पालघर : शासन एकीकडे वाचन संपदा वाढविण्यावर भर देत असताना पालघर जिल्ह्यात मात्र विसंगत चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात आठ तालुक्यांमध्ये एकूण ३५ शासनमान्य वाचनालये असली, तरी त्यातील सर्वाधिक वाचनालये वसई-विरार सारख्या शहरी भागात एकवटली आहेत. यामुळे डहाणू व मोखाडा या ग्रामीण आणि आदिवासी भागात एकही सुसज्ज वाचनालय नसल्याने येथील तरुण पिढी आजही ग्रंथालयांच्या प्रतीक्षेत आहे. तसेच मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पालघर नगर परिषद हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून धुळखात पडलेले वाचनालय देखील लवकरच अद्यावत होणार आहे.

जिल्ह्यातील ३५ शासनमान्य वाचनालयांमध्ये ३ लाखांहून अधिक पुस्तके असून १७०० ते १८०० वाचक सभासद आहेत. यामध्ये स्पर्धा परीक्षा, कृषी, शालेय, राजकारण आणि इतिहास अशा विविध विषयांवरील पुस्तकांचा संच उपलब्ध आहे. या वाचनालयांकरिता शासनाकडून एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे. मात्र, ग्रामीण भागात अद्याप सुसज्ज वाचनालये नाहीत. या भागातून वाचनालयाकरिता प्रस्ताव व आवश्यक निकष प्राप्त झाल्यास नवीन वाचनालये उभारली जाऊ शकतात, अशी आशा जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

३५ वाचनालयांमध्ये वसई तालुक्यात एक तालुका ग्रंथालय असून १९ इतर ग्रंथालय आहेत. उर्वरित १६ वाचनालयांपैकी आठ वाचनालये एकट्या पालघर तालुक्यात असून, जव्हार तालुक्यात एक तालुका ग्रंथालय, तलासरी येथील दोन, वाडा येथे एक तालुका ग्रंथालय व इतर दोन ग्रंथालय तर विक्रमगड येथे एक ग्रंथालय आहे.

मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळाला असून २७ फेब्रुवारी रोजी सर्वत्र ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा होत आहे. वाचन संस्कृती आणि ग्रंथ वाचन चळवळ वृद्धिंगत करण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी ग्रामीण भागातील तरुण पिढीला वाचनालयेच उपलब्ध नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. दुसरीकडे सफाळे, चटाळे, माहीम, केळवे, माकुणसार, जव्हार, वाडा आणि बोईसर या भागात उभारलेल्या प्रशस्त वाचनालयांचा लाभ स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांना व ज्येष्ठ नागरिकांना मिळत आहे.

पालघर नगरपरिषदेचे वाचनालय धुळखात

जिल्हा मुख्यालय असलेल्या पालघर शहरात नगरपरिषदेच्या वाचनालयाची अवस्था अतिशय दयनीय आहे. टेंभोडे येथे पूर्वी सुरू असलेले वाचनालय अपुऱ्या सुविधांमुळे अकार्यक्षम ठरवून बंद करण्यात आले व नगर परिषदेकडे हस्तांतरित झाले. त्यानंतर रेल्वे स्थानकाजवळील जुन्या इमारतीत ते काही काळ चालले. नगरपरिषद स्थलांतरित झाल्यानंतर बीएसएनएल कार्यालयाजवळ ‘सावित्रीबाई फुले वाचनालय’ सुरू करण्यात आले. सन २०२४ मध्ये याचे नव्याने उद्घाटन होऊनही हे वाचनालय सध्या बंद अवस्थेत आहे. विशेष म्हणजे ज्या इमारतीत हे वाचनालय आहे, ती इमारत नगररचना विभागाने ‘अतिधोकादायक’ जाहीर केली आहे.

वाचनालय अद्यावत करण्याचे नगरपरिषदेच्या विचाराधीन

पुस्तकांचा अभाव आणि सुसज्ज व्यवस्थेअभावी नगरपरिषदेच्या वाचनालय धुळखात पडले आहे. याबाबत नगराध्यक्ष उत्तम घरत यांच्याकडे विचारणा केली असता, पालघर-बोईसर मार्गावरील गोठणपूर जवळील पाण्याच्या टाकीच्या आरक्षित जागेत अद्यावत वाचनालय तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थसंकल्पातील निधीतून हे काम पूर्ण केले जाणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वाचनालयाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नगरपरिषदेचे वाचनालय बंद असले तरी, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील वाचनालयाला मात्र तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. येथे १५ हजारांहून अधिक पुस्तके असून साडेतीनशे सदस्य नोंदणी झाली आहे. दररोज ४० ते ५० मुले अभ्यासाकरिता येथे येतात. स्पर्धा परीक्षा, बालसाहित्य, ग्रंथालय, शब्दकोश आणि कायदेविषयक पुस्तके येथे उपलब्ध आहेत. अवघ्या ५० रुपये मासिक फीमध्ये विद्यार्थी पुस्तके घरी नेऊन वाचण्याची सुविधा घेत आहेत.

वाचनवेल एक काही उत्कृष्ट उपक्रम

पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील ‘रा. ही. सावे ग्रंथालय’ आणि महाविद्यालयाने सुरू केलेला ‘वाचनवेल’ हा उपक्रम गेल्या वर्षभरापासून यशस्वीरीत्या सुरू आहे. दर रविवारी चिकूच्या बागेत किंवा निसर्गरम्य ठिकाणी भरणाऱ्या या उपक्रमात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक वाचक सहभागी होतात, ज्यामुळे मोबाईलपासून काही काळ विश्रांती मिळत असल्याची भावना वाचकांनी व्यक्त केली आहे.जिल्हा मुख्यालय असलेल्या पालघर शहरात नगरपरिषदेचे एकही उत्तम वाचनालय सध्या अस्तित्वात नाही. नवीन पिढीला ग्रंथ संपदा उपलब्ध करून देण्यात नगर परिषद अपयशी ठरत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे- पांडुरंग तेजे, पुस्तकप्रेमी (ज्येष्ठ नागरिक)

जिल्ह्यात शासनमान्य वाचनालयांची अत्यंत गरज आहे. गरीब मुलांना विनामूल्य पुस्तके उपलब्ध झाल्यास त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळू शकते. नगरपरिषद, ग्रामपंचायत आणि शासनाने वाचन संस्कृती वाढवण्यासाठी वाचनालयांच्या संख्येवर भर द्यावा. -अमोल पाटकर, प्रमुख, जिल्हाधिकारी कार्यालय सार्वजनिक ग्रंथालय