डहाणू : पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. गावठी औषध देण्याच्या आणि अघोरी उपायांच्या बहाण्याने एका ५५ वर्षीय भोंदू बाबाने अल्पवयीन मुलीला जंगलात नेऊन अत्याचार केले आहेत.
पीडितेच्या बहिणीला आजारपणामुळे गावठी औषध हवे असल्यामुळे ३० एप्रिल रोजी नातेवाईकांनी औषध देणाऱ्या भोंदू बाबाला संपर्क केला होता. त्यानंतर ३ मे रोजी आरोपीने पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांना औषध घेण्यासाठी बोलावले. औषध देण्याच्या बहाण्याने ४ मे रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास आरोपीने पीडितेला चरी पावण येथील जंगलातील निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केले आणि याविषयी कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
पीडित मुलीने या घटनेविषयी आपल्या बहिण आणि कुटुंबियांना सांगितल्यानंतर कुटुंबियांनी ४ मे रोजी रात्री १२ वाजताच्या सुमारास कासा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत ५ मे रोजी पहाटे ०४ वाजता दरम्यान आरोपी शिवराम परश सावर याला राहत्या घरून अटक केली आहे. तर पीडित मुलगी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. याप्रकरणी पुढील तपास जव्हार उपविभागीय पोलिस अधिकारी समीर मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली कासा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील करत आहेत.
महाराष्ट्रात भोंदूबाबांचा सुळसुळाट; नियंत्रण मिळवण्याचे आव्हान
राज्यात गेल्या काही दिवसांत भोंदूबाबांकडून फसवणूक आणि महिलांच्या शोषणाचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. नाशिकमधील एका भोंदूबाबा प्रकरणानंतर राज्यभरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाची दखल घेत सरकारने विशेष तपास पथक आणि अंमलबजावणी संचालनालयामार्फत चौकशी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर, ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने (अंनिस) ‘जादूटोणा विरोधी कायदा’ अधिक कडकपणे लागू करण्याची मागणी केली आहे. ग्रामीण तसेच शहरी भागांतून अशा भोंदूगिरीच्या घटना समोर येत असल्याने, नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
रोहित पवार घेणार पीडित कुटुंबाची भेट
पालघर मधील भोंदू बाबांकडून अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे पीडित कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. यासाठी रोहित पवार स्वतः पालघर मध्ये उपस्थित राहणार असून पीडित कुटुंबाची भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुनील भुसारा यांनी समाजमाध्यमांना दिली.
