पालघर : यंदा पाचवी व आठवी इयत्ता तसेच चौथी व सातवी इयत्तेसाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जाणार असून या परीक्षेसाठी आतापर्यंत ३१ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नोंदणी शुल्क जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून भरला जाणार असून अधिकाधिक विद्यार्थी या परीक्षेत सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
गेल्या काही वर्षांपासून इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसवले जात असे. मात्र शासनाच्या नवीन आदेशानुसार जुन्या पद्धतीने नुसार पुन्हा चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेला बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने यंदा चार इयत्तेच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेला बसण्याची मुभा आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत बसावे असे शासनाकडून धोरण राबवले जात असले तरीही विद्यमान वर्षी शाळेतील निपुण व प्रतिभावंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत बसण्याची संधी देण्यात येत आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळांना सहभाग घेताना २०० रुपयांचा संलग्नता शुल्क भरावा लागत असून प्रत्येक विद्यार्थ्यामागे सव्वाशे रुपयांचा शुल्क आकारणी करण्यात येत आहे. जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषद सदस्य हा शुल्क उपलब्ध करून दिला जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून प्राप्त झाली आहे.
२२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिष्यवृत्ती स्पर्धेत जिल्ह्यातील पाचवी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या १४ हजार ९४ विद्यार्थ्यांचा तर इयत्ता आठवीसाठी आठ हजार ८४९ विद्यार्थ्यांचा असा एकंदर सुमारे २३ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग निश्चित झाला आहे. तर २६ एप्रिल रोजी नियोजित असणाऱ्या इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ४३८१ व सातवी इयत्तेच्या परीक्षेसाठी ३११९ अशा ७५०० विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले असून शिष्यवृत्ती परीक्षेत अर्ज दाखल करण्यासाठी अजूनही महिनाभराचा अवधी शिल्लक असल्याची माहिती पुढे आली आहे.
निपुण विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती स्पर्धेत सहभाग
पालघर जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवी दरम्यान शिकणाऱ्या सुमारे एक लाख १९ हजार विद्यार्थ्यांना निपुण बनवण्यासाठी विशेष उपक्रम राबवला जात असून या विद्यार्थ्यांपैकी ६३ हजार पेक्षा अधिक विद्यार्थी हे निपुण झाले आहेत. त्याचबरोबरने ३८ हजार पेक्षा अधिक विद्यार्थी हे एल ३ (५०-८० टक्के प्राविण्य) गटात असून अशा प्रतिभावंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्याचे नियोजन जिल्हा परिषदेत मार्फत केले जात आहे. याखेरीज राज्य परीक्षा मंडळाच्या अभ्यासक्रम शिकवणाऱ्या खाजगी व अनुदानित शाळा, तसेच सीबीएससी शाळांमधील विद्यार्थी देखील शिष्यवृत्ती परीक्षेत भाग घेत असल्याची माहिती पुढे आली आहे.

