पालघर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शनिवारी जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात पालघर जिल्ह्याचा निकाल ८६.६८ टक्के लागला आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा निकालाच्या टक्केवारीत मोठी घट झाली असून, जिल्ह्याचा निकाल सुमारे साडेपाच टक्क्यांनी घसरला आहे. असे असले तरी, यंदाही निकालात मुलांच्या तुलनेत मुलींनीच बाजी मारली आहे.
पालघर जिल्ह्यातून या परीक्षेसाठी ५३ हजार ४१५ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी ४६ हजार ३०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये उत्तीर्ण झालेल्या मुलांचे प्रमाण ८३.८१ टक्के असून मुलींचे प्रमाण ९०.०३ टक्के इतके आहे. म्हणजेच मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ६ टक्क्यांहून अधिक लागला आहे.
पालघर जिल्ह्याच्या निकालाचा कल पाहता गेल्या दोन वर्षांपासून निकालात घट होत असल्याचे दिसून येत आहे. २०२४ मध्ये जिल्ह्याचा निकाल ९३.५१ टक्के लागला होता. तर २०२५ मध्ये निकालात १.३२ टक्क्यांची घट होऊन तो ९२.१९ टक्क्यांवर आला होता. यंदा निकालात मोठी घट होऊन तो ८६.६८ टक्क्यांवर स्थिरावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात ५.५१ टक्क्यांची लक्षणीय घट झाली आहे.
जिल्ह्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे पालघरचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या निकालात झालेली घट चिंतेचा विषय असली, तरी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद ठरत आहे.
तालुकानिहाय निकालात मोखाडा अव्वल
जिल्ह्यातील तालुकानिहाय निकालाचा विचार करता, ग्रामीण भागातील मोखाडा तालुक्याने आपली निकालाची परंपरा कायम राखत ९८.१८ टक्के निकालासह जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. गेल्या वर्षीही ९६.४४ टक्क्यांसह मोखाडा तालुका आघाडीवर होता. दुसरीकडे, पालघर (८७.८१ टक्के), वाडा (८९.२२ टक्के) आणि वसई (८६.६५ टक्के) या तालुक्यांच्या निकालात गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
तालुकानिहाय निकाल (टक्केवारी)
तालुका – निकाल
मोखाडा – ९८.१८
वाडा – ८९.२२
पालघर – ८७.८१
विक्रमगड – ८७.७९
वसई – ८६.६५
तलासरी – ८५.३१
डहाणू – ८३.१४
जव्हार – ८१.०१
