पालघर : वाढवण व मुरबे येथील प्रस्तावित बंदर प्रकल्प, रिलायन्स इंडस्ट्रीजचा केळवे रोड परिसरात पॉलिस्टर वस्त्रोद्योग अशा प्रकल्पांच्या अनुषंगाने पालघर जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीला बळ मिळाले आहे. विविध राष्ट्रीय आणि रेल्वे मार्गांमुळे जिल्ह्याची दळणवळण सुविधा वाढली असताना स्थानिक स्तरावरील सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणीही जिल्ह्याच्या प्रगतीत मोलाची ठरत आहेत.
१ ऑगस्ट २०१४ रोजी पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर पहिले काही वर्ष प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागले. जिल्ह्याने २०१८- १९ पासून विविध क्षेत्रांमध्ये कामगिरी सुधारण्यास आरंभ झाला. प्रस्तावित बंदर प्रकल्पामुळे लोहमार्ग तसेच राष्ट्रीय महामार्ग पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीच्या भागापर्यंत जोडले जाण्याची योजना मंजूर करण्यात आली असून त्यापैकी काही पायाभूत प्रकल्प पूर्ण होण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून पालघर जिल्ह्यावर असणारा कुपोषणाचा डाग बहुतांशी मिटवण्यास जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. आरोग्य संस्थेचे बळकटीकरण, तरुणींची रक्त तपासणी व हिमोग्लोबिन वाढीसाठी उपक्रम, नियमित आयोजित होणारे आरोग्य शिबिर, स्थलांतरितांसाठी आरोग्य तपासणी, गर्भवती महिला, स्तनदा माता तसेच बालकांना पोषण आहार तसेच सामाजिक संस्थांच्या आरोग्य क्षेत्रातील सहभागामुळे सन २०१७ मध्ये ४००० च्या पलीकडे असणारी कुपोषित बालकांची संख्या १३०० पर्यंत मर्यादित राहण्यास कारणीभूत ठरली आहे.
शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या पायाभूत, साक्षरता व संख्याज्ञान वृद्धीसाठी वाचन कौशल्य इतर बाबींद्वारे शैक्षणिक दर्जा उंचवण्यासाठी जिल्ह्यातर्फे निपुण पालघर हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे. जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या दृष्टीने पायाभूत सुविधांचा स्तर उंचावण्यासाठी, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी योजना आखण्यात आल्या आहेत. प्रत्येक गाव पाडा रस्त्याने जोडण्यासाठी देखील योजना राबवली जात आहे. डोंगरी भागातील पाण्याचे दुर्भिक्ष संपवण्यासाठी विशेष नळ पाणी योजना राबविली जात आहे. गेल्या सात – आठ वर्षांपासून नाविन्यपूर्ण योजनांचा प्रभाव दिसू लागला असून राज्यात एक प्रगत जिल्हा म्हणून नावारूपाला येण्याच्या दृष्टीने शासन व प्रशासन प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दीड लाख महिला लखपती!
जिल्ह्यात १७ हजार पेक्षा अधिक बचत गट असून विविध तालुक्यातील तब्बव दीड लाख महिला लखपती झाल्या आहेत. सरस उपक्रमात यंदा पालघर मध्ये ५० लक्ष रुपयांची उलाढाल झाली. जिल्ह्यात ५०० महिलांचा सहभाग असणार्या चार बचत गट कंपन्या उभारण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू असून फुल शेती व फळ लागवडीमुळे ग्रामीण भागात रोजगाराचे नव्याने स्रोत उपलब्ध झाले आहेत.
शेतीला बळ
जिल्ह्यात ५१ हजार पेक्षा अधिक वनपट्ट्यांचे (३० हजार हेक्टर) वाटप झाले असून राज्य व देश पातळीवर जिल्हा आघाडीवर राहिला आहे. बहुतांश वनपट्ट्यांमध्ये कृषी लागवड झाली असून सुमारे १.३५ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप, रब्बी व फळपिके घेण्यात येत आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात ९.३७ लक्ष बांबू रोपांची लागवड करण्यात आली असून फळ प्रक्रिया करण्याच्या सुविधा उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
विशेष कामगिरी
* गेल्या तीन वर्षात १३ हजार श्वानांचे निर्बिजीकरण.
* पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आजवर ७५ हजार घरकुले पूर्ण
* सन २०२४- २५ दरम्यान ७१ हजार घरकुलांना मंजुरी. त्यापैकी २५ हजार घरकुले पूर्ण
जिल्ह्यात अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्पांची उभारणी होत आहे. त्या अनुषंगाने पायाभूत सुविधांचा स्तर उंचविला जात आहे. आरोग्य, शिक्षण, कृषी विभागांसह महिला सबलीकरण व सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने अनेक योजना राबविल्या जात आहेत. विकास कामासाठी शासनाकडून आवश्यक निधीची उपलब्धता होत असून पालघर जिल्हा झपाट्याने प्रगती करीत आहे. – डॉ. इंदू राणी जाखड, जिल्हाधिकारी पालघर
