पालघर: मनोर येथे ट्रॉमा केअर सेंटर ऑगस्ट महिन्यात सुरू होण्याच्या स्थतीमध्ये असून त्यानंतर काही महिन्यात नंडोरे येथील जिल्हा सामान्य रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रत्येकी २०० खाटांच्या रुग्णालयापाठोपाठ पालघर नंडोरे येथे ५०० खाटांची रुग्ण सुविधा असणारे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी शासन अनुकूल असून या संदर्भात प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी सरकार पुढे ठेवण्यात आला आहे. हे पाहता सन २०३१ पर्यंत पालघर या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सर्व प्रकारच्या अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांसाठी आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने पालघर जिल्हा प्रशासनाने ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या दृष्टीकोनाशी सुसंगत अशा अनेक महत्त्वपूर्ण आरोग्यविषयक उपक्रमांची घोषणा करण्यात आली आहे. या उपक्रमांमुळे तृतीय, दुय्यम आणि प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्यासोबत वैद्यकीय शिक्षण, तज्ज्ञ सेवा, संशोधन आणि समुदाय आरोग्य सेवांनाही मोठी चालना मिळणार आहे.
जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी यांच्या आर्थिक सहाय्याने ५०० खाटांचे तृतीयस्तरीय रुग्णालय असलेले नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा प्रस्ताव नुकताच हाय पॉवर कमिटी समोर सादर करण्यात आला असून या प्रस्तावाला येत्या काही दिवसात प्रशासकीय मान्यता मिळेल असे प्रशासनातील सूत्रांकडून सांगण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या लगतच्या भूखंडात वैद्यकीय महाविद्यालय उभे राहणार असून या वास्तूचे बांधकाम सुरू होण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
हे महाविद्यालय सुरू झाल्यानंतर पालघर तसेच शेजारील जिल्ह्यांतील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध होणार असून उत्तर कोकण विभागातील वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षणाचे हे एक प्रमुख केंद्र ठरणार आहे. इतर वैद्यकीय महाविद्यालयांप्रमाणेच पालघर येथील सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहेत.
पालघर वैद्यकीय महाविद्यालयासाठी विशेष मंजुरी
सर्वसाधारणपणे जिल्हास्तरीय वैद्यकीय महाविद्यालयाला ३०० खाटांचे संलग्न रुग्णालय किमान दोन वर्ष कार्यरत असणे आवश्यक असते. मात्र पालघर जिल्ह्यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय अस्तित्वात नसून ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय अशा आरोग्य संस्था दूर वर स्थित आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या सर्वसाधारण ब्राऊनफिल्ड धोरणा ऐवजी पालघर येथे ५०० खाटांचे नव्याने ग्रीनफील्ड धोरण अवलंबून वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचे राज्य सरकारने निश्चित केले आहे. पालघर नंडोरे येथील २०० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या करिता १० एकर जागा उपलब्ध असून हे रुग्णालय पुढील काही महिन्यात कार्यरत होण्याची शक्यता आहे. याच रुग्णालयाच्या भूखंडालगत वैद्यकीय महाविद्यालय तसेच महिला रुग्णालयासाठी असणारे आठ हेक्टर (२० एकर) जमीन वैद्यकीय महाविद्यालयासाठी मंजूर करण्यात आली आहे. या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी ४५० कोटी रुपयांचा खर्च अंदाजीत असून या खर्चाला राज्य सरकार लवकरच प्रशासकीय मान्यता देईल अशी सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या सोबतीने याच ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय उभारण्याची देखील प्रस्तावित आहे.
कधी सुरू होईल वैद्यकीय महाविद्यालय ?
पालघर येथील वैद्यकीय महाविद्यालया मध्ये १०० विद्यार्थ्याला प्रवेश देण्याचे अपेक्षित असून या वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियोजन, आराखडा तयार करणे तसेच इतर तांत्रिक तपशिलासाठी तज्ञ सल्लागाराची नेमणूक करणे तसेच त्यानंतर त्याच्यामार्फत तयार होणाऱ्या आराखड्यात शासकीय विभागाकडून मंजुरी किमान वर्षभराचा अवधी लागण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत पालघर वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम २०२८ मध्ये सुरू होऊन या महाविद्यालयाचे बांधकाम २०३०- ३१ च्या सुमारास पूर्ण होण्याची शक्यता आहे. या महाविद्यालयासाठी डीन पदावर नेमणूक करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
