पालघर : पालघर येथील गणेशकुंड सुशोभीकरणासाठी वर्षभरापूर्वी सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. मात्र या तलावाची संरक्षक भिंत कमकुवत झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे सुशोभीकरणावर केलेला खर्च वाया गेल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

पालघर नगर परिषदेने गणेशकुंडाच्या सुशोभीकरणासाठी दोन टप्प्यात महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला होते. यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत आर्थिक सहाय्यक घेऊन पहिल्या टप्प्यात विसर्जनासाठी स्वतंत्र घाट व्यवस्था व अस्तित्वात असणाऱ्या तलावालगत चौफेर पादचारी मार्ग व त्याला स्टीलचा कठडा उभारण्याचे काम करण्यात आले. याखेरीज त्या ठिकाणी मंदिर उभारणी करणे व इतर कामेदेखील पहिल्या टप्प्यात करण्यात आली.

गणेशकुंडाच्या सुशोभीकरणाचे काम ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरू होऊन २०२४ च्या पावसाळ्यादरम्यान पूर्ण झाले. मात्र या तलावाचा तळ व उभारलेल्या पायऱ्या यांच्यात मोठे अंतर असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच या प्रकल्पाचा आराखडा व अंदाजपत्रक बनवताना पाण्यामध्ये राहणाऱ्या संरक्षण भिंतीच्या ठिकाणी काँक्रीटीकरण करण्याऐवजी दगडी बांधकाम केल्याने त्याच्या आयुर्मानावर परिणाम होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे या तलावाच्या पूर्व उत्तर व पश्चिम बाजूला असणाऱ्या संरक्षक भिंतीची सद्यस्थिती न पाहता अंदाजपत्रक तयार केले गेल्याने अतिरिक्त भराव व काँक्रीटीकरण पूर्ण झाल्यानंतर संरक्षण भिंतीच्या दगडी बांधकामात भगदाडे पडू लागल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याबद्दल तातडीने उपाय योजना असल्यास संरक्षण भिंतीचा भाग कोसळून सुशोभीकरणावरील खर्च वाया जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुशोभीकरण प्रकल्प वादग्रस्त

गणेशकुंड सुशोभीकरण करण्याचा प्रकल्प सुरुवातीपासून वादग्रस्त ठरला आहे. प्रकल्पाचे तयार करण्यात आलेले अंदाजपत्रक, त्यातील अवाजवी दर, मूळ आराखड्यात विना आवश्यक परवानगी करण्यात आलेले बदल, कामाचा दर्जा, तलावाच्या सभोवताली जागा ताब्यात न घेता उभारण्यात आलेली संरक्षण भिंत ही व इतर कारणे वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तलावाच्या भिंतीचे काम पूर्वी केले गेले असल्याने गणेश कुंड सुशोभीकरण करताना अस्तित्वात आलेल्या संरक्षण भिंतीचे काम या प्रकल्पात समाविष्ट करण्यात आले नव्हते. सुशोभीकरण प्रकल्पाचा कमकुवत झालेल्या संरक्षण भिंतीशी संबंध नाही. उपस्थित मुद्द्यांवर पाहणी करून आवश्यकतेनुसार दुरुस्तीचे काम मंजूर करून हाती घेण्यात येईल. – विपुल कोरफड, नगर अभियंता, पालघर नगर परिषद.