पालघर: थोर समाजसुधारक, ज्येष्ठ निरूपणकार तथा ‘महाराष्ट्र भूषण’ डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण पालघर जिल्ह्यात रविवारी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने आयोजित या मोहिमेला जिल्ह्यातील हजारो श्रीसदस्यांनी जवळपास 36 टन ओला व सुका कचरा गोळा करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

“मनुष्य ही जात आणि मानवता हाच धर्म” ही भावना समाजात रुजविणाऱ्या या प्रतिष्ठानच्या वतीने केवळ आध्यात्मिकच नव्हे, तर राष्ट्रउभारणीचे कार्य प्रत्यक्ष श्रमदानातून केले जात असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. पालघर शहरामध्ये ७०० हून अधिक श्रीसदस्यांनी एकत्र येत गल्लीबोळांपासून मुख्य रस्त्यांपर्यंत सर्वत्र स्वच्छता केली. या मोहिमेत गोळा झालेला सुका व ओला कचरा खासगी वाहनांच्या साहाय्याने डम्पिंग ग्राऊंडवर पोहोचविण्यात आला.

प्रतिष्ठानतर्फे सर्व सदस्यांना हातमोजे, झाडू आणि मास्कचे वाटप करण्यात आले होते. या अभियानास जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, आमदार राजेंद्र गावित, पालघर चे नगराध्यक्ष उत्तम घरत, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे, संजय चौधरी यांसह विविध सभापती व नगरसेवकांनी उपस्थित राहून श्रीसदस्यांच्या कार्याचे कौतुक केले. पालघर जिल्ह्यात या मोहिमेत एकूण ३५.९७ किलो कचरा (९.४४ किलो ओला आणि २६.५३ किलो सुका कचरा) संकलित करण्यात आला.

जव्हार शहरातही सकाळी ७ ते ११:३० या वेळेत व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सुमारे ३५२ श्रीसदस्यांनी शहराचा चेहरामोहरा बदलून टाकला. विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी प्रत्यक्ष खराटा हाती घेऊन या मोहिमेत सहभाग घेतला. जव्हारमधील विजयस्तंभ, जिल्हा आरोग्य कार्यालय, स्टेडियम परिसर, पोलीस अधीक्षक कार्यालय, तहसील व पंचायत समिती कार्यालय, तसेच विविध मंदिरे आणि पर्यटन स्थळांची स्वच्छता करण्यात आली.

या मोहिमेत २ ट्रॅक्टर आणि ६ कचरा गाड्यांच्या साहाय्याने ५० हजार चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्र स्वच्छ केले गेले. जव्हारमध्ये १०.९०० टन सुका कचरा आणि १ टन ओला कचरा संकलित करण्यात आला असून, ओला कचरा वाहून नेण्यासाठी ट्रॅक्टरच्या २६ फेऱ्या करण्यात आल्या. प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.

पालघर, डहाणू, तलासरी, उंबरगाव व सेलवास परिसरातील २३०० स्वयंसेवक या मोहिमेत सहभागी झाले होते. यादरम्यान सुमारे साडेनऊ टन सुका कचरा व २६.५३ टन ओला कचरा गोळा करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पाठवण्यात आला. या उपक्रमांवर अनेक ठिकाणी परिसरामध्ये अमुलाग्र बदल झाल्याचे दिसून आले.

प्रतिष्ठानच्या कार्याची गौरवशाली परंपरा

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची स्थापना १९४२ मध्ये झाली असून, आजही सामाजिक प्रबोधन, आरोग्य शिबिरे, रक्तदान, वृक्षलागवड आणि जलसंवर्धन यांसारखे उपक्रम अविरत सुरू आहेत. प्रतिष्ठानच्या या कार्याची दखल घेत शासनाने डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ आणि डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘पद्यश्री’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना ‘स्वच्छता दूत’ म्हणून गौरविले आहे. २०१४ मध्ये प्रतिष्ठानच्या स्वच्छता अभियानाची नोंद ‘लिमका बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली होती. केवळ प्रतीकात्मक कार्यक्रम न करता प्रत्यक्ष कृतीतून शहर स्वच्छ करण्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.