बोईसर: महाराष्ट्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाच्या ‘मिशन सुधार’ मोहिमेअंतर्गत पालघर जिल्हा आणि तालुका पुरवठा विभागामार्फत शिधापत्रिका धारकांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात उत्पन्न मर्यादा अधिक असलेल्या सुमारे ४३ हजार शिधापत्रिकाधारकांचा धान्य पुरवठा आतापर्यंत बंद करण्यात आला असून इतर शिधापत्रिकाधारकांची उत्पन्न मर्यादा पडताळणी प्रक्रिया सुरू आहे.

अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय अंतर्गत जिल्हा पुरवठा विभागाकडून पालघर जिल्ह्यात शिधापत्रिका धारकांना गावोगावी असलेल्या रास्त भाव दुकानांमधून दरमहा स्वस्त धान्याचं वितरण केले जाते. पालघर जिल्ह्यात अंत्योदय योजना, प्राधान्य कुटुंब, केशरी आणि शुभ्र अशा एकूण सहा लाख ५० हजार ९६९ शिधापत्रिका असून २६ लाख ५६ हजार ५८३ शिधापत्रिकाधारकांची संख्या आहे. अंत्योदय अन्न योजना लाभार्थी यांना ३३ हजार २३३ क्विंटल आणि प्राधान्यक्रम लाभार्थ्यांना ६९ हजार २८७.५ क्विंटल धान्य दरमहा वाटप केले जाते.

राज्य सरकारने गरजू व पात्र शिधापत्रिका धारकांना सरकारी सवलतीच्या, स्वस्त धान्याचा लाभ मिळावा तसेच अन्नसुरक्षा योजनेतील गैरव्यवहार रोखणे व बनावट शिधापत्रिका रद्द करण्यासाठी ‘मिशन सुधार’ ही मोहीम सुरू केली आहे. पालघर जिल्ह्यात जिल्हा आणि तालुका पुरवठा विभागाकडून मोहिमे अंतर्गत मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या शिधापत्रिका लाभार्थ्यांची नावं वगळण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सरकारी नोकरी, आयकर भरणारे, आयकर विवरणपत्र धारक, सेवा व वस्तू कर भरणारे, दुबार शिधापत्रिकाधारक, २.५० लाखा पेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न धारक, चारचाकी वाहन मालक, अनियमित धान्य घेणारे, अशा विविध वर्गातील शिधापत्रिका लाभार्थ्यांचा धान्य पुरवठा बंद करण्यात येत आहे.

आतापर्यंत सुमारे ४३ हजार ३८५ शिधापत्रिकाधारकांचा धान्य पुरवठा बंद करण्यात आला असून शिल्लक ८६ हजार २६३ शिधापत्रिकाधारकांचा धान्य पुरवठा बंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा महल्ले त्यांच्याकडून देण्यात आली.

वसई तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक ३९ हजार १५१, डहाणू १०९, पालघर तीन हजार २५३, वाडा २९१, मोखाडा ३७१, जव्हार १०८, विक्रमगड १६ आणि तलासरी ८६ शिधापत्रिकाधारकांचे धान्य वितरण बंद करण्यात आली असून पुढे देखील ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.