पालघर: पालघर जिल्हा संकुलाकडे छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून येणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण युद्धाच्या पार्श्वभूमीवर रेंगाळले असले तरीही या कामांतर्गत गोठणपूर नाका परिसरातील ३०० मीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण पावसाळ्यापूर्वी करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने योजिले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात जिल्हा मुख्यालय संकुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील प्रवास सुखकर राहण्याची शक्यता आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून जिल्हा मुख्यालयाकडे जाणारा प्रमुख मार्ग असून गोठणपूर नाका परिसरात खोलगट भाग नैसर्गिकरित्या तयार झाला आहे. या ठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा पश्चिमेकडे करण्याची व्यवस्था नसल्याने तसेच रस्त्याच्या पूर्वेकडील पावसाचे पाणी पश्चिमेच्या दिशेला आणण्यासाठी पुलाची व्यवस्था पुरेशा प्रमाणात नसल्याने रस्त्यावरून पाणी वाहून तसेच रस्त्यावर पाणी तुंबून हा रस्ता दरवर्षी खड्डेमय होत असतो.

गेल्या दोन वर्षात पावसाळ्या दरम्यान अनेक महत्त्वाची व उच्चपदीय अधिकारी जिल्हा मुख्यालय संकुलात आल्याने अशाप्रसंगी पडलेल्या खड्ड्यांमध्ये खडी व ग्रीट पावडर टाकून वेळ निभावून नेण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केला होता. मात्र जून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत या रस्त्यावर पडलेल्या असंख्य खड्ड्यांमुळे हजारो महाविद्यालयीन विद्यार्थी, औद्योगिक वसाहती मध्ये काम करणारे कामगार, रुग्णालयात जाणारे नागरिक, जिल्हा मुख्यालय तसेच बोईसर कडे प्रवास करणाऱ्या नागरिकांचे अतोनात हाल झाले होते.

हायब्रीड अन्युटी योजनेअंतर्गत डहाणू पारनाका ते सफाळे वरई नाका दरम्यान रस्त्याच्या डांबरीकरण व रुंदीकरणाचे तसेच आवश्यक ठिकाणी काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे डांबर सहजगत मिळत नसल्याने हे काम पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात येईल अशी शक्यता धुसर वाटत आहे.

या पार्श्वभूमीवर गोठणपूर नाक्याच्या उत्तरेला सुमारे २०० मीटर तर दक्षिणेच्या बाजूला १०० मीटर अंतरावर रस्त्याचे काँक्रिटकरण पावसाळा सुरू होण्यापूर्वी हाती घेणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे. तसेच गोठणपूर नाक्याच्या परिसरात पावसाच्या पाण्याचा पूर्व पश्चिम निचरा व्हावा या दृष्टीने बॉक्स पद्धतीची मोरी उभारण्यात येईल असेही संबंधित अधिकाऱ्यांनी लोकसत्ता ला सांगितले. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाल्यास या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या किमान चार ते पाच हजार नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

इतर कामाच्या ठिकाणी वाहतूक वॉर्डन

पालघर ते सफाळे दरम्यान याच योजनेअंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण व रुंदीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला असून यामुळे माहीम तसेच भरणेपाडा (केळवे) येथे वाहतूक कोंडी होत असल्याचे नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदाराला आवश्यक ठिकाणी मुबलक प्रमाणात वॉकीटॉकी धारक ट्राफिक वॉर्डन तैनात ठेवण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पोपट चव्हाण यांनी लोकसत्ता ला दिले.