पालघर :जिल्ह्यात असणारी सर्व प्रमुख धरणे तसेच लघुपाटबंधारे योजनेअंतर्गत मध्यम व लहान धरणांचे येत्या काळात अग्रक्रमाने संरचनात्मक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या नदी, नाले याच्यावर झालेले अतिक्रमण निश्चित करून पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग खुला करण्याच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या आहेत.
पालघर जिल्ह्यात जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात झालेल्या मुसळधार पावसाच्या अनुषंगाने अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच त्यामुळे रेल्वे व अंतर्गत मार्गांवर पाणी साचल्याने दळणवळण ठप्प झाले होते. केळवे रोड झांझरोळी येथील बंधाऱ्याच्या संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळल्याने आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती.
जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील विविध विभागांच्या समवेत अतिवृष्टीच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणी करण्यासाठी बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम, महसूल तसेच विविध विभागातील वरिष्ठ अधिकारी विभाग प्रमुख सहभागी झाले होते.
जिल्ह्यात नैसर्गिक नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून त्याची निश्चिती करून पाण्याचा निसरा होण्याचा मार्ग खुला करण्याच्या दृष्टीने संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढील पंधरा दिवसाच्या आत कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. याकामी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच इतर विभागाने सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
नदी व मोठ्या नाल्या किनारी असणाऱ्या गावांचा तसेच जिल्ह्यातील खोलगट भागांचा अभ्यास करून अशा भागांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास तेथील नागरिकांच्या स्थलांतरासाठी असणारे पुनर्वसन केंद्र निश्चित करून अशा केंद्रांवरील पायाभूत सुविधांचा स्तर सुधारण्याचे तसेच तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन होणाऱ्या नागरिकांना तातडीने आवश्यक सोयी सुविधा मिळण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करण्याचे ठरवण्यात आले. अशा पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याच्या संभाव्य ठिकाणी आपत्कालीन आराखडा तयार करण्याचे देखील सुचित करण्यात आले.
जुलै महिन्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे खराब झालेले रस्ते, पूल, साकव, शासकीय इमारती, पाणीपुरवठा योजना, महावितरण यंत्रणा, ड्रेनेज यंत्रणा तसेच खाजगी घरांच्या नुकसानीचे पंचनामे महिना अखेरीपर्यंत तयार करून ते जिल्हास्तरावर सादर करण्याचे सूचित करण्यात आले. तसेच प्रत्येक विभागाने पूर परिस्थितीच्या दृष्टीने पूर्व सज्जता कृती आराखडा तयार करून त्याचे जिल्हास्तरावर अहवाल स्वरूपात सादर करण्याचे साध्य झाले.
केळवे रोड व सफाळे परिसरात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी असणाऱ्या काही नागरिकांना बोट चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली.
पंचनामा प्रक्रिया वेगात
जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या मुसळधार पावसात १९ हजार पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाल्याचे अंदाजीत असून त्यापैकी १५ हजार घरांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. या मुसळधार पावसामध्ये ३४० कच्च्या घरांची अंशतः पडझड तर पाच घरांची पूर्णतः पडझड झाली असून या मुसळधार पावसात पाच पक्या घरांची देखील अंशतः नुकसान झाल्याचे अंदाजित आहे. याच बरोबरीने नऊ झोपड्या, दोन गोठे असे सुमारे ५१६ वास्तूंच्या नुकसानीचे सर्वेक्षण हाती घेण्यात आली होती. त्यापैकी ११७ ठिकाणाचे सर्वेक्षण प्रलंबित आहे. जिल्ह्यातील २१० शेतकऱ्यांचे किमान ३० हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले असून हे आकडेवारी सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर वाढण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
