पालघर जिल्ह्यामध्ये झालेल्या पालघर, डहाणू व जव्हार नगरपरिषद तसेच वाडा नगरपंचायत करिता झालेल्या दरम्यान शिवसेना (शिंदे) पक्षाने पालघर व डहाणू या शहरांमध्ये भरघोस मताधिक्क्याने विजय मिळवला असून जव्हार व वाडा येथे भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

पालघर मध्ये शिवसेनेने आपले पूर्वीप्रमाणे वर्चस्व राखले असून भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. चार वेळा उपनगराध्यक्ष पद भूषविलेले उत्तम घरत यांनी (शिवसेना शिंदे) भाजपाच्या कैलास म्हात्रे यांचा ५१५३ मतांनी पराभव केला. पालघर मध्ये ३० सदस्यांच्या जागांपैकी शिवसेना (शिंदे) पक्षाला १९, भाजपाने आठ तर शिवसेना (ठाकरे) पक्षाने तीन जागांवर विजय मिळवला आहे.

डहाणू मध्ये भाजपाची सत्ता शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रित प्रयत्नाने उलटवून लावली. गतवेळीचे भाजपाचे नगराध्यक्ष तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या शिवसेना (शिंदे) पक्षाच्या राजेंद्र माच्छी यांनी ४०५५ मतांनी दारुण पराभव केला आहे. डहाणू मधील २७ सदस्यांच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने १७, राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेस पक्षाने आठ तर शिवसेना (शिंदे) पक्षाने दोन जागांवर विजय संपादन केला.

जव्हार येथे भाजपाच्या उमेदवार पूजा कुणाल उदावंत यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार रश्मीन मनियार (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) यांचा १६५३ मताधिक्क्याने पराभव केला. जव्हार मध्ये भाजपाचे १४, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे तीन, शिवसेना (शिंदे) पक्षाचे दोन तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा एक नगरसेवक निवडून आले आहेत.

प्रतिष्ठेच्या ठरलेल्या वाडा नगरपंचायतीमध्ये भाजपाच्या रिमा हर्षद गंधे यांनी शिवसेना (शिंदे) पक्षाच्या हेमांगी हिरामण पाटील यांचा ९७२ मतांनी पराभव केला. वाडा नगरपंचायतीच्या १७ जागांपैकी भाजपाने ११, शिवसेना शिंदे पक्षाने तीन तर शिवसेना ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार व काँग्रेस पक्षाने प्रत्येकी एक जागा मिळाली.

मतमोजणी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. विजय उमेदवारांनी निकालानंतर पक्षीय नेते व कार्यकर्त्यांच्या समवेत मिरवणुका काढून आनंद व्यक्त केला. मतमोजणी अधिकतर शांततेत संपन्न झाली.