वाडा : वाडा तालुक्यातील गांधरे येथील शेतकरी किरण विनायक ठाकरे यांच्या शेतीच्या नुकसानप्रकरणी सोमवारी (०९ फेब्रुवारी) पालघर येथे झालेल्या जनता दरबारात पालकमंत्री गणेश नाईक यांनी गंभीर दखल घेतली. वाडा तालुक्यातील वैतरणा नदीवरील बंधाऱ्यावर कुडूस येथील हिंदुस्थान कोका -कोला कंपनीकडून करण्यात आलेल्या पाणी उपशाच्या कामाची चौकशी करून व कंपनीच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्याच्या शेतीचे होणारे नुकसान याबाबत नियमबाह्य बाबी आढळल्यास कंपनीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पाटबंधारे विभागाला देत तातडीने संयुक्त पाहणी करण्यास सांगण्यात आले आहे.

कुडूस येथील शीतपेय बनवणारी हिंदुस्थान कोका – कोला बेव्हरेज प्रा.ली कंपनीकडून वैतरणा नदीवरील बंधाऱ्याच्या पात्रातून पाण्याचा उपसा केला जातो. बंधाऱ्यावर पाणी अडविण्यासाठी बसविण्यात आलेल्या वाढीव प्लेटमुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह बदलल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे किरण ठाकरे यांच्या नदीलगत मालकी हक्काची असणाऱ्या (सर्वे क्रमांक ८६/१/अ) या २.९७ हेक्टर शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून शेती हळूहळू नापीक होत चालली आहे. पूर्वी या जमिनीत पावसाळ्यात भातशेती, तर हिवाळा व उन्हाळ्यात भाजीपाला व इतर पिकांचे उत्पादन घेतले जात होते. मात्र गेल्या काही वर्षांत उत्पादन पूर्णतः घटले असून शेतीचे आर्थिक नुकसान वाढले आहे.

या संदर्भात ठाकरे यांनी २०१९ पासून आतापर्यंत सातत्याने विविध शासकीय विभागांकडे तक्रारी सादर केल्या आहेत. सदर बंधारा हा ठाणे पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येत असुन बंधाऱ्याची व शेतकऱ्याच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून यापूर्वी उपअभियंता (पाटबंधारे) यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला होता. त्यानुसार या अहवालात कोका – कोला कंपनीकडून सीएसआर निधीतून शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची शिफारस करण्यात आली होती. तसेच पाणी उपशासाठी आवश्यक संरक्षक उपाययोजना करण्याची सूचनाही देण्यात आली होती. मात्र, या शिफारशींवर प्रत्यक्ष कोका कोला कंपनीकडून वा प्रशासनाकडून कुठलीही ठोस अंमलबजावणी झालेली नाही.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कंपनीकडून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जात असून पर्यावरणीय नियम व तांत्रिक निकषांचे काटेकोर पालन होत नसल्याची शंका ही व्यक्त केली जात आहे. पाण्याच्या योग्य निचऱ्याची व्यवस्था न केल्याने शेतकऱ्यांना सातत्याने फटका बसत आहे.

दरम्यान, पालकमंत्र्यांच्या निर्देशांनंतरही प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही बाब पाटबंधारे विभागाशी संबंधित असल्याचे सांगत तक्रार पुढे पाठवली आहे. त्यामुळे विविध विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

सात वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणात अद्यापही ठोस निर्णय न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला न्याय, भरपाई आणि कायमस्वरूपी उपाययोजना मिळणे गरजेचे असून, आता पालकमंत्र्यांच्या निर्देशांनंतर तरी प्रशासनाकडून प्रत्यक्षात कारवाई होणार का, ? असा प्रश्न उपस्थित केला जावू लागला आहे.

मागील वेळी पावसाळ्यात भेट देवून वस्तुस्थितीची पाहणी केली होती. त्यानुसार अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे. आता पुन्हा शेतकरी तक्रारदार यांना प्रत्यक्षात भेटून जागेची व वस्तुस्थितीची पाहणी करेन.– यामिनी मिश्राम, उपअभियंता, पाटबंधारे विभाग, ठाणे (कळवा)

दरम्यान, कोका कोला कंपनी प्रशासनाकडे या तक्रारीबाबत बाजू समजून घेण्यासाठी यापूर्वी संपर्क साधला असता त्यांनी पाहणी करून शेतकऱ्याला कळविले जाईल असे सांगितले होते.