पालघर : विक्रमगड तालुक्यात होऊ पाहणाऱ्या देहेर्जे मध्यम प्रकल्पाकरिता संपादित करण्यात येणाऱ्या खुडेद, साखरे व जांभे या गावांच्या वाढीव मूल्यांकनास शासनाने ‘विशेष बाब’ म्हणून मान्यता दिली आहे. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने ३० जून रोजी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाला पत्राद्वारे या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत.
देहेर्जे मध्यम प्रकल्पाकरिता संपादित करण्यात येणाऱ्या खुडेद, साखरे व जांभे या गावांमधील भूसंपादनाला तांत्रिक कारणांमुळे अडचण निर्माण झाली होती. या महत्त्वपूर्ण मागणीसाठी खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी शासन दरबारी सातत्याने आवाज उठवला होता. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा आणि योग्य मोबदला मिळावा, यासाठी त्यांनी चिकाटीने पाठपुरावा केला.
खुडेद, साखरे व जांभे या तिन्ही गावांसाठी गावांमधील संपादित होणाऱ्या जागांना मलवाडा (ता. विक्रमगड) या गावातील जमिनींच्या खरेदी- विक्री व्यवहाराप्रमाणेच, प्रति हेक्टरी २५ लाख ४३ हजार १०० रुपये इतक्या सुधारित मूल्यांकन दरास मंजुरी देण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे खुडेद, साखरे व जांभे गावातील बाधित शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. विक्रमगड तालुक्यातील देहर्जे मध्यम प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनींच्या मूल्यांकनाचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला असून, शासनाने खासदार महोदयांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
