बोईसर : आदिवासी समाजाचे प्रेरणास्था बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यासाठी आदिवासी संघटनांमार्फत आयोजित कार्यक्रमांमध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला.
आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान क्रांतीसुर्य धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. पालघर, डहाणू, कासा, तलासरी, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, मनोर तसेच इतर अनेक गावांमध्ये बिरसा मुंडा यांचा पुतळा आणि प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
बिरसा मुंडा यांच्या १५० जयंतीनिमित्त मनोर येथील आदिवासी एकता परिषदेमार्फत महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम, वकृत्व स्पर्धा या कार्यक्रमांसोबतच भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेमध्ये सहभागी कलापथकांनी ढोल नाच, तारपा नाच, टिपरी नाच, गौरी नाच, सांगड या आदिवासी नृत्य प्रकारानी उपस्थित नागरिकांना मंत्रमुग्ध केले.जव्हार येथे युवा आदिवासी संघ यांच्यावतीने आदिवासी क्रांती चौक येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण आला.
बोईसर मध्ये रॅलीचे आयोजन
बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी एकता परिषदेतर्फे बोईसर शहरात रॅली काढण्यात आली. यारा लय मोठा संख्येने आदिवासी बांधवांनी पारंपारिक वेशभूषेत सहभाग नोंदवला. यावेळी सहभागी कार्यकर्त्यांनी आमची संस्कृती आमचा अभिमान अशा घोषणा देत आदिवासी संस्कृती आणि हक्कांच्या संरक्षणाचा संदेश दिला.
पालघर जिल्हा परिषदेत बिरसा मुंडा जयंती साजरी
पालघर जिल्हा परिषदेत आज जननायक बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती साधेपणाने आणि आदरपूर्वक साजरी करण्यात आली. तंत्रस्नेही शिक्षक तानाजी डावरे, आनंद अनेमवाड संगणक तज्ञ सतीश साबळे तसेच जिल्हा परिषदेचे इतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
