पालघर : मासेमारी व्यवसायातून महिला सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबनाला चालना देण्यासाठी एका सामाजिक संस्थेने वडाराई येथील ४६ मच्छीमार महिलाना उपजिविकेसाठी आवश्यक साहित्य पुरवण्याचा प्रकल्प राबविला. पालघरच्या किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसाय हा स्थानिक अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. मासे विक्रीच्या माध्यमातून अनेक महिला आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहात मोलाचे योगदान देतात.

मासळीची गुणवत्ता टिकवणे, ग्राहकांपर्यंत ताजी मासळी पोहोचवणे, बाजारपेठेत योग्य दर मिळवणे आणि व्यवसायाचा विस्तार करणे या बाबी महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. योग्य साधने, नियोजन आणि बाजारपेठेच्या संधींचा उपयोग केल्यास मासे विक्री व्यवसाय अधिक सक्षम आणि फायदेशीर होऊ शकतो हे ध्यानी ठेऊन हा प्रकल्प राबविण्यात आला. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सामाजिक दायित्व माध्यमातून पालघर तालुक्यातील वडराई आणि माहीम येथील ४६ मासेमारी करणाऱ्या महिलांना उपजीविका सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले.

यामध्ये मासळीचा ताजेपणा टिकवण्यासाठी इन्सुलेटेड आइस बॉक्स, उन्हापासून संरक्षणासाठी छत्र्या आणि कामाच्या सोयीसाठी स्टूल यांचा समावेश आहे. या सुविधांमुळे महिलांना मासळीची गुणवत्ता जपण्यास, विक्रीच्या ठिकाणी अधिक सोयीस्कर वातावरणात काम करण्यास आणि ग्राहकांचा विश्वास वाढवण्यास मदत होऊ शकते. स्वच्छता, योग्य साठवणूक, ग्राहकांशी चांगले संबंध आणि बाजारपेठेतील मागणीनुसार विक्रीचे नियोजन या बाबींवर लक्ष केंद्रित केल्यास व्यवसायवृद्धीच्या संधी अधिक प्रभावीपणे साधता येऊ शकतात.

मासे विक्री हा केवळ पारंपरिक व्यवसाय नसून तो महिलांच्या उद्योजकतेचा आणि आर्थिक स्वावलंबनाचा महत्त्वाचा मार्ग आहे. उपलब्ध साधनांचा योग्य वापर, व्यवसायातील सातत्य आणि बाजारपेठेच्या गरजांची समज यांच्या माध्यमातून महिला आपल्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करू शकतात. महिलांच्या कौशल्याला योग्य साधनांची जोड मिळाल्यास स्थानिक व्यवसायाला चालना मिळते आणि कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यालाही हातभार लागणार आहे. महिलांना सक्षम करणे, त्यांच्या व्यवसायाला बळकटी देणे आणि स्थानिक पातळीवर शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सक्षम महिला, सक्षम व्यवसाय आणि स्वावलंबी कुटुंबे या संकल्पनेतून किनारपट्टीवरील महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी असे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतात.