पालघर – पालघर जिल्ह्यात सुरू असलेले जिल्हा कारागृह हे राज्यातील सर्वात मोठे कारागृह असण्याची शक्यता आहे. कारागृहाचे बांधकाम उत्तम असून दहा टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे तर २०२७ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे मत राज्यमंत्री गृह (ग्रामीण) शालेय शिक्षण सहकार व खनिकर्म डॉ. पंकज भोयर यांनी जिल्हा कारागृह बांधकाम स्थळ पाहणी दरम्यान व्यक्त केले.

उमरोळी येथे सुरू असलेल्या जिल्हा कारागृह बांधकाम स्थळ पाहणी व जिल्ह्यातील पोलीस पाटलांच्या कार्यशाळेकरिता गृह (ग्रामीण) गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर तथा पालकमंत्री वर्धा जिल्हा हे पालघर येथे सोमवारी उपस्थित होते. यावेळी खासदार हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, हरिश्चंद्र भोये, विधी निदेशक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे व जिल्हयातील पोलीस पाटील उपस्थित होते.

मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या कारागृहाची पाहणी करण्याकरिता गृहमंत्री म्हणून मी आज येथे उपस्थित राहिलो. राज्यात कारागृहांची कमतरता असून जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या कारागृहामध्ये आवश्यकता भासल्यास राज्यातील कैद्यांना इथे स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे पंकज भोयर यांनी पत्रकारांना सांगितले.

पोलीस दलातील घटकांसाठी घर

मागील दहा वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलीस हाऊसिंग कौन्सिलच्या माध्यमातून अनेक वर्षापासून घरापासून वंचित राहिलेल्या पोलीस दलातील घटकांसाठी घर उभारणीचे प्रयत्न करण्यात येत होते. राज्यात मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या घराचे बांधकाम ठिकाणी सुरू आहे. त्याच पद्धतीचे पालघर येथील कारागृहाचे देखील बांधकाम सुरू असल्याचे भोयर यांनी यावेळी सांगितले.

पोलीस पाटलांची भूमिका महत्त्वाची

गाव पातळीवरील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील हा पोलीस प्रशासन आणि जनता यामधील महत्वाचा दुवा आहे. पोलीस पाटील हा गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था बजावण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत असतो. मागच्या अनेक वर्षापासून पोलीस पाटील हे तुटपुंज्या दोन ते तीन हजार मानधनावर काम करीत होते. परंतू पोलीस पाटील हा गावपातळीवर काम करणारा कार्यकर्ता असल्याने मुख्यमंत्री यांनी आता १५ हजार रुपये मानधन केले आहे. तसेच गेल्या काही वर्षापासून पोलीस पाटील यांची अनेक पदे रिक्त होती. ती रिक्त पदे तत्काळ भरून २८२ रिक्त पदे भरण्यात आली आहेत. उर्वरित रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील. असे त्यांनी पोलीस पाटलांच्या कार्यशाळे दरम्यान सांगितले.

पोलीस पाटलांनी डिजिटल होण्याची आवश्यकता

गावपातळीवर गुन्हेगारी ही वेगवेगळी होत असते. त्याकरीता अशा अडचणी सोडण्यासाठी पोलीस पाटील यांनी सक्षम होणे गरजेचे आहे. गुन्हेगारीबाबत पोलीस पाटील यांना प्राथमिक माहिती असणे आवश्यक आहे. आताच्या काळात प्रत्येक क्षेत्र हे डिजीटल होत असल्याने पोलीस पाटील यांना सुध्दा डिजीटल होणे आवश्यक आहे.

पालघर जिल्हा कारागृहाचा खर्च ४.४८ कोटी इतका असून या प्रशस्त अशा कारागृहात १२०० ते १५०० कैदी राहू शकतील इतकी क्षमता आहे. तसेच कारागृहात काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांकरिता ११० कर्मचारी निवास असणार आहेत. या कारागृहात कैदी खाना, कर्मचारी निवास व कैद्यांकरिता रुग्णालय देखील उभारण्यात येणार आहे. – खासदार डॉ. हेमंत सवरा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.