scorecardresearch

पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

जिल्ह्य़ातील ६२६ केंद्रांवर ३४५५ कर्मचारी, पोलीस यंत्रणा तैनात करणार

पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

जिल्ह्य़ातील ६२६ केंद्रांवर ३४५५ कर्मचारी, पोलीस यंत्रणा तैनात करणार

निखिल मेस्त्री, लोकसत्ता

पालघर : पालघर जिल्ह्य़ातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या २९ जागांसाठी पाच ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्य़ात विविध ठिकाणी ६२६ मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्य़ात ३४५५ अधिकारी-कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेचे विविध १५ गट व पंचायत समितीचे १४ गण यांच्या मतदानासाठी प्रशासनामार्फत विविध साहित्याची जुळवाजुळव सुरू असून ईव्हीएम मशीन इत्यादीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. काही ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण झाले असून काही ठिकाणी सुरू आहे. गट व गणांचे निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या प्रांत अधिकाऱ्यांसह तहसीलदार व निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत मतदान केंद्राचा आढावा घेतला जात आहे. ज्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे तालुकास्तरीय कार्यालय ठेवण्यात आले आहे त्या ठिकाणी मतमोजणी होणार असल्याने तेथे कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी व साहित्य वितरित करण्यासाठी मंडप बांधण्याचे काम जोरदार सुरू आहे. याचबरोबरीने मतमोजणी करण्यासाठीही या ठिकाणी विशेष सुरक्षेसह कक्षाची तयारी केली जात आहे. प्रत्येक अधिकारी वर्गाला निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेली जबाबदारी या अनुषंगाने मतदानाची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. तालुकास्तरीय मतदान केंद्र अधिकारी यांच्यामार्फत गण व गटात मतपत्रिका वाटपाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. नागरिकांना मतपत्रिका वाटप केले जात असल्याचे तालुका कार्यालयांमार्फत सांगितले गेले आहे. तसेच मतदार यादी मतदानासाठी तयार केल्या गेल्या आहेत.

निवडणुकांच्या मतदानासाठी अवघे चार दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्य़ात राजकीय पक्षांच्या प्रचाराचा जोर वाढला असला तरी या प्रचारावर नियंत्रण ठेवण्यासह निवडणूक आचारसंहिता प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या समितीमार्फत विविध नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचारीवर्गामार्फत छायाचित्रण करणे, देखरेख ठेवणे, फिरती पथके अशी कामे करण्यात येत आहेत.

पालघर जिल्ह्य़ात जि. प.चे पंधरा गट व पंचायत समितीचे १४ गट मिळून तीन लाख ६७ हजार ६०२ मतदार आहेत. यामध्ये एक लाख ८० हजार ९१५ महिला तर १ लाख ८६ हजार ६९३ पुरुष मतदार यांचा समावेश आहे. प्रत्येक केंद्रामध्ये केंद्रप्रमुख यांच्यासह अधिकारी वर्ग, शिपाई यांची तरतूद केली आहे. त्याचबरोबरीने कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता त्यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. प्रत्येक केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक मतदाराला हाताचे निर्जंतुकीकरण त्याचबरोबरीने तोंडाला मुखपट्टी लावणे असे जनजागृतीपर संदेशही प्रशासनामार्फत देण्यात आलेले आहेत. त्या दृष्टीने नागरिकांनीही मतदानाची नैतिक जबाबदारी पार पाडताना करोना संबंधातील उपाययोजना करणे आवश्यक असल्याचेही प्रशासनामार्फत सांगितले गेले आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. ही प्रक्रिया संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. ईव्हीएम मतदान यंत्रांची बिघाड होऊ  नये यासाठी काळजी घेतली जात आहे. तसेच प्रत्येक केंद्रावर अतिरिक्त यंत्रे दिली जाणार आहेत.

प्रत्येक केंद्रावर किमान १-२ पोलीस शिपाई

मतदान केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी वर्गासह पोलीस वर्गही तैनात राहणार आहे. प्रत्येक केंद्रावर किमान एक ते दोन पोलीस शिपाई यासह पोलीस अधिकाऱ्यांची फिरती पथके व त्याच्यावर त्या भागातील उपविभागीय अधिकारी लक्ष ठेवून राहणार आहेत.

मतदारांची संख्या

एकूण मतदार :  ३६७६१२

स्त्रिया मतदार :  १८०९१५

पुरुष मतदार : १८६६९३

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Palghar district administration ready for by elections zws

ताज्या बातम्या