डहाणू: पालघर जिल्ह्यातील विवळवेढे येथील उड्डाणपुलावरील दुरावस्थेमुळे वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मंगळवारी उड्डाणपुलाच्या गुजरात वाहिनीवर पाणी साचल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता मुंबई वाहिनीवर रस्त्याला मोठा खड्डा पडला आहे. अनेक महिन्यांपासून खड्डेमय असलेल्या पुलावर एप्रिल महिन्यात नव्याने डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत हे डांबरीकरण पूर्णपणे उखडून याठिकाणी मोठा खड्डा झाला आहे.

पावसामुळे पुलावरील गुजरात वाहिनीवर पाणी साचत असून मुंबई वाहिनीवर खड्डा पडल्याने झाल्याने या पुलावरून प्रवास करणाऱ्या चालकांसाठी मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे अनेक वाहने पंक्चर होऊन चालकांचे आर्थिक नुकसान झाले आहे, तसेच वेगवान वाहनांमुळे या ठिकाणी अपघाताची गंभीर शक्यता निर्माण झाली होती. या घटनेची माहिती मिळताच महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी तात्पुरती दुरुस्ती केली आहे.

राष्ट्रीय महामार्गावर काँक्रीटीकरण करण्यासाठी साधारण ५५० कोटी रुपयांचा मोठा खर्च करण्यात आला आहे. एवढा मोठा निधी खर्च करूनही उड्डाणपुलावर तांत्रिक कारणांमुळे डांबर टाकण्यात आले आहे. मात्र डांबरीकरणाचा दर्जा चांगला नसल्यामुळे पहिल्याच पावसात हे डांबरीकरण उखडले असून संपूर्ण कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

विवळवेढे, सोमटा सह अन्य काही उड्डाणपुलावर पाणी साचल्यानंतर प्रशासनाने मोऱ्या साफ करून पाण्याचा निचरा केला होता. मात्र, पुलावर मोठ्या प्रमाणात साचलेली वाळू आणि कचरा वाहून पुन्हा त्याच मोऱ्यांमध्ये अडकल्याने पाण्याचा मार्ग बंद झाला होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील आणि कर्मचारी सागर हंगारे यांनी स्वतः पुढाकार घेत मोऱ्यांमधील कचरा स्वतः हाताने काढून साचलेल्या पाण्याचा निचरा केला. पोलिसांच्या या तत्परतेमुळे महामार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडी आणि अपघात टळले आहेत. मात्र महामार्ग प्रशासनाच्या पावसाळ्यापूर्वीच्या ढिसाळ नियोजनाचा नमुना यामुळे समोर आला आहे.