पालघर : २०० खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय १ मे पर्यंत कार्यरत करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री यांनी संबंधित विभागांना दिल्या असून या वेळमर्यादेपर्यंत बांधकामाशी तसेच विद्युत विभागाशी संबंधित कामे पूर्ण होण्याच्या स्थितीत आहेत. मात्र या आरोग्य संस्थेला विज व पाणी पुरवठा जोडणी प्रलंबित असून दोन तळमजले व चार मजल्यांच्या या रुग्णालयात चार उद्वाहक उभारणी करण्याचे काम प्रलंबित राहिले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालय कार्यरत होण्यासाठी आणखी काही महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तळमजल्यासह चार मजले असणारे पालघर जिल्हा सामान्य रुग्णालय ४३ हजार चौरस मीटर क्षेत्रावर उभारण्यात येत असून सद्यस्थितीत या आरोग्य संस्थेत २०० खाटांची व्यवस्था करण्यात येत असली तरीही आगामी काळात यात ३०० रुग्णांना दाखल करणे शक्य होणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाने २०९.११ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली असून त्यापैकी १८५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
या आरोग्य संस्थेच्या मुख्य रुग्णालय इमारतीचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले असून रुग्णालय इमारतीच्या विद्युतीकरण तसेच विद्युत उपकरणे बसवण्याचे काम देखील पूर्णत्वाच्या टप्प्यात आहेत. या इमारतीच्या अग्नि सुरक्षिततेच्या दृष्टीने फायर हायड्रेट व्यवस्था उभारण्यात आली असून इतर बाबी देखील पूर्ण करण्यात आले आहेत.
असे असताना रुग्णालयाला पाणीपुरवठा व्हावा यादृष्टीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पालघर नगर परिषदेला मार्च महिन्यात पत्र देण्यात आले असून महावितरण कंपनीच्या उपकेंद्रापासून या जिल्हा रुग्णालयात पर्यंत विद्युत जोडणी करण्याचे काम देखील प्रलंबित राहिले आहे.
या रुग्णालयाच्या उभारणी संदर्भात प्रशासकीय मान्यता दिली तेव्हा या कामांसाठी वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) दर १२ टक्के इतका होता. मात्र नंतर शासनाने जीएसटी दर १८ टक्क्यांवर वाढवल्याने प्रशासकीय मान्यता रक्कम हीच ठेवून निविदेमधील काही काम वगळण्यात आली. सद्यस्थितीत कर्मचारी व अधिकारी यांच्या निवासस्थानाच्या सहा इमारतींपैकी तीन इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असून इतर तीन इमारतींचे काम प्लिंथ (पाया) उभारणीपर्यंत पूर्ण झाल्याचे दिसून आले आहे. तर अंतर्गत रस्ते तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून महिन्याअखेरीपर्यंत काम पूर्ण होईल असे राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
१८८ कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी
जीएसटी दरवाढीमुळे वगळण्यात आलेली कामे, प्राणवायू पुरवठ्यासाठी स्वतंत्र वाहिनी उभारणी करणे, सौर ऊर्जा प्रणाली उभारणे. कर्मचारी अधिकारी निवासस्थान तसेच विद्युतीकरणाशी संबंधित काही अतिरिक्त कामांच्या अनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी १८८ कोटी रुपयांचे अतिरिक्त मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. ही रक्कम मंजूर होताच इतर कामाला देखील चालना मिळेल अशी शक्यता आहे.
उद्वाहक उपलब्धी मध्ये अडचणी
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या विद्युत विभागाने उद्वाहकच्या डिझाईन संदर्भात आवश्यक मंजुरी घेण्याची प्रक्रिया हाती घेतली असून येत्या काही दिवसात ही मंजुरी प्राप्त होणार आहे. मात्र सध्या निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे वाहक उत्पादन दरम्यान विलंब होत असून या रुग्णालयाच्या मुख्य इमारतीला आवश्यक असणाऱ्या सात पैकी चार उद्वाहक उभारण्याचे काम शीघ्र गतीने हाती घेण्यात येईल असे या विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल कांबळे यांनी लोकसत्ता ला सांगितले.
मनुष्यबळ व आवश्यक यंत्र मिळवण्यासाठी प्रयत्न
२०० खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व लागणारी वैद्यकीय उपकरण व यंत्रसामग्री उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय व या रुग्णालयासाठी नेमलेले अधिकारी प्रयत्नशील असून या कामे आरोग्य संचलानय विभागाशी पाठपुरावा असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड यांनी सांगितले. रुग्णालय कार्यरत करताना आवश्यक स्वच्छता, सुरक्षा, खानपान व्यवस्था तसेच लॉन्ड्री व्यवस्था कार्यरत करण्यासाठी देखील आपला विभाग प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले पालघर जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्याचे दृष्टीने बांधकामाशी व विद्युत संबंधित बहुतांश काम पूर्ण झाली आहेत.
उद्वाहक उपलब्ध होणे तसेच या रुग्णालयाला पाणी व वीज पुरवठा सुरू करण्यासाठी देखील शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. १ मे पर्यंत रुग्णालय सुरू करण्यासाठी विविध विभाग एकत्रितपणे प्रयत्न करीत आहेत. – विश्वजीत राऊत, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय आरोग्य अभियान
