पालघर : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळण्यासाठी तसेच जोखीम प्रसूतीदरम्यान माता व नवजात बालकांना तातडीने औषध उपचार मिळणे अथवा आवश्यकतेनुसार संदर्भीय सेवा मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पूर्वनियोजन करून सज्जता राखण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला स्वतंत्र व्हाट्सॲप क्रमांक देण्यात आला असून आशासेविका, आरोग्यसेवक यांच्यामार्फत समन्वय साधण्यासाठी व्यवस्थेचे बळकटीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
पालघर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच विभागाच्या बळकटीकरणासाठी आरोग्य अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा पावसाळा लवकर सुरू झाल्याने रोजगारासाठी स्थलांतरित झालेली मंडळी आपल्या गावाकडे परतू लागल्याने जिल्ह्याच्या विविध ग्रामीण ठिकाणी पुनरागमन शिबिरांचे आयोजन करून त्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. या तपासणीत गरोदर असणाऱ्या मातांना तीन महिन्यांची बुडीत मजुरी देण्याची तरतूद असणाऱ्या माहेरघर योजनेची माहिती देऊन संपर्क नसलेल्या पाड्याच्या ठिकाणाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ सुरक्षित ठिकाणी अथवा आरोग्य केंद्रात स्थलांतरित करण्यासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे.
गरोदर मातांची यादी तयार
रस्त्याद्वारे संपर्क नसलेल्या ८२ गावांत १३७ पाडे असून त्यांच्याबरोबरच दुर्गम भागात राहणाऱ्या गरोदर, स्तनदा माता व बालकांसाठी औषधांचा संच आशा सेविकांकडे देण्यात आला आहे. आजाराची लक्षणे व औषधाची मात्रा ही तज्ज्ञ डॉक्टरांशी भ्रमणध्वनीद्वारे सल्लामसलत करून देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले असून बालक अथवा माता गंभीर होण्यापूर्वी प्राथमिक औषधोपचार सुरू करण्याची तरतूद केली आहे. त्याखेरीज अशा संपर्क नसलेल्या ठिकाणी पावसाळ्याच्या काळात प्रसूती होऊ शकणाऱ्या गरोदर मातांची यादी तयार करण्यात आली असून त्यामधील जोखीम मातांना सुरक्षित स्थळी हलविण्यासंदर्भात अथवा संदर्भीय सेवेची गरज भासल्यास त्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. संतोष चौधरी यांनी दिली.
जिल्ह्यातील ४६ आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये आवश्यकतेनुसार पूर्ण क्षमतेने मनुष्यबळ उपलब्ध असून वैद्यकीय अधिकारी अ प्रवर्ग ५४ वैद्यकीय अधिकारी, २४ ब प्रवर्ग मधील वैद्यकीय अधिकारीपदे भरण्यात आली आहेत. याखेरीज २३५ समुदाय आरोग्य अधिकारी, १३५ पुरुष आरोग्य सेवक, ४६४ महिला आरोग्य सेविका, २११ बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, २२३८ अशा सेविका व २४७० पाडा सेवक कार्यरत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली. सद्य:स्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील सर्व प्रमुख पदे भरण्यात आली असून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ तास वैद्यकीय अधिकारी उपलब्ध राहील, असे प्रशासनाने सांगितले.
सनियंत्रण कक्ष
गरोदर व स्तनदा माता तसेच पाच वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी २४ तास संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णाला जवळच्या आरोग्य संस्थेपर्यंत जाण्यासाठी १०८ अथवा १०२ प्रणालीची रुग्णवाहिका उपलब्ध होईल यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. यामुळे आरोग्य सेवक, अशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्याशी गरजूंनी संपर्क साधल्यास त्यांना तातडीने उपचार मिळण्यासाठी सनियंत्रण कक्षाची मदत मिळू शकेल असेही डॉ. संतोष चौधरी म्हणाले.
पूर्णवेळ मनुष्यबळ
जिल्ह्यात तालुकानिहाय आरोग्य आपत्ती सेवा पुरवण्यात येत असून त्यासोबत गरोदर माता व नवजात बाळांसाठी संदर्भीय सेवा समन्वय साधण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पुरविण्यात आले आहे. याखेरीज तालुका वैद्यकीय अधिकारी व जिल्हा समन्वय पक्षाला स्वतंत्र व्हाट्सॲप नंबर देण्यात आले असून या व्हाट्सअप क्रमांकावर येणाऱ्या संदेशांवर देखरेख ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे १०८ प्रणालीची रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यास प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात सुस्थितीत असणाऱ्या १०२ प्रणालीच्या रुग्णवाहिकेचा वापर गरजू रुग्णांना आरोग्य संस्थेपर्यंत पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
बचाव पथक
दुर्गम व रस्त्याने न जोडलेल्या गाव-पाड्यांवर तातडीने औषध उपचार मिळावा या दृष्टीने जिल्ह्यात ४९ बचाव पथके उभारण्यात आली असून या प्रत्येक पथकात वैद्यकीय अधिकारी व सहकारी यांच्यासह पुरेसा औषधसाठा उपलब्ध राहणार आहे. नवसंजीवनी योजनेंतर्गत भरारी पथक व शीघ्र प्रतिसाद दलांसोबत आरोग्य शिबीर घेण्यासाठी आठ मोबाइल वैद्यकीय पथक उपलब्ध असून त्यामध्ये रुग्णांच्या रक्ताची चाचणी व उपचार करण्यासाठी पुरेशी मनुष्यबळ व औषध साठा उपलब्ध राहणार आहे.