पालघर: यंदाच्या मासेमारी हंगामाच्या आरंभी पालघर जिल्ह्यांतील मच्छीमारांना मत्स्य उत्पादनासंदर्भात काहीशी निराशा पदरी पडली असताना एप्रिल व मे महिन्यात चांगल्या प्रमाणात मासेमारी झाली होती. या पार्श्वभूमीवर १५ मे च्या जवळपास सर्वसाधारणपणे बंद होणारी मासेमारी अखेरच्या मुदतीपर्यंत सुरू राहिल्याचे दिसून आले आहे. १ जूनपासून ६१ दिवस समुद्रात मासेमारीला बंदी कालावधी जाहीर करण्यात आला असून नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कडक कारवाई करण्याचे संकेत मत्स्यव्यवसाय विभागाने दिले आहेत.
समुद्रातील मासळीच्या साठ्याचे जतन करण्यासाठी आणि पावसाळ्यातील वादळी हवामानापासून मच्छीमारांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी शासनाने १ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत पावसाळी मासेमारीवर अधिकृत बंदी जाहीर केली आहे. मत्स्य प्रजनना नंतर च्या बंदी कालावधी किमान १५ दिवसांनी वाढवण्याची मागणी विविध पारंपारिक मासेमारी संघटनांनी केली आहे.
ऑगस्ट २०२५ मध्ये मासेमारी हंगाम सुरू झाल्यानंतर काही फेऱ्या दरम्यान या व्यवसायाच्या आर्थिक स्थैर्यतेसाठी महत्त्वपूर्ण असणारे पापलेट या माशाची समाधानकारक झाली होती. मात्र नंतर महिन्याभरातच पापलेट माशाची आवक कमी झाल्याने इतर माशांच्या मासेमारीकडे मच्छीमार वळले होते. थंडीच्या काळात मासेमारीचे प्रमाण घटत असल्याने पुन्हा एप्रिल मे महिन्यात मासेमारीला काहीसे बरे दिवस आल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसाधारणपणे १५ मे दरम्यान बंद होणारी मासेमारी बंदीच्या कालावधी सुरू होयच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत सुरू राहिली आहे.
गेल्या दोन महिन्यात विविध प्रकारचे पाले, व घोळ माशाची समाधानकारक आवक झाली असून काही प्रमाणात पापलेट मासे मिळाल्याच्या घटना आहेत. मिळालेले पापलेट मासे हे किमान कायदेशीर आकारापेक्षा मोठे असल्याचे मत्स्य व्यवसाय विभागाकडून सांगण्यात आले आहे. दैनंदिन प्रकारच्या लहानपोटी मधील मासेमारी मध्ये बोंबील व कोलंबी माशांची आवक समाधानकारक असल्याचे सांगितले जाते.
३०- ६० टक्के बोटी अजूनही समुद्रात
पालघर जिल्ह्यात सुमारे २२०० मासेमारी बोटी असून जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय विभागाचे चार परवाना अधिकारी कार्यालय आहेत. त्यापैकी
सातपाटी येथे ५०३ मासेमारी नौका, एडवण येथे १८७ नौका, वसई येथे ६८९ नौका तर डहाणू येथे ५१५ नौका अशा एकूण १८९४ नौकांनी विद्यमान मासेमारी हंगामासाठी परवाने घेतले होते. या तलनेत ठाणे जिल्ह्यातील १२६७ बोटींकडे परवाने असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सद्यस्थितीत सातपाटी, एडवण व डहाणू परवाना कार्यालय क्षेत्रातील सुमारे ३० टक्के मासेमारी बोटी तर वसई परवाना कार्यालय क्षेत्रातील ६० टक्के बोटी समुद्रात असल्याची माहिती पुढे आली आहे.ज्या मासेमारी बोटी अजूनही समुद्रात आहेत त्या बोटी ३१ मे पूर्वी बंदरात येऊन त्यांच्याकडील मासे उतरवतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
मत्स्य व्यवसाय विभागाकडून देखरेख
१ जून पासून मासेमार संबंधित कोणत्याही प्रकारची कृती बेकायदेशीर मानली जाणार असून त्या दृष्टीने मत्स्य व्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी यांच्यासह ५८ सुरक्षारक्षक व १८ सागर मित्र यांच्यामार्फत जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गस्ती घालण्यात येणार आहे. त्यानंतर अखंड पावसाळ्या ड्रोन द्वारे समुद्रातील सर्वेक्षण सुरू राहणार असून हवामान तसेच इतर बाबींच्या अनुषंगाने गस्तीच्या वेळापत्रक बदल करण्याची असे स्पष्ट करण्यात आले. ठाणे व पालघर विभागासाठी एक गस्ती नौका कार्यरत असून आवश्यकतेनुसार त्याचा वापर केला जाईल असे मत्स्य व्यवसाय विभागाचे सहसंचालक (ठाणे पालघर) दिनेश पाटील यांनी लोकसत्ताला सांगितले.
बंदी कालावधीतील कामे
झाई (तलासरी)पासून ते वसई तालुक्यातील पाचू बंदर पर्यंत च्या समुद्रकिनाऱ्यावरील गावातील मच्छीमार ऑगस्ट पासून ते मे पर्यंत मासेमारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतात. साधारण मे महिन्या च्या १५ तारखेपर्यंत अनेक बोटी या समुद्रकिनारी शाकारल्या जातात. यावेळी नौके वरून जाळ्या समुद्राच्या पाण्यात धुवून उतरवल्या जातात. नंतर मासेमारी बंदीच्या कालावधीत त्याची दुरुस्ती केली जाते. त्याचबरोबर नवीन जाळ्या विणण्याचे कामही सुरू करण्यात येते. नौकेच्या खालील बाजूला निर्माण झालेले शेवाळ काढणे, बोटीच्या पृष्ठभागाला छिद्र पडलं असल्यास त्याची दुरुस्ती करणे व नौकेला रंगरंगोटी याच कालावधीत करण्यात येते.
बोटीचे इंजिन व इतर तांत्रिक सामग्री चे देखभाल दुरुस्ती व नूतनीकरण करण्यासोबत खलाशांच्या सोयीसुविधा वाढवण्यासाठी देखील बदल केले जातात. पावसाळ्यात नौकेमध्ये पाणी जाऊ नये याकरिता पूर्णपणे प्लॅस्टिकने बंद केली जाते. पाऊस पडण्याच्या अगोदर ही सर्व कामे करण्यात येतात. ही काम संपल्यानंतर नौके वरील खलाशी आपल्या गावाला निघून जातात. दोन महिने खलाशांना व नौका मालकांना विश्रांती असल्यामुळे याकाळात ही मंडळी समूहामध्ये देवदर्शनासाठी जात असतात.
