पालघर : पालघर शहरातील प्रमुख रस्त्यांवर विशेषतः सायंकाळच्या वेळी भाजीपाला, खाद्यपदार्थ व इतर विक्रेत्यांकडून व्यापल्या जाणाऱ्या रस्त्यांमुळे अनेक अपघात घडत असून अशा रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेतांविरुद्ध नगरपरिषदेने आश्वासन देऊन देखील दोन महिन्यांपासून कारवाई करण्यास टाळाटाळ केली आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता असून पादचार्‍यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पालघर रेल्वे स्थानकापासून माहीम रोड, मनोर रोड तसेच टेंभोडे मार्गावर रस्त्यालगत अनेक ठिकाणी भाजीपाला व फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या, रस्त्याकडेला बसून अनेक वस्तूंची विक्री करणारे व्यावसायिक, तसेच विविध खाद्य पदार्थांच्या गाड्या व इतर गाड्या च्या माध्यमातून होणाऱ्या विक्रीमुळे रस्त्याचा निम्मा भाग त्यांच्यामुळे तसेच खरेदी करणाऱ्या नागरिकांमुळे व्यापला जात आहे. शिवाय अनेक दुकानदारांनी आपल्या आस्थापनेच्या क्षेत्राबाहेर वाढीव बांधकाम केले असून इतर काही दुकानदारांनी आपल्या दुकानातील वस्तू, जाहिरातीचे बोर्ड पादचारी पथावर उभारल्याचे दिसून आले आहे.

पालघरच्या अतिक्रमणाविषयी नगराध्यक्ष उत्तम घरत यांच्याकडे विचारणा केली असता आर्थिक वर्षाखेरीस कर वसुलीमध्ये कर्मचारी व्यस्त असल्याने हे काम होत नसल्याचे सांगण्यात आले. मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून अतिक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी विशेष पथक कार्यरत राहतील असे त्यांनी आश्वासित केले होते. प्रत्यक्षात जून महिना उजाडला असला तरी गेल्या दोन महिन्यात एकदाही अतिक्रमण काढण्यासाठी पथक फिरले नसल्याचे दिसून आल्याने काही नगरसेवक यांचे रस्त्याकडेला असणाऱ्या विक्रेत्यांबरोबर असणारे हितसंबंध या कारवाईत अडथळा निर्माण करत असल्याचे सांगितले जात आहे.

या विषयी उत्तम घरत यांच्याशी संपर्क साधला असता येत्या काही दिवसात व पावसाळ्यापूर्वी शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण दूर करण्यात येईल असे सांगितले. जनगणना व विशेष मतदार परीक्षण मोहिमेमध्ये नगरपरिषदेचे कर्मचारी व्यस्त राहिल्याने अतिक्रमणाविरुद्ध कारवाई करण्यास विलंब झाल्याचे त्यांनी कारण सांगितले

पालघर बायपास अतिक्रमणासाठी ठरली पर्वणी

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्वतंत्रवीर सावरकर चौक दरम्यानच्या पालघर बायपास मार्गेके वर दुतर्फा अतिक्रमण झाल्याचे दिसून येत आहे. प्रमुख चौकांमध्ये असणारे अतिक्रमण दूर करण्यास नगर परिषद कुचकामी ठरली आहे. याखेरीज नाना-नानी पार्क समोरील रस्त्यावर उभे ठेवण्यात येणारे ट्रक, टेम्पो व त्या लगत उभारण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर नियंत्रण ठेवण्यास नगरपरिषद अपयशी ठरले आहे.

या मार्गावर अनधिकृत मासळी बाजार रस्त्याच्या कडेला भरला जात असून विविध बाजारांचे विकेंद्रीकरण करण्यास नगर परिषद अपयशी ठरली आहे. टेंभोड रस्त्यावर काही ठिकाणी कायमस्वरूपी बांधकाम करण्यात आले असून अरुंद रस्त्यांवर झालेल्या अपघातात रस्त्याकडेला असणारे अतक्रमण कारदेखील ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.