंबा, फणस, कोकम, सुपारी, अननस, द्राक्ष, चिकू, स्ट्रॉबेरी, पपई, केळी, अंजीर, संत्र, मोसंबी, रानफ़ळे, नारळ, अवाकाडो, सफरचंद, टोमॅटो, कांदा, आले, लसूण, बीटरूट, कारलं, भेंडी, वांगी, गाजर, मुळा, शेवग्याच्या-शेंगा, गवार, दुधी, पालक, तुळशी, मोरिंगा, कडीपत्ता, हळद, पुदिना, चहापत्ती, मेथी, पालेभाज्या, गुलाब, जास्वंदी व इतर फुलांच्या पाकळ्या इतर अनेक फळे भाज्या आणि आयुर्वेदिक वनस्पती, करंदी, सोडे, पापलेट, बांगडा व इतर अनेक सुक्के मासे अश्या अनेक खाद्य पदार्थांचे मूल्यवर्धन या प्रणालीने कार्यक्षम व सोपे झाले आहे.
ग्रामीण भागात होणारे हे शोध भारतीय शेतकऱ्यांसाठी एक चांगला जोड व्यवसाय निर्माण करतील व अर्थव्यवस्थेला पुढे नेण्यास मोठा हातभार लावतील असा विश्वास या पेटंटच्या सल्लागार प्राध्यापक डॉ. दीप्ती दुर्गेश पाटील यांनी दर्शविला आहे.
वैशिष्ट्ये
- शेतकऱ्यांच्या व ग्रामीण महिलांच्या उत्त्पन्नात चांगली वाढ
- शेतकरी बनवितात निर्यातीस योग्य १०० टक्के नैसर्गिक उत्पादने
- विजेची गरज नाही, वापरण्यास सोपे, देखभालीचा खर्च नाही
- पोषक घटक, रंग, चव आणि सुगंध जतन
- पदार्थ ३ ते १२ तासात हवेतसे सुकतात
- आयुर्वेदिक वनस्पतींसाठी सर्वोत्तम वापर,
- हॉटेल व औषेधे उद्योगाला पूरक सामग्री
