पालघर : सार्वजनिक आरोग्याच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी तरुणाईच्या नवकल्पनांचे एक उल्लेखनीय उदाहरण असून डहाणू तालुक्यात इयत्ता बारावीचा विद्यार्थी अरमान तफ्ती (१७) याने साचलेल्या पाण्यातील डासांची पैदास नियंत्रित करण्यासाठी एक उपकरणाचा नमुना विकसित केला आहे.

स्वच्छ पाण्याच्या पृष्ठभागावर डासांची पैदास होत असल्याचे दिसून आले असून पृष्ठभागावर पाण्यावरील स्थिरता रोखण्यासाठी सौर उर्जेवर चालणारे हे उपकरण तयार करण्यात आले आहे. डासांच्या अळ्या खाणारे व बाजारात सहजगत मिळणारे (Bacillus thuringiensis subspecies israelensis)
बॅसिलस थुरिंजिएन्सिस सबस्पेशीज इस्रायलेन्सिस या बीटीआय प्रकारची जिवाणू या उपकरणाद्वारे पाण्यात सोडण्यात येत असल्याने दासाच्या पैदासीवर नियंत्रण मिळवण्यास हे उपकरण परिणामकारक ठरले आहे.

अरमानने अलीकडेच डहाणूतील गंजाड गावात या उपकरणाची चाचणी केली. या चाचणीत प्राथमिक स्तरावर आशादायक परिणाम दिसून आले. हे उपकरण सौरऊर्जेवर चालणारे तरंगते उपकरण असून ते साचलेल्या पाण्याच्या पृष्ठभागावर थेट कार्य करते. पाण्याची ढवळाढवळ करणे आणि त्याचवेळी पर्यावरणपूरक अळीनाशक सोडणे, या दुहेरी पद्धतीने डासांच्या पैदाशीला प्रतिकूल परिस्थिती निर्माण करणे हा या उपकरणामागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळे डासांच्या अळ्यांची वाढ कमी करण्यास मदत होते असा दावा अरमान तफ्ती यांनी केला आहे.

या प्रयत्नाचे वैशिष्ट्य म्हणजे हा नमुना केवळ प्रयोगशाळेपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष ग्रामीण पातळीवर तपासण्यात आला. प्राथमिक निष्कर्षांवरून असे दिसते की अशा कमी खर्चिक आणि व्यावहारिक नवकल्पना डास नियंत्रणाच्या प्रयत्नांना उपयुक्त ठरू शकतात, विशेषतः ज्या भागांमध्ये साचलेले पाणी पूर्णपणे हटवणे कठीण असते. अरमान आता या उपकरणाची अधिक कॉम्पॅक्ट, सहज वापरता येणारी आणि देखभाल करण्यास सोपी आवृत्ती विकसित करण्याचा विचार करत असल्याचे लोकसता शी बोलताना सांगितले.

महानगरपालिका आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणा प्रतिबंध, स्वच्छता आणि साचलेले पाणी दूर करणे यावर भर देत असताना, अरमानचे हे उपकरण स्थानिक समस्यांवर विद्यार्थ्यांच्या नवकल्पना कशा प्रकारे नवे उपाय सुचवू शकतात, याचे उदाहरण ठरली आहे.

संवेदनशील त्वचेमुळे उपकरणाचा शोध

अरमान तफ्ती याची त्वचा संवेदनशील असून डास चावल्यास त्याला गाठ येणे अथवा त्याच्या त्वचेवर त्याची दंशाचे डाग रूपात परिवर्तन होण्याचा त्रास भेडसावत आहे. अरमानला दोन वेळा डेंग्यूचा देखील त्रास झाला होता. आपल्या परिसरात हीच डासांची समस्या सोडवण्याच्या दृष्टीने त्यांनी वेगवेगळ्या प्रकाशित झालेल्या संशोधनाचा आधार घेत स्वतः एक संशोधन निबंध प्रसिद्ध केला असून विकसित केलेले डास पैदास रोखणारे उपकरण किफायतशीर, वैशिष्ट्यपूर्ण व अद्वितीय असल्याचा त्याचा त्यांनी दावा आहे.