पालघर – पालघर जिल्ह्यातील झाई-बॉर्डी पासून वसई तालुक्यापर्यंत असणारे वेगवेगळे समुद्रकिनारे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित व्हावे या दृष्टीने आपण जिल्हाधिकारी यांना विकास आराखडा तयार करण्याचे सूचित केले आहे. हा आराखडा तयार झाल्यानंतर आपण मुख्यमंत्री यांच्या समवेत एकत्रित बैठक आयोजित करून जिल्ह्यातील सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी शिरगाव येथे प्रतिपादन केले.
ग्लोबल कोकण महोत्सव तसेच पालघर मिनी सरस या महोत्सवाचे उद्घाटन गणेश नाईक यांच्या हस्ते १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी उशिरा संपन्न झाले. याप्रसंगी आमदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, ग्रामीण विकास योजनेच्या प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते, कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव, वसई विरारचे प्रथम महापौर राजीव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सिने क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर व युवा क्रिकेटपटू आयुष म्हात्रे यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
पालघर जिल्ह्यात विविध प्रकल्प उभारले जात असताना पायाभूत सुविधांचा स्तर उंचावत आहे. यामुळे लोकांचे राहणीमान उंचावणार असून त्यामध्ये सर्वांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री यांनी केले. समुद्रकिनाऱ्यावर आनंद लुटताना पर्यटकांची सुरक्षितता, त्यांच्यासाठी उपलब्ध सुविधा तसेच किनाऱ्यांची स्वच्छता व निसर्ग सौंदर्य राखण्यासाठी आराखडा तयार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबरीने जिल्ह्यात ठीकठिकाणी वाहन वाहतुकीसाठी लहान बंदरे, जेटी उभारून प्रवासी बोटींची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी सागरी मार्गाने गुजरात व आपल्या व्यापाराचा विस्तार करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यात विविध प्रकल्प येत असताना स्थानिकांनी आपल्या जमिनी विकण्याऐवजी त्या विकसित कराव्या तसेच पालघर जिल्ह्याची पर्यटनाच्या दृष्टिकोनातून प्रगत जिल्हा म्हणून ओळख निर्माण व्हावी यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या कारकिर्दीत समुद्रकिनाऱ्याच्या गावांमध्ये व केलेल्या विकासाबाबत त्यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजीव पाटील, संजय यादवराव तसेच मनोज रानडे यांनी करून महोत्सवाच्या आयोजनामागील विविध पैलूंबाबत उपस्थितांना माहिती दिली. याप्रसंगी ग्रामीण विकास विभागाच्या मदतीने महिला बचत गटातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाच्या यशोगाथेच्या पुस्तकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई रणजी संघाचे कप्तान शार्दुल ठाकूर यांनी कोकणात पर्यटनाच्या प्रचार व प्रसारासाठी आपण सदैव उपलब्ध राहू अशी ग्वाही देत आपल्या माहीम येथील वास्तव्यादरम्यान निसर्गरम्य ठिकाणी सायकलवर केलेल्या सफारींचा दाखला दिला.
२२ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणाऱ्या या महोत्सवात २५० पेक्षा अधिक स्टॉल असून स्थानिक खाद्य पदार्थांची ५० पेक्षा अधिक स्टॉल असून पहिल्याच दिवशी या महोत्सवाला २५ हजार पेक्षा अधिक नागरिकांनी भेट दिली. या महोत्सवात रयतेचा राजा हे महानाट्य तसेच समुद्रकिनाऱ्यावर आयोजित केलेल्या मराठी चित्रपटांचे प्रदर्शन आकर्षण ठरणार असून वेगवेगळ्या विषयांवर दररोज परिसंवादाचे आयोजन केले जात आहे.
