डहाणू : पालघर जिल्ह्यातील जव्हार भागात परराज्यातून होणाऱ्या बेकायदेशीर मद्य तस्करीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. उत्पादन शुल्क विभाग डहाणू आणि पालघर भरारी पथकाने १६ जुलै रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून ही कारवाई केली. यात एका आलीशान कारसह पिकअप गाडी आणि मोठ्या प्रमाणावर अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण ३३ लाख ८४ हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली कारवाई जव्हार-खानवेल रस्त्यावरील एका ढाब्यासमोर करण्यात आली. या ठिकाणी संशयास्पद वाटलेली महिंद्रा कंपनीची बोलेरो मॅक्स पिकअप गाडी थांबवून तपासणी केली असता, त्यात अन्नपदार्थांच्या आडून लपवून ठेवलेला बेकायदेशीर विदेशी दारूचा साठा आढळून आला. या कारवाईत ९ लाख रुपये किमतीची पिकअप गाडी आणि मद्यसाठा जप्त करण्यात आला. दुसरी कारवाई जव्हार-खंबाळे रस्त्यावरील रातुना फाट्याजवळ करण्यात आली. या ठिकाणी संशयित फोर्ड कंपनीची इंडेव्हर ही आलीशान कार अडवून झडती घेतली असता त्यातूनही मोठ्या प्रमाणावर अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईत १० लाख रुपये किमतीची ही कार आणि दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.

या दोन्ही कारवायांमध्ये दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात विक्रीसाठी असलेला एकूण १८४ बॉक्स विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून याची किंमत १४ लाख ८४ हजार ४० रुपये आहे. वाहनांसह एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ३३ लाख ८४ हजार ४० रुपये इतकी आहे. ही दारू महाराष्ट्रात प्रतिबंधित असतानाही बेकायदेशीरपणे वाहतूक केली जात होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली डहाणूचे निरीक्षक सुनील देशमुख आणि पालघर भरारी पथकाचे निरीक्षक अरुण चव्हाण व त्यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.