पालघर: पालघर जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ग्रामपंचायत जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला असून या निवडणुकीत १० थेट सरपंच आणि २२ सदस्यांची मतदानाद्वारे निवड करण्यात आली आहे, तर ५ सरपंच आणि ५५ सदस्यांनी बिनविरोध निवडून येत बाजी मारली आहे. जिल्ह्याचा सरासरी मतदानाचा टक्का ६५.५२ इतका राहिला असून, ६५ जागांसाठी एकही नामनिर्देशन पत्र प्राप्त न झाल्याने या जागा अद्यापही रिक्तच राहिल्या आहेत.

पालघर जिल्ह्यातील विविध कारणांमुळे रिक्त असलेल्या सरपंच आणि सदस्यांच्या जागांसाठी २८ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत एकूण २०,२०३ मतदारांनी आपला हक्क बजावला. यामध्ये १०,०५६ महिला आणि १०,१४७ पुरुष मतदारांचा समावेश होता. ग्रामीण भागात मतदानाचा उत्साह दिसून आला असून ६५.५२% मतदानाची नोंद झाली आहे.

बिनविरोध निवडीवर भर

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, अनेक गावांमध्ये सामंजस्याची भूमिका घेत ५ थेट सरपंच आणि ५५ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यामुळे अनेक ठिकाणी निवडणूक प्रक्रिया मतदानापूर्वीच पार पडली. मात्र, जिथे चुरस होती, तिथे २९ एप्रिल रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

६५ जागा अद्यापही रिक्त

एकूण १७९ पदांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली होती. मात्र, ६४ सदस्य आणि १ सरपंच अशा एकूण ६५ जागांसाठी एकही उमेदवारी अर्ज प्राप्त झाला नाही. त्यामुळे या जागा भविष्यात पुन्हा एकदा रिक्त राहणार असून, त्यावर प्रशासनाला फेरनिवडणूक किंवा अन्य कायदेशीर तरतुदींचा विचार करावा लागणार आहे.

तालुकानिहाय चित्र

विक्रमगड, मोखाडा, वाडा, जव्हार, पालघर आणि डहाणू या तालुक्यांमधील महत्त्वाच्या ग्रामपंचायतींमध्ये ही पोटनिवडणूक झाली. प्रामुख्याने खोस्ते, कुलोंद, बोटोशी, सापरोंडे, मांडा, हातेरी, साकुर, बोरशेती, वेंगणी, नवी बेलवाडी, डोंगरे, गोवाडे, शिलटे, आशागड आणि कापशी या गावांच्या थेट सरपंच पदाच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.निवडून आलेल्या नवनियुक्त प्रतिनिधींमुळे आता ग्रामपंचायतींचा रखडलेला कारभार पुन्हा रुळावर येण्यास मदत होणार आहे.

निवडून आलेल्या सरपंचांची यादी

पालघर तालुक्यातून डोंगरे येथील पल्लवी पुरुषोत्तम पाटील, बोरशेतीमधून बाबुराव बाळू भुतकडे, नवी देलवाडीतून स्नेहा उमेश राऊळ, वेंगणीतून जगन्नाथ किसन वरठा, शिल्टे येथून मनाली महेंद्र लहांगे आणि गोवाडे येथून भक्ती भाई पाटील या सदस्यांचा समावेश आहे.

डहाणू तालुक्यातून कापशीच्या अपर्णा जयवंत गहला आणि आशागडमधून कानल हरेश गणपत यांनी यश संपादन केले आहे. वाडा तालुक्यातून मांडा येथील शुभांगी समीर पाटील आणि सापरोंडे येथील प्राजक्ता बारकू भोईर यांची निवड झाली आहे. तसेच विक्रमगड तालुक्यातील खोस्ते येथून माया पंढरीनाथ खुरकुटे, जव्हार तालुक्यातील साकूरमधून सुनिता प्रभाकर गांगोडा व हातेरीमधून विनायक तुळशीराम थाळकर निवडून आले आहेत. मोखाडा तालुक्यातील कुलोद येथून गावंढा दुर्गा पांडुरंग आणि बोटोशी येथून जिजा पुंडलीक पवार या सदस्यांची निवड करण्यात आली आहे.