पालघर : पालघर येथील डॉ. एम.एल ढवळे ट्रस्टच्या होमिओपॅथिक रुग्णालयात अधाता ट्रस्टच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिक व वृद्धांसाठी विशेष सुश्रुषा कक्ष कार्यरत असून मुंबई उपनगर व परिसरात ज्येष्ठांसाठी २४ तास वैद्यकीय उपचार व पुनर्वसन सुविधा देणारे हे एकमेव केंद्र ठरले आहे.
पालघर शहरात १०० खाटांचे होमिओपॅथिक रुग्णालय सन २००० पासून कार्यरत आहे. या रुग्णालयात सन २०१४ पासून राम कापसे जिरिएटिक सेंटर कार्यरत असून या कक्षात १४ ज्येष्ठ नागरिकांची सुश्रुषा करण्याची क्षमता आहे. समाजसेवक व वृद्धांना सुलभ पद्धतीने जगता येण्यासाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या अरुण नंदा यांच्या पुढाकाराने व अधाता ट्रस्टच्या सहकार्याने याच रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुविधेसह ज्येष्ठ नागरिकांचे पुनर्वसन व सुश्रुषा केंद्राची उभारणी करण्यात आली.
१७ रुग्णांना या वृद्ध संगोपन विशेष कक्षामध्ये दाखल करण्याची क्षमता असून यामध्ये शस्त्रक्रियेनंतर तसेच वैद्यकीय उपचारानंतरची काळजी घेण्याची व्यवस्था आहे. या केंद्रात सौम्य स्मृतिभ्रंश, कंपवादाच्या (पार्किन्सन) च्या प्राथमिक अवस्थेमधील तसेच सौम्य मानसिक आजारांच्या रुग्णांना दाखल करून घेण्याची तसेच त्यांच्यावर आवश्यकतेनुसार वैद्यकीय उपचार पुनर्वसन व सुश्रुषा करण्याची व्यवस्था माफक दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुंबई उपनगरात तसेच पालघर जिल्ह्याच्या शहरी भागामध्ये अनेक वृद्धाश्रम तसेच रुग्णालय कार्यरत असली तरी शस्त्रक्रिया अथवा गंभीर आजारानंतर आवश्यक असणारी वैद्यकीय देखरेख व देखभाल करण्याची सुविधा एकमेव ठिकाणी उपलब्ध होत असल्याने नोकरीमध्ये व्यस्त असणाऱ्या कुटुंबाला अथवा अपघात- शस्त्रक्रियेनंतर फिजिओथेरपी साठी नियमित ने- आण करण्याची व्यवस्था नसणाऱ्या कुटुंबाला हे केंद्र उपयुक्त ठरत आहे. या केंद्रामध्ये तज्ञ डॉक्टर यांच्यासह परिचारिका व मदत कार्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध असून याच केंद्रामध्ये लवकरच “दे केअर सेंटर” सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परिचर्या सेवेसह वैद्यकीय देखभाल पौष्टिक अन्न, विशेष काळजी तसेच ज्येष्ठ नागरिकांची तंदुरुस्ती राखण्यासाठी आवश्यक उपक्रम या ठिकाणी राबविले जात आहेत.
पालघरच्या ढवळे रुग्णालयात विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जात असून त्या ठिकाणी अति दक्षता विभाग, डायलिसिस सेंटर, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरेपी सुविधा उपलब्ध असून तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी तसेच आपत्कालीन कक्ष कार्यरत आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘अधाता ट्रस्ट’चा सकारात्मक वृद्धत्वाचा उपक्रम
निवृत्तीनंतर सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याचा निर्णय घेत अरुण नंदा यांनी अधाता ट्रस्ट च्या माध्यमातून गेल्या १४ वर्षांपासून ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, सामाजिक सहभाग आणि स्वावलंबनासाठी महत्त्वपूर्ण काम करीत आहेत. वाढते आयुर्मान आणि विभक्त कुटुंबपद्धतीमुळे ज्येष्ठांना जाणवणारा एकटेपणा, निष्क्रियता तसेच शारीरिक व मानसिक आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन ट्रस्टने सकारात्मक वृद्धत्वाचा व्यापक दृष्टिकोन स्वीकारला आहे.
मुंबईत ट्रस्टच्या १८ होलिस्टिक वेल-बिइंग सेंटरद्वारे ज्येष्ठांसाठी नियमित व्यायाम, बौद्धिक व स्मरणशक्ती वर्धक उपक्रम, समूह संवाद आणि प्रतिबंधात्मक आरोग्यविषयक कार्यक्रम राबविले जातात. डे-केअर सेंटर आणि फिजिओथेरपी लॅबच्या माध्यमातून व्यायाम, पुनर्वसन, हालचालींची क्षमता वाढविणे आणि आरोग्य निरीक्षण यावर भर दिला जातो. ऑनलाइन कार्यक्रम व डिजिटल शिक्षणातून ज्येष्ठांना तंत्रज्ञानाशी जोडण्या बरोबरच आंतरपिढीय संवादाला प्रोत्साहन दिले जात आहे.
टाटा मुंबई मॅरेथॉन सीनियर सिटिझन्स रनमध्ये संस्थात्मक भागीदार म्हणून ट्रस्ट हजारो ज्येष्ठांना सहभागी करून घेतो. ज्ञान अनलिमिटेड सारख्या उपक्रमातून आजीवन शिक्षण आणि सामाजिक सहभागाला चालना दिली जाते. पनवेल येथे ‘स्वर्णराज निवास’ ही नियोजित वरिष्ठ नागरिक निवास व्यवस्था उभारण्यात आली आहे. स्वावलंबी ज्येष्ठांना सुरक्षित, आरोग्यपूर्ण, सुसंवादी आणि सहवास पूर्ण जीवन जगता यावे, हा त्यामागील उद्देश आहे. हा उपक्रम पूर्णतः सामाजिक आणि नफारहित स्वरूपाचा आहे.
