पालघर: पालघर जिल्ह्यातील चार कर्णबधिर शाळांमधील विद्यार्थ्यांची श्रवण कौशल्य वृद्धी होण्याच्या दृष्टीने पालघर जिल्हा परिषदेने विशेष सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिले आहे. यामुळे अशा विशेष विद्यार्थ्यां मधील भाषा कौशल्य वृद्धी वाचा दुरुस्ती करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. पालघर जिल्ह्याचा विकास होताना अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्यासाठी जिल्हा परिषदेने अनेक उपक्रम राबवले असून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात सोबत त्यांना स्वावलंबी व सक्षम करण्याच्या दृष्टीने वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत.

कर्णबधिर विद्यार्थ्यांना त्यांच्या श्रवण दोषावर मात करून श्रवण कौशल्य वाढ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील व समाज कल्याण अधिकारी तथा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी डॉ. प्रकाश हसणाळकर यांच्या पुढाकाराने सशक्तिकरण करण्याच्या दृष्टीने विशेष कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील पालघर, डहाणू, जव्हार व विरार येथील अनुदानित कर्णबधिर विद्यालयात सुमारे २० लाख रुपये किमतीचे “डॉक्टर स्पीच” सॉफ्टवेअर देण्यात आले आहे. या सॉफ्टवेअरचा जिल्ह्यात शिकत असलेल्या कर्णबधिर मुलांसाठी वाचा दुरुस्तीच्या दृष्टीने, भाषा वाढीच्या दृष्टीने व बोलून संभाषण साधणे यासाठी प्रोत्साहन मिळून विद्यार्थ्यांना याचा  खूप फायदा होणार आहे. संगणक, प्रिंटर, मायक्रोफोन, दोन स्पीकर सह सॉफ्टवेअर जिल्ह्यातील कर्णबधिर विद्यालयाला सुपूर्त करण्यात आले असून शाळेत शिकत असणाऱ्या सुमारे ४०० विद्यार्थ्यांना सध्या याचा लाभ घेता येणार आहे. या सॉफ्टवेअर संदर्भात विद्यालयात शिकवणाऱ्या विशेष शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्याची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच समाज कल्याण अधिकारी यांनी नुकतीच पालघर येथे केली.

  • या सॉफ्टवेअरच्या वापरामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या बोलताना होणाऱ्या चुका दृश्य माध्यमातून समजल्यामुळे अगदी सहज आकलन होणार व त्यांची दुरुस्ती अगदी सोप्या पद्धतीने विद्यार्थी स्वतः करू शकणार आहेत.
  • श्रवण यंत्राचा वापर करणारे विद्यार्थी, जे काही बोलणार आहेत ते स्वतःच, स्वतःचा आवाज ऐकून बोलण्यास प्रेरित होणार आहेत व बोलून संभाषण साधण्याचा प्रयत्न करणार. अशाप्रकारे त्यांच्या श्रवण कौशल्या मध्ये देखील वृद्धी होणार आहे.
  • या सॉफ्टवेअर मध्ये भाषा वाढीसाठी विविध कार्टून इमेजेस व ओरिजनल इमेजेस त्यांच्या नावासह दिल्यामुळे व कॉम्प्युटर द्वारे त्याचे नाव वाचन केल्याने विद्यार्थ्याच्या भाषा वाढीसाठी उपयुक्त ठरणार आहे.