पालघर : जनगणना २०२७ ही भारताची १६ वी जनगणना असून यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे. या जनगणनेच्या घर यादी व घर गणना करण्याचा पहिला टप्पा १ मे ते १५ मे दरम्यान च्या कालावधीत संपन्न होणार असून नागरिकांनी उपलब्ध संकेतस्थळावर स्वगणना करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. जिल्ह्यात सुमारे २४.३० लाख नागरिक असून त्यापैकी ३० टक्के नागरिकाांनी स्वगणना नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १६ मे पासून सुरू होणाऱ्या घर गणना उपक्रमा दरम्यान प्रगणक स्वतः घरी जाऊन संकेतस्थळावर भरलेल्या माहितीची पडताळणी व माहिती न भरलेल्या कुटुंबांची माहिती संकेतस्थळावर भरणार आहेत. या कामी नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यक्रमात सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत आगामी जनगणना २०२७ संदर्भातील सविस्तर माहिती देण्यात आली. या वेळी उपजिल्हाधिकारी (सा. प्र) रणजीत देसाई, तहसीलदार नरेंद्र माने उपस्थित होते.
वसई विरार महानगरपालिका क्षेत्र वगळता उर्वरित पालघर ग्रामीण जिल्ह्यात सन २०११ मध्ये १८.४० लक्ष लोकसंख्या होती. सद्यस्थितीत ग्रामीण जिल्ह्याची लोकसंख्या २४.३० लक्ष असण्याचे अंदाजित असून या लोकसंख्येला ३४०१ घर यादी गटांमध्ये विभागण्यात आले आहे. जनगणनाच्या पहिल्या टप्प्यात पहिल्या टप्प्यात घर यादी व घर घटना तयार करणे कामी ३७१८ प्रगणक व ६३६ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
स्वगणना करताना आपल्या वास्तव्याच्या ठिकाणी योग्य प्रकारे ठिकाण/स्थान (लोकेशन) नोंदवून ते ३३ प्रश्नांद्वारे माहिती भरून स्वगणना आयडी निर्माण करणे व त्याची नोंद करणे अपेक्षित आहे. जनगणनेची नोंद व माहिती ही संपूर्णपणे गोपनीय राहणार असून ती तपासणीसाठी अथवा न्यायालयीन पुराव्यासाठी खुली राहणार नाही असे जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत दरम्यान स्पष्ट केले.
पालघर या आदिवासी बहुल जिल्ह्यात अधिक तर भाग ग्रामीण क्षेत्रातील असून अशा ठिकाणी स्वगणना करणे कुटुंबांना शक्य न झाल्यास या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रगणक घरोघरी जाऊन ही माहिती एचएलओ ॲप द्वारे संकेतस्थळावर भरणार आहेत. ज्या ठिकाणी कुटुंबातील स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे अशा ठिकाणी कुटुंब प्रमुख आले गृहभेटी दरम्यान आलेल्या प्रग्णकाला स्वगणना आयडी देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
१ मे रोजी लोकप्रतिनिधी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांना स्वगणना करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार असून जिल्ह्यात एकंदर २५ ते ३० टक्के नागरिकांची स्वगणना होईल या दृष्टीने तयारी जिल्हा प्रशासनाने केल्याचे सांगण्यात आले. या जन गणनेच्या दृष्टिकोनातून प्रगणक व पर्यावक्षक यांचे प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषद देण्यात आली. या जनगणने राहत्या घरांसह विविध संस्था व स्थलांतरित नागरिकांच्या नोंदी करण्याची तरतूद असून संकलित होणारी माहिती ही आगामी काळात निवडणूक यादी तयार करणे व विविध स्तरावरील नियोजनात उपयुक्त ठरेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
“अचूक माहिती देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. डिजिटल माध्यमातून पारदर्शक आणि जलद जनगणना पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. जनगणना २०२७ साठी पालघर जिल्हा प्रशासन सज्ज आहे.– डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी
1 देशातील ही १६ वी जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पडणार असून, मोबाईल अँप आणि CMMS पोर्टलच्या माध्यमातून दोन टप्प्यांत ही प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी सांगितले.
2 जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले की, यंदाची जनगणना पारंपरिक पद्धतीपासून एक पाऊल पुढे जात डिजिटल इंडियाच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. नागरिकांना स्वगणना (Self Enumeration) करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, https://se.census.gov.in या संकेतस्थळावरून घरबसल्या माहिती भरता येणार आहे.
3 पालघर जिल्ह्यातील ८ तालुके, ३ नगरपरिषद व ४ नगरपंचायती मिळून एकूण १५ चार्ज कार्यालयांमार्फत ही मोहीम राबवली जाणार आहे. सुमारे २४.३० लाख लोकसंख्येची माहिती गोळा करण्यासाठी ३७१८ प्रगणक आणि ६३६ पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी ३४०१ घरयादी गट तयार करण्यात आले आहेत.
4 टप्प्याटप्प्याने काटेकोर अंमलबजावणी जनगणना प्रक्रिया दोन प्रमुख टप्प्यांत पार पडणार आहे: पहिला टप्पा – घरयादी व घर गणना १ ते १५ मे दरम्यान नागरिकांना स्वगणनेची संधी देण्यात येणार आहे. स्वगणना पूर्ण केल्यानंतर नागरिकांनी प्राप्त झालेला SE ID प्रगणकाला देणे आवश्यक असेल.
5 १६ मे ते १४ जून दरम्यान प्रगणक घरभेटी देऊन ३३ मुद्द्यांवर माहिती संकलित करणार आहेत. यात घराची रचना, सुविधा, कुटुंबाची माहिती, जीवनशैली यांचा समावेश असेल.
दुसरा टप्पा – लोकसंख्या गणना: यानंतर प्रत्यक्ष व्यक्तींची सविस्तर माहिती संकलित केली जाणार आहे, ज्यामुळे अचूक व अद्ययावत लोकसंख्या डेटा उपलब्ध होणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. ही संपूर्ण प्रक्रिया सक्षमपणे पार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्यात आले आहे. मार्चपासून सुरू झालेल्या या प्रशिक्षणामध्ये चार्ज अधिकारी, फील्ड ट्रेनर, प्रगणक आणि पर्यवेक्षक यांचा समावेश असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी पुढे सांगितले.
