डहाणू: एकात्मिक आदिवासी विकास विभाग डहाणू प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सुमारे ३५ शासकीय आश्रमशाळांमधील २० हजार निवासी व अनिवासी विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच अपूर्ण पोषण आहार मिळत असल्याचे समोर आले आहे. शाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी विद्यार्थ्यांना भोजनात चपाती मिळत नसल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत असून पालकांकडून प्रश्न उपस्थित होत आहेत.

विद्यार्थ्यांना दर्जेदार व पौष्टिक आहार पुरवण्याच्या उद्देशाने कांबळगाव येथे मध्यवर्ती स्वयंपाकगृह (सेंट्रल किचन) योजना राबवली जात आहे. ‘सेफटॉप’ या ठेकेदाराच्या माध्यमातून विविध आश्रमशाळांना दैनंदिन भोजनाचा पुरवठा केला जातो. शासनाने निश्चित केलेल्या मेनुनुसार विद्यार्थ्यांच्या आहारात चपाती, भाजी, वरण-भात, सॅलड, लोणचे आणि इतर पोषक घटकांचा समावेश असणे बंधनकारक आहे. मात्र, मध्यवर्ती स्वयंपाकगृहातील चपाती बनवणारे स्वयंचलित यंत्र मागील तीन महिन्यांपासून तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले आहे.

प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत असले, तरी तीन महिन्यांचा मोठा कालावधी लोटूनही ही समस्या सुटू शकलेली नाही. विशेष म्हणजे, मशीन दुरुस्त होईपर्यंत विद्यार्थ्यांना चपाती देण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था उभारण्यात आलेली नाही. वाढत्या वयातील विद्यार्थ्यांना परिपूर्ण आहार न मिळाल्यास त्यांच्या शारीरिक वाढीवर आणि अभ्यासावरील एकाग्रतेवर विपरीत परिणाम होत असल्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांकडून दिला जात आहे. याशिवाय, मेनूतील इतर अन्नघटकांच्या पुरवठ्यातही अनेकवेळा अनियमितता होत असल्याच्या तक्रारी काही शिक्षक व पालकांकडून केल्या जात आहेत.

एकीकडे शासन आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कुपोषण निर्मूलनासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत असल्याचा दावा करते, तर दुसरीकडे प्रत्यक्ष आश्रमशाळांमध्ये मूलभूत भोजनाची अशी दुरवस्था पाहायला मिळत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे आदिवासी विकास विभागाच्या उदासीन कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना पौष्टिक आहाराची सर्वाधिक गरज असते. परंतु ठेकेदार आणि प्रशासकीय निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांना हक्काच्या आहारापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. प्रशासनाने या तांत्रिक अडचणींवर तात्काळ तोडगा काढून चपातीचा पुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.

मध्यवर्ती स्वयंपाकगृहातील यंत्राला पाच वर्ष झाले असून त्यामध्ये तांत्रिक बिघाडामुळे याठिकाणी नवीन यंत्र बसवण्याची तरतूद करण्यात आली आहे. सध्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या काही दिवसात याठिकाणी यंत्र कार्यरत होऊन नियमित पोषण आहार वितरीत होईल. सध्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहारात योग्य आणि पोषक आहार जेवण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. विशाल खत्री, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू