पालघर: पालघर जिल्ह्यातील ४७३ ग्रामपंचायती मध्ये माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान राबविण्यात येणार असून आरोग्याच्या हक्कासाठी जन आंदोलन उभारण्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्रयत्न सुरू आहेत.
आपल्या गावाला आरोग्य दृष्ट्या सक्षम, स्वच्छ, सुरक्षित आणि रोगमुक्त करण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच व इतर अधिकारी वर्गाला प्रशिक्षण देण्यात येणार असून गृहभेटीच्या माध्यमातून घरोघरी नागरिकांचे समुपदेशन करून ग्रामपातळीवर चळवळ उभारण्यात येणार आहे.
गावातील शेवटच्या घटकापर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पोहोचवणे ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून आरोग्याला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग सज्ज झाले आहे. ‘प्रजा निरोगी, तर राज्य सशक्त’ या ब्रीदवाक्याला केंद्रस्थानी ठेवून राज्य शासनाने सुरू केलेले ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ हे व्यापक अभियान आता जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये प्रभावीपणे राबवले जाणार आहे. आरोग्य हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क असून तो मिळवून देण्यासाठी गावपातळीवर जनआंदोलन उभे करण्याचा मानस जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.
प्रशिक्षण आणि गृहभेटींद्वारे जनजागृती
आपले गाव आरोग्यदृष्ट्या सक्षम, स्वच्छ, सुरक्षित आणि रोगमुक्त करणे हे या मोहिमेचे मूळ सूत्र आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्राम आरोग्य पोषण व पाणीपुरवठा स्वच्छता समिती सदस्य आणि क्षेत्रीय आरोग्य यंत्रणेला विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या मोहिमेत समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक-सेविका आणि आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन प्रत्यक्ष गृहभेटी देणार आहेत. नागरिकांचे समुपदेशन करून त्यांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवणे आणि आरोग्याचा मुद्दा गावातील दैनंदिन चर्चेचा व कृतीचा भाग बनवणे, हा या गृहभेटींचा मुख्य हेतू आहे. गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या गरजांचा अभ्यास करणे, आजार टाळण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय योजना आखणे, आजारी रुग्णांना उपचार पुरविणे हे या योजनेत अंतर्भूत असून नागरिकांमध्ये आरोग्यशोधक वर्तन निर्माण करण्याच्या दृष्टीने आखणी केली जात आहे. आजारी नागरिकांना औषध उपचारसह आवश्यकतेनुसार तज्ञ डॉक्टरांकडून तपास व मार्गदर्शन केले जाणार असून आरोग्याच्या हक्कासाठी जनआंदोलन छेडण्यात येणार आहे.
गावांची आरोग्य संपन्नतेकडे होणारी वाटचाल मोजण्यासाठी १०० गुणांची वस्तुनिष्ठ व पारदर्शक मूल्यांकन प्रणाली निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने २० विभागात ५९ निर्देशकांच्या माध्यमातून विविध घटकांचे सखोल मूल्यमापन करण्यात येणार आहे.
मूल्यांकनाचे प्रमुख निकष
माता व बाल आरोग्य : १०० टक्के गरोदर मातांची वेळेत नोंदणी, किमान चार तपासण्या, संस्थात्मक प्रसूती आणि शून्य माता-बालमृत्यू साध्य करणे.
लसीकरण कव्हरेज व कुपोषणमुक्ती : बालकांचे संपूर्ण लसीकरण, तीव्र (सॅम) व मध्यम (मॅम) कुपोषण निर्मूलन आणि ॲनिमिया मुक्तीसाठी लोहयुक्त गोळ्यांचे वितरण.
रोग प्रतिबंध व नियंत्रण : संसर्गजन्य आजार (क्षयरोग, कुष्ठरोग निर्मूलन, डेंग्यू-मलेरिया डासअळी नियंत्रण) तसेच असंसर्गजन्य आजार (मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग) यांची ३० वर्षांवरील नागरिकांमध्ये १०० टक्के तपासणी.
आरोग्य तपासणी शिबिरे : नियमित विशेष शिबिरे, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे आणि टेलिकन्सल्टेशनचा विस्तार.
स्वच्छता, पाणीपुरवठा व जनजागृती : शुद्ध पिण्याचे पाणी, नियमित पाणी शुद्धीकरण चाचण्या, हागणदारीमुक्त स्थिती राखणे, कचरा संकलन व वर्गीकरण.
व्यसनमुक्ती व निरोगी जीवनशैली : तंबाखू, मद्य आणि इतर व्यसनांपासून मुक्तीसाठी प्रचार, दैनंदिन योग, व्यायाम आणि स्थानिक भरडधान्य पोषणाचा प्रसार.
शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशानुसार हे अभियान केवळ तात्पुरती तपासणी मोहीम नसून संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येय क्रमांक ३ शी (सर्वांसाठी आरोग्य व कल्याण) संलग्न आहे. तळागाळातील गरजांनुसार आरोग्य नियोजन करणे, आयुष्मान भारत व आभा कार्डांची १०० टक्के नोंदणी करणे, ई-सुश्रुत डिजिटल प्रणालीचा अवलंब आणि आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा व महिला-बालविकास या विभागांमध्ये समन्वय साधून ग्रामीण आरोग्याचा चेहरामोहरा बदलणे ही या मोहिमेची मुख्य उद्दिष्टे आहेत. जनसहभागाच्या बळावर पालघरमधील प्रत्येक गाव आरोग्य संपन्न करण्याचा निर्धार आहे. –डॉ. संतोष चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी
