पालघर : पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा व तलासरी तालुक्यांना दुष्काळी घोषित करण्यात आले असून उर्वरित पाच तालुक्यांना दुष्काळी तालुक्याच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याच्या दृष्टीने आवश्यक कागदपत्रे व दुष्काळी निकषांची पूर्तता करणारा पाठपुरावा जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येईल असे प्रतिपादन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले आहे.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत जनसेवक महाकुंभ तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० च्या शुभारंभ करण्याच्या कार्यक्रमानिमित्त पालकमंत्री पालघर जिल्हा मुख्यालय संकुलात उपस्थित होते. पालघरचे आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालघर जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये प्रथम निर्माण झालेली महापुराची परिस्थिती व नंतर जिल्ह्यात सर्वत्र पावसाने घेतलेली उघडीप अशा परिस्थितीत शासकीय निकषांमध्ये (ट्रिगर- एक व ट्रिगर- दोन) जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा व तलासरी तालुक्यांचा समावेश झाला असला तरीही उर्वरित पाचही तालुक्यांमध्ये परिस्थिती भीषण असल्याचे पालक मंत्री यांनी मान्य केले. धरणांमधील पाणी व इतर जलस्त्रोत्रांमधून भात पीक वाचवण्यासाठी तसेच रब्बी पिकांच्या मशागतीसाठी पाण्याच्या व्यवस्थापन करण्यासंदर्भात संबंधित विभागाला सूचना देऊन आराखडा करण्यात येत आहे. दुष्काळ घोषित करण्यासाठी आवश्यक निकषांची पूर्तता होत असल्यासंदर्भात पुरावे गोळा करून शासनातर्फे ट्रिगर- तीन अंतर्गत उर्वरित पास तालुक्यांचे दुष्काळी म्हणून समावेश करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाला कागदोपात्री पुराव्यांची पूर्तता करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री यांनी दिली.

जिल्ह्यामध्ये कुठल्याही ठिकाणी वाहाने धुणे, बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरणे व इतर प्रकारे अनावश्यक पाण्याचा वापर टाळायला पाहिजे असे पालकमंत्री गणेश नाईक यांनी या कार्यक्रमात प्रतिपादन करत या दृष्टीने प्रशासनाने लक्ष द्यायला हवे असे सांगितले. औद्योगिक क्षेत्रात निर्मित सांडपाणी तसेच एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया केंद्र) मधील पाण्याचा पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखण्यात याव्यात अशा सूचना त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. घरगुती तसेच औद्योगिक क्षेत्रातील पाण्याच्या वापरामधून होणारी चोरी शोधून काढण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करायला हवेत असे सांगत नागरिक व जनावरांसाठी मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा उपलब्ध राहावा या दृष्टीने आखणी केली जात असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. विहिरी व इतर पाण्याचे स्त्रोत्र मानवी वस्त्यांसाठी महत्त्वपूर्ण असून नागरिकांचे जीवन धोक्यात येता कामा नये यासाठी प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यांनी लक्ष द्यायला हवे असे त्यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सर्व स्तरांवर प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

पालघर जिल्ह्यातील उर्वरित पाच तालुके दुष्काळी घोषित करण्यासाठी कागदोपत्री पाठपुरावा करणार- पालकमंत्री गणेश नाईक (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना च्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीने केलेल्या नेत्रदीपक कामगिरी संदर्भात माहिती दिली. या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात सर्व ग्रामपंचायतने सक्रिय सहभाग घ्यावा व या कामी सरपंच व इतर सदस्यांनी त्यात लक्ष घालावे असे त्यांनी आवाहन केले. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जिल्हा आठव्या स्थानावर राहिला असल्याचे सांगत दुसऱ्या टप्प्यात जिल्हा राज्यात पहिल्या तीन क्रमांकांमध्ये येण्यासाठी प्रयत्न करेल असे त्यांनी नमूद केले.

पालकमंत्री गणेश नाईक यांनी शासन, प्रशासन तसेच जनप्रतिनिधी यांनी एकत्रित व समरस होऊन काम काम करण्याची भावना जोपासणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. शुद्ध पाणी, शिक्षण आरोग्य, उपजीविका व आपल्या क्षेत्रातील कुटुंबाला सुख संपन्न बनवण्यासाठी या योजनेअंतर्गत प्रयत्न करायला हवेत तसेच जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीला बळ देण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी प्रयत्न करावेत असे त्यांनी नमूद केले.

उपजिल्हाधिकारी रंजीत देसाई यांनी सेवा संकल्प अभियानांतर्गत जनसेवक महा कुंभ योजनेअंतर्गत शासनाच्या २७ सेवा अंतर्गत सुमारे सव्वा लाख नागरिकांनी लाभ घेतल्याची माहिती दिली. यामध्ये सुमारे २० हजार महिलांना शेतकरी असल्याचा दाखला देणे, जिल्ह्यात २० ठिकाणी रोजगार मिळावे आयोजित करणे, सामाजिक दायित्व निधी व सेवाभावी संस्थान करिता विशेष परिषदेचे आयोजन करणे, तसेच सेवा माझे योगदान, सेवा ज्योत यात्रा, विविध स्पर्धांचे आयोजन, अंगणवाडी उत्सवाच्या आयोजन, आशीर्वादाचा दिवा अंतर्गत उपक्रम व सेवा संकल्प यात्रा योजनेअंतर्गत झालेल्या कामाची माहिती दिली.

बिबट्यांचा वावरा संदर्भात सतर्कता व्यवस्था राबवणार

पालघर जिल्ह्यात व विशेषतः पालघर व डहाणू तालुक्यात बिबट्याचा नागरी वस्ती मधील वावर वाढल्याने पत्रकारांनी पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे चिंता व्यक्त केली. राज्यात गेल्या काही वर्षात बिबट्यांची संख्या चार ते पाच पटीने वाढल्याची त्यांनी सांगून अप्रिय घटना घडू नयेत म्हणून नागरी वस्तींमध्ये बिबट्यांचा वावर आढळल्यास सतर्कत करणारी व्यवस्था कार्यान्वित करण्याचे सूचना वनविभाग व इतर विभागाला देण्यात आले असल्याचे सांगितले. या कामी सॅटॅलाइट तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून या कामी सर्व यंत्रणांनी सहकार्य करण्या संदर्भात आवाहन केले.