पालघर : राज्य सरकारने १५ ऑगस्टपर्यंत जाहीर केलेल्या मासेमारी बंदी या निर्णयात शिफिलता देऊन अचानकपणे १२ सागरी मैल पलीकडे मासेमारी करण्याची मुभा दिल्याने पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांना प्रत्यक्षात निर्धारित वेळेपूर्वी मासेमारी करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या या निर्णयावर स्थानिक मच्छिमारांमध्ये तीव्र नाराजी असून जिल्ह्यातील मासेमारी ६ ते १० ऑगस्ट दरम्यान प्रत्यक्षात सुरू होईल अशी चिन्ह दिसून येत आहेत.

राज्य सरकारने परंपरागत पद्धतीने १ जून ते ३१ जुलै दरम्यान मासेमारी बंद करण्याचा निर्णय जारी केला होता. मच्छीमार संस्थांच्या मागणी वरून मासेमारी बंदी १५ ऑगस्टपर्यंत विस्तारित केल्याचे सरकारच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे बोटींची दुरुस्ती, रंगरंगोटी व इतर पूर्व तयारी करण्यास काही प्रमाणात शिथिलता आली होती.

३० जुलै च्या रात्री मत्स्यव्यवसाय मंत्री नितीश राणे यांनी १२ सागरी मैल (नॉटिकल) पलीकडे होणारी मासेमारी १ ऑगस्टपर्यंत सुरू करण्यास मुभा असल्याचा निर्णय समाज माध्यमांवरून जाहीर केला. या संदर्भात मच्छीमार नेत्याने मत्स्य व्यवसाय मंत्री यांची भेट घेऊन गुजरात राज्याने घेतलेल्या मासेमारी बंदीच्या निर्णयाप्रमाणे राज्यात देखील १५ ऑगस्टपर्यंत मासेमारी बंदी कायम ठेवण्याची विनंती केली. यावर मत्स्यव्यवसाय विभागाने तत्वतः सहमती दर्शवली तरीही त्या संदर्भात कोणताही शासन निर्णय अथवा संदेश जारी करण्यात आला नाही.

एकीकडे दक्षिण कोकणातील किमान ३०० बोटी मासेमारीसाठी निघाल्या असताना उत्तर कोकणातील मच्छीमार या निर्णयाबद्दल अनभिज्ञ असल्याने गाफील राहिले. अचानक जाहीर झालेल्या निर्णयामुळे बोटींची तयारी करण्यास धावपळ करावी लागत असून मासेमारी बोटींवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना (खलासी) घेण्यासाठी त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. विक्रमगड, जव्हार, तलासरी या भागात राहणारे हे खलासी भात शेतीच्या आवणी (पुनर लागवड) कामात व्यस्त असल्याने त्यांची उपलब्धता सहजगत होत नाही. सातपाटी या मासेमारीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या बंदरातील सुमारे ५० टक्के बोटी तयार असल्या तरी खलाशी उपलब्ध होत नसल्याने तसेच बर्फसाठा उपलब्ध होण्यास आठवड्याचा अवधी लागणार असल्याने त्यांना किनाऱ्यावर राहणे क्रमप्राप्त झाले आहे.

समुद्र व समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या वादळी वातावरणामुळे मासेमारी करणे जिकरीचे ठरले आहे. ७ ते ९ ऑगस्ट दरम्यान पुन्हा समुद्रामध्ये वादळी वातावरणाची शक्यता वर्तविण्यात येत असून त्यामुळे जिल्ह्यातील २२०० बोटींपैकी अधिकतर बोटी १० ऑगस्ट नंतरच मासेमारी साठी जातील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

भांडवलदार धार्जिण्य निर्णय असल्याचे मच्छीमारांचे आरोप

पालघर जिल्ह्यात एक सिलेंडर ते सहा सिलेंडर दरम्यान मासेमारी २२०० बोटी असून त्यापैकी अधिकतर बोटी या चार सिलेंडरपेक्षा कमी क्षमतेचे आहेत. अशा लहान बोटींच्या माध्यमातून १२ सागरी मैलापर्यंत मासेमारी करण्यात येत असून त्यामध्ये बोंबील, कोलंबी, बांगडा, मांदेळी सारख्या लहान माशांचा समावेश आहे. उर्वरित बोटी खोल समुद्रात मासेमारीसाठी जात असून आगाऊ सूचना दिली गेली असती तर त्यांच्या मार्फत मासेमारी हंगाम सुरू करणे शक्य होते. मात्र अचानकपणे निर्णय जाहीर करण्याचा निर्णय भांडवलदार मच्छीमारांसाठी धार्जिन्य असल्याचा आरोप पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांकडून होत आहे.

मासेमारी बंदी कालावधी १५ ऑगस्टपर्यंत विस्तारित केला गेल्याने आमच्या मच्छीमार सहकारी संस्थेने २९ जुलैपासून बर्फ उत्पादन सुरू केले आहे. दररोज ४० टन बर्फ उत्पादनाची क्षमता असून सहकारी संस्थेच्या सर्व बोटींना बर्फ पुरवण्यासाठी किमान ६- ७ ऑगस्ट उजाडेल अशी शक्यता आहे – चंद्रकांत तरे, चेअरमन धी सर्वोदय सातपाटी फिशरमॅन्स सहकारी संस्था मर्यादित

१२ ते २०० सागरी मैल क्षेत्रात मासेमारी करण्याची परवानगी केंद्र शासनाकडून प्राप्त होत असून त्यासाठी ऑनलाइन प्रणाली द्वारे स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे. वसई येथील सहा मासेमारी नौकांसह जिल्ह्यातील इतर काही मासेमारी बोटींना या प्रकारचे परवाने प्राप्त झाले असले तरीही मासेमारीसाठी बोटींची आवश्यक तयारी झाली नसल्याने प्रत्यक्षात मासेमारी सुरू व्हायला काही अवधी लागणार आहे. – विनोद लहारे, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी विभाग, पालघर