पालघर : पालघर जिल्ह्याचा अथांग नैसर्गिक वारसा, ऐतिहासिक किल्ले आणि जागतिक कीर्तीची आदिवासी संस्कृती समाज माध्यमातून सातासमुद्रापार पोहोचणार आहे. ‘नॉर्थ कोकण चेंबर ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर’ तर्फे ‘इंडिया टुरिझम’, ‘महाराष्ट्र टुरिझम’ आणि ‘पालघर जिल्हा पर्यटन विकास वेलफेअर असोसिएशन’ यांच्या सहकार्याने “द पालघर जिल्हा रील कॉम्पिटिशन २०२६” या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

पालघर म्हणजे केवळ समुद्रकिनारे नव्हे, तर जागतिक वारसा असलेली ‘वारली चित्रकला’ आणि लयबद्ध ‘तारपा नृत्य’ यांची भूमी आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांवरील जीवनशैली, पारंपरिक उत्सव, गडकिल्ले आणि स्थानिक खाद्यसंस्कृती जगासमोर आणण्याचा मानस आहे. यामुळे दुर्गम भागातील पर्यटनाला आणि स्थानिक हस्तकलेला मोठी बाजारपेठ मिळण्याची शक्यता आहे.

सागरी लाटांचा नाद, सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील लपलेली निसर्गरम्य ठिकाणे आणि प्राचीन गड-किल्ले आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याचे आवाहन तरुणांना करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी १ लाख रुपयांचा बक्षीस साठा ठेवण्यात आला असून, विजेत्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

डिजिटल कंटेंट तयार करण्यासाठी ठरणार उपयुक्त

पालघर जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळण्यासाठी येथील पर्यटन स्थळांचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे. मात्र डिजिटल प्लॅटफॉर्मवर पालघर जिल्ह्यातील सौंदर्य स्थळ, ऐतिहासिक ठिकाणे, तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती उपलब्ध नाही. या स्पर्धेच्या माध्यमातून डिजिटल कन्टेन्ट तयार होऊन आगामी काळात तो विविध संकेतस्थळावर व समाज माध्यमांवर प्रसारित करणे शक्य होणार आहे.

स्पर्धेचे मुख्य विषय

१) पालघर ६० सेकंदात : जिल्ह्याचा वेगवान प्रवास.
२) लपलेली रत्ने : कोणालाही माहित नसलेली सुंदर पर्यटन स्थळे.
३) माझा पालघर, माझा अभिमान : जिल्ह्याची प्रगत प्रतिमा.
४) संस्कृती आणि वारसा : आदिवासी कला, सण आणि ऐतिहासिक वारसा.
५) पालघरची चव : अस्सल कोकणी आणि आदिवासी खाद्यसंस्कृती

पालघरच्या पर्यटनाला चालना देतानाच येथील समृद्ध आदिवासी संस्कृतीचे ब्रँडिंग करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. वीणा वर्ल्ड, कामरे व्हॅली, माऊली ॲग्रो टुरिझम आणि कोबो यांच्या सहकार्यामुळे या स्पर्धेला मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे.- निमिश सावे, अध्यक्ष, नॉर्थ कोकण चेंबर ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर

सहभागासाठी महत्त्वाचे

  • नोंदणीची शेवटची तारीख: ५ फेब्रुवारी २०२६
  • रील सादर करण्याची अंतिम तारीख: २२ फेब्रुवारी २०२६
  • नोंदणीसाठी लिंक: https://nkcca-six.qobo.dev
  • संपर्क: ९९७०११४२२३
  • इन्स्टाग्राम: @nkccaofficial