पालघर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल फेर परीक्षण (पुनरीक्षण – एस आय आर) प्रक्रियेअंतर्गत महाराष्ट्राची प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील प्रत्येक पात्र मतदाराने स्वतःचेच नव्हे, तर कुटुंबातील प्रत्येक मतदाराचे नाव मतदार यादीत आहे की नाही, याची काळजीपूर्वक पडताळणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.
प्रारूप मतदार यादीत नाव आढळले नाही म्हणून पात्र मतदारांनी घाबरून जाण्याचे कारण नसून ३० सप्टेंबर २०२६ पर्यंतच्या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. प्राप्त होणाऱ्या दावे-हरकतींची सुनावणी व निराकरणाची प्रक्रिया २९ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वरे कळविले आहे.
नावासोबत ‘या’ बाबीही तपासा
प्रारूप मतदार यादी तपासताना केवळ नाव आहे की नाही, एवढेच पाहणे पुरेसे नसून मतदारांनी पुढील तपशीलांचीही खात्री करावी
मतदाराचे नाव अचूक आहे का?
वडिलांचे किंवा पतीचे नाव योग्य आहे का?
वय अथवा जन्मतारीख आणि लिंगाची नोंद बरोबर आहे का?
छायाचित्र व पत्ता योग्य आहे का?
मतदार ओळखपत्र क्रमांक EPIC अचूक आहे का?
नेमून दिलेले मतदान केंद्र योग्य आहे का?
विशेषतः वृद्ध नागरिक, शिक्षण किंवा नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेले सदस्य, स्थलांतरित नागरिक तसेच SIR प्रक्रियेदरम्यान ज्यांचे गणना प्रपत्र (Enumeration Form) भरले गेले नाही किंवा ज्यांची पडताळणी पूर्ण होऊ शकली नाही, अशा मतदारांची नावे कुटुंबीयांनी आवर्जून तपासावीत.
नाव नसल्यास अर्ज ६ द्वारे मतदार नोंदणी करण्याची संधी अजूनही खुली
प्रारूप मतदार यादी ही अंतिम यादी नसल्याने पात्र मतदाराचे नाव त्यात नसल्यास ‘आता काही करता येणार नाही’, असा गैरसमज मतदारांनी करून घेऊ नये. नवीन मतदार नोंदणी किंवा पात्र असूनही प्रारूप यादीत नाव नसल्यास आवश्यक कागदपत्रे व घोषणापत्रासह नमुना क्रमांक ६ (Form 6) द्वारे दावा सादर करता येणार आहे.
मतदाराच्या नावात, पत्त्यात, वय किंवा जन्मतारखेत, छायाचित्रात अथवा अन्य तपशिलात त्रुटी असल्यास नमुना क्रमांक ८ (Form 8) द्वारे दुरुस्तीचा अर्ज करता येईल.
अनुपस्थित, स्थलांतरित, मृत व दुबार मतदारां याबाबत विशेष काळजी घ्यावी
पूर्वीच्या मतदार यादीत नाव असले, मात्र SIR प्रक्रियेदरम्यान अनुपस्थित, स्थलांतरित, मृत व दुबार मतदार Absent/Shifted/Dead/Duplicate (ASDD) या प्रवर्गात नोंद झालेले मतदार किंवा ज्यांची पडताळणी पूर्ण होऊ शकली नाही, अशा मतदारांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव आवर्जून तपासावे.
पात्र मतदार असल्यास संबंधितांनी उपलब्ध अधिकृत सुविधेद्वारे आपली स्थिती तपासून, विहित मुदतीत आवश्यक अर्ज व कागदपत्रे सादर करावीत असे आवाहन करण्यात आले आहे.
मतदार यादी कुठे तपासाल?
प्रारूप मतदार यादी आणि मतदार नोंदणीसंबंधी माहिती महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ, भारत निवडणूक आयोगाचे Voters’ Service Portal, तसेच मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडूनही मतदार यादीची माहिती घेता येईल.
दावा किंवा दुरुस्ती अर्ज करण्याची आवश्यकता भासल्यास मतदारांनी ओळख, वय/जन्मतारीख, रहिवास यासंबंधी लागू असलेले आवश्यक पुरावे तसेच २००२ च्या मतदार यादीतील उपलब्ध तपशील तयार ठेवावेत. कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याची खात्री अधिकृत निवडणूक पोर्टल किंवा संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडून करून घ्यावी.
‘प्रारूप यादी म्हणजे दुरुस्तीची संधी’
सांगितले, “प्रारूप मतदार यादीत नाव नसल्यास मतदारांनी घाबरून जाऊ नये. ही अंतिम मतदार यादी नसून पात्र मतदारांना दावे व हरकती दाखल करण्याची संधी उपलब्ध आहे. प्रत्येक नागरिकाने स्वतःचे तसेच कुटुंबातील सर्व पात्र मतदारांचे नाव, पत्ता, वय, छायाचित्र, इपिक EPIC क्रमांक आणि मतदान केंद्राची माहिती काळजीपूर्वक तपासावी. काही त्रुटी किंवा नाव वगळलेले आढळल्यास शेवटच्या तारखेची वाट न पाहता विहित नमुन्यात तातडीने अर्ज सादर करावा.” – डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हाधिकारी
महत्त्वाच्या तारखा
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध : ३१ ऑगस्ट
दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी : ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर
दावे-हरकतींची सुनावणी व निराकरण : ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध : ४ नोव्हेंबर
