पालघर : नवी दिल्ली येथे भरविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सव २०२६ अंतर्गत विकासित भारत युवा नेत्यांच्या परिसंवादात (Viksit Bharat Young Leaders Dialogue (VBYLD) या प्रतिष्ठित ट्रॅकसाठी महाराष्ट्र राज्याच्या संघात पालघरच्या डॉ. गार्गी राजेश पाटील यांची निवड झाली आहे. डॉ. गार्गी राजेश पाटील या ग्रँट गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आणि सर जे. जे. ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स, मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण घेत असून राज्यस्तरीय अंतिम निकालात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला आहे.
भारत सरकारच्या युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालय व माय भारत (MY Bharat) उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात येणारा हा राष्ट्रीय युवा महोत्सव १० ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान भारत मंडपम, नवी दिल्ली येथे संपन्न होणार आहे. या महोत्सवात देशभरातील निवडक युवा नेतृत्व विकास, नवोन्मेष, धोरणात्मक विचार आणि ‘विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित संवादात सहभागी होणार आहेत.
डॉ. गार्गी राजेश पाटील यांनी मांडलेली ‘निसर्गवेद’ ही संकल्पना अत्यंत प्रभावशाली असून भावी भारताला शाश्वत प्रगतीसाठी निसर्गाचा समतोल राखण्याचे मार्ग दर्शविणारी आहे. राज्यस्तरीय निवड प्रक्रियेत सादर केलेली अभ्यासपूर्ण मांडणी, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकी यामुळे त्यांची निवड निश्चित झाली आहे. या स्पर्धेतील त्यांचे हे यश केवळ वैयक्तिक नसून महाराष्ट्राच्या शैक्षणिक व युवा नेतृत्व परंपरेला उज्ज्वल करणारे आहे. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतून स्पर्धेच्या पहिल्या ऑनलाईन फेरीमध्ये हजारो स्पर्धकांमधून १२,२१९ स्पर्धकांना निबंध लेखनासाठी निवडण्यात आले. या निबंधांपैकी डॉ. गार्गी राजेश पाटील यांचा निबंध सादरीकरणासाठी उत्कृष्ट ५०८ मध्ये निवडला गेला.
त्यानंतर मुलाखतीसाठी अव्वल ७८ मध्ये त्यांची निवड झाली आणि आता महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वोत्तम ४५ जणांमध्ये त्यांचा समावेश होणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून ‘निसर्गवेद’ या त्यांच्या स्वनिर्मित नवकल्पनेचा प्रचार व प्रसार करून भावी काळात युवकांना सातत्याने मार्गदर्शन करण्याचा त्यांचा मानस आहे. प्राप्त केलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल समाजातील विविध स्तरांवर त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
