पालघर शहराच्या वेशीवर नवली येथील एका महिलेला बिबट्याने हल्ला करून मारल्याच्या घटनेला महिना उलटण्यापूर्वीच वाणगाव परिसरातील माटगाव (चंडीगाव) परिसरात एका शेतमजूर महिलेला बिबट्यांनी हल्ला करून मारून टाकले. या घटनेची वनविभागाने गांभीर्याने दखल घेतली असून वाणगाव परिसरात अनेक ठिकाणी ट्रॅप कॅमेरा व पिंजरे बसवण्यात आले आहेत.
१ नोव्हेंबर च्या सायंकाळी सहा – साडे सहा वाजल्याच्या दरम्यान कामावरून परतणाऱ्या महिला शेतमजुरीवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्या तुळशी सावर (६५) यांचा दुर्दैवी अंत झाला. पालघर जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवर बिबट्याचा राजरोज वावर होत असल्याचे दिसून आल्याने नागरिक व शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
९ ऑक्टोबर रोजी घडलेल्या हल्ल्याच्या घटनेपासून वाणगाव मधील हल्ला सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असून पालघर नवली भोगलेपाडा येथील एका महिलेवर बिबट्याने हल्ला करून त्याचा मृत्यू झाला होता. तसेच गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्याच्या विविध ठिकाणी बिबट्याचा वावर राजरोसपणे होताना दिसून येत होता. बिबट्या कडून कुत्रे, गाईचे बछडे व इतर वन्य प्राणी मारल्याच्या घटना घडत असताना आज सायंकाळी डहाणू वनविभागांतर्गत येणाऱ्या बोईसर परिक्षेत्रातील माटगाव येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वृद्ध शेतमजूर महिला जागीच ठार झाली.
वनविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून घटनेची माहिती मिळताच बोईसर परिक्षेत्रातील वन अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वाणगाव व परिसरात वनविभागाने ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले असून किमान तीन ठिकाणी पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आखणी केल्याची माहिती उपवनसंरक्षण निरंजन दिवाकर यांनी लोकसत्ताला दिली. नवली भोगलेपाडा येथे महिलेवर हत्या करणाऱ्या बिबट्यानेच माटगाव येथे पुन्हा हल्ला केल्याचा संशय वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून सर्वसाधारणपणे बिबट्या १५ ते २० किलोमीटर अंतर सहज कापू शकतो अशी माहिती त्यांनी दिली.
बिबट्याला पकडण्यासाठी या परिसरात गस्त पथक साईनाथ करण्यात आले असून आवश्यकता भासल्यास बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी ट्रँक्वलाईजर पथक देखील परिसरात उपलब्ध असल्याची त्यांनी माहिती दिली. बिबट्या हा दिवसा चिकूच्या वाडीत लपण्यासाठी आश्रय घेत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून रात्रीच्या वेळी बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाकडे दोन थर्मल ड्रोन कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली. परिसरातील गावांमधील नागरिकांनी घाबरू नये मात्र सतर्कता बाळगावी असे दवंडीद्वारे गावकऱ्यांना कळविण्यात येत असल्याची माहिती उपवन संरक्षण यांनी दिली.
नेमकी घटना काय?
माटगाव येथील गट क्रमांक १८३/५ मध्ये चंडीगाव येथील प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी बळवंत राऊत यांची खाजगी वाडी आहे. या वाडीमध्ये नेहमीप्रमाणे मजुरीचे काम आटोपून तुळशी सावर या संध्याकाळी सुमारे सहा वाजल्याच्या सुमारास बाहेर पडत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक झेप घेतली. श्वापदाने थेट मानेवर पकड घेतल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शेतकरी बळवंत राऊत व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत बिबट्या अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला होता. प्राथमिक माहितीनुसार हा बिबट्याचाच हल्ला असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.
शेती व्यवसाय आणि कृषी अर्थचक्राला मोठा फटका
या घटनेनंतर परिसरातील शेतकरी आणि मजुरांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. रब्बी आणि बागायती पिकांचा हंगाम ऐन भरात असताना शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देणे, औषध फवारणी करणे व राखण करणे पूर्णपणे अशक्य झाले आहे. मजुरांनी शेतात कामावर येण्यास स्पष्ट नकार दिल्याने परिसरातील शेतीव्यवस्था आणि त्यावर अवलंबून असलेली ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
“मानवी रक्ताला चटावलेल्या या श्वापदामुळे शेतकरी आणि मजुरांचा जीव टांगणीला लागला आहे. वनविभागाने तात्काळ या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करून त्याचा बंदोबस्त करावा, अन्यथा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वपक्षीय स्थानिकांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आक्रोश मोर्चा काढला जाईल.” – मिलिंद पाटील शेतकरी प्रतिनिधी
