एकेकाळी कुपोषण, बाल मृत्यू, माता मृत्यू तसेच इतर आजाराने मृत्यूमुखी पडणाऱ्या नागरिकांची लक्षणीय संख्या असणाऱ्या पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सुधारत आहे. येत्या काही महिन्यात मनोर येथे २०० खाटांचे ट्रॉमा केअर सेंटर तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय सुरू होण्याच्या स्थितीत असून जव्हार येथे २०० खाटांचे रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित आहे.

कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा तसेच अद्ययावत यंत्रसामुग्री उपलब्ध झाल्याने रुग्णांच्या आरोग्य सेवेचा दर्जा उंचावला आहे. या प्रक्रियेत जिल्हा आरोग्य विभागाला राष्ट्रीय प्रकल्प, राष्ट्रीय बँका, उद्योग समूह तसेच सामाजिक संस्थांचे मोठ्या प्रमाणात पाठबळ लाभले असून आरोग्य व्यवस्था बळकटीकरण करण्याच्या प्रक्रियेतील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.

पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली त्यावेळी या भागात कुपोषणामुळे मोठ्या प्रमाणात बालमृत्यू होत असल्याचे दिसून आले होते. सन २०१७ मध्ये ६०३ अतितीव्र कुपोषित व ३३६२ मध्यम तीव्र कुपोषित अशी ३९६५ कुपोषित बालके होती. आरोग्य यंत्रणांनी बालकांची नियमित तपासणी, गरोदर व स्तनदा मातांना पोषण आहार, स्थलांतरित कुटुंबासाठी आरोग्य शिबीर व इतर उपाययोजनांचे आयोजन तसेच अशा व अंगणवाडी सेविकांकडून माता बालसंगोपन व्यवस्था बळकटीकरण केल्याने सद्यस्थितीत ५८५ अति तीव्र व ७३२ मध्यम तीव्र कुपोषित बालके इतकी संख्या कमी झाली आहे.

याचबरोबर माता मृत्यूचा दर नियंत्रणात आला असून ९९.९१ टक्के संस्थात्मक प्रसूती होत असल्याचे दिसून आले आहे. कुटुंब कल्याण कार्यक्रम तसेच असंसर्ग आजार नियंत्रण कार्यक्रमात जिल्हा राज्यात अव्वल स्थानी असून सात लाख पेक्षा अधिक नागरिकांची सिकलसेल साठी तपासणी करण्यात आली आहे. क्षयरोग मुक्त पालघर करण्यासाठी जिल्ह्यात अनेक उपक्रम राबवले जात असून या सर्वांमध्ये सामाजिक संस्थांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे.

सिकलसेल, हिमोफिलिया तसेच थैलेसिव्हिया यांचे निदान करण्यासाठी हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरीसिस या यंत्राची तपासणी करिता आवश्यकता होती. शासनाकडून असे यंत्र उपलब्ध करून घेण्यास अनेक तांत्रिक अडचणी समोर येत असल्याने सामाजिक संस्थांच्या मदतीने प्रथम दोन उपकरणे जिल्ह्यात उपलब्ध करून घेण्यात आली.

त्यामुळे सिकलसेलच्या निदानादरम्यान ४९२ बाधित रुग्ण तसेच साडेसात हजार या आजाराचे वाहक असल्याची माहिती पुढे आली आहे. या निदानामुळे १२ हजार पेक्षा अधिक नागरिकांची पुढील चाचणी करण्यात येणार असून त्यांना या आजारा संदर्भात समुपदेशन करून पुढील आयुष्यात आवश्यक काळजी घेण्याबाबत सतर्क केले जाणार आहे. त्याचबरोबर रक्त तपासणीसाठी आवश्यक संच काही सामाजिक संस्थांनी उपलब्ध करून दिल्याने तपासणी प्रक्रिया जिल्ह्यात एकाच वेळी राबविता आली.

पालघर जिल्ह्यात क्षयरोगाचे प्रमाण लक्षणीय असताना अशा रुग्णांना शासकीय आरोग्य संस्थेत तपासणी करण्यासाठी आणण्यात अनेक अडचणी येत असत. मुळात रुग्ण हे आरोग्य केंद्रात जाण्यास निरुत्साही असल्याने तसेच एक्स-रे मशीन, एक्स-रे टेक्निशियन यांच्या उपलब्धतेचा प्रश्न असल्याने या आजारावर नियंत्रण ठेवणे कठीण झाले होते.

अशावेळी प्रायोगिक तत्त्वावर पोर्टेबल हँडहोल्ड एक्स-रे मशीन अशाच सामाजिक संस्थांकडून प्राप्त झाल्याने त्यामुळे गावा पाड्यातील संशयित रुग्णांचे क्षयरोगासाठी निदान करणे सहज व सोपे होऊन रुग्णांवर तातडीने उपचार सुरु करता येणे शक्य झाले आहे. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जिल्हा आरोग्य विभाग अशा प्रकारचे १५ एक्स-रे मशीन घेणार असून त्यामुळे आरोग्याच्या आठ विभागात असे पोर्टेबल एक्स-रे मशीन उपलब्ध करून प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत गावनिहाय रुग्णांची तपासणी करणे शक्य होणार आहे.

काही संस्था क्षय रुग्णांना पौष्टिक आहार देत असून काही संस्थांनी क्षय रुग्णांच्या संपूर्ण कुटुंबीयांना पौष्टिक आहार देण्याचे काम करीत आहेत. काही संस्थांकडून हिमोग्लोबिन तपासणी किट पुरविणे, सिकलसेल प्राथमिक तपासणी किट पुरवणे, गरोदर मातांची नियमित तपासणी करणे, स्वास्थ रक्षक दांपत्य संकल्पना राबवून दुर्गम भागातील गावांमधील कुटुंबाच्या आरोग्यावर देखरेख ठेवणे, त्यांना सल्ला देण्याची काम करीत आहेत. याखेरीज अनेक संस्था वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करून आरोग्य क्षेत्रात शासकीय व्यवस्थेला पाठबळ देण्याचे काम देखील करताना दिसून येत आहेत.

नागरिकांची तपासणी, औषधोपचार व पाठपुरावा करण्यासाठी देखील संस्थांची मदत असून काही संस्थांनी रुग्णवाहिका व आरोग्य संस्थामधील
पायाभूत सुविधांचा स्तर उंचावणे, आरोग्य विभागात उपकरणे उपलब्ध करून देण्यास मदत केली आहे. तर इतर काही संस्थांनी आरोग्य कर्मचाऱ्यांची क्षमतावृद्धी करण्यास विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवले असून त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत.

सामाजिक संस्था या त्यांनी निवडलेल्या क्षेत्रामध्ये काम करताना दिसून येत असून जिल्हा प्रशासन अशा संस्थांमध्ये समन्वय साधून दुर्गम भागात व आवश्यकता असणाऱ्या ठिकाणी आरोग्य सेवा पुरवण्यासाठी प्रयत्नशील आहे. सामाजिक संस्थांचे काम अधिक प्रभावी ठरावे तसेच एका क्षेत्रात दुबार कामे होऊ नये या दृष्टीने सामाजिक संस्थांच्या कामांची नकाशांकन (मॅपिंग) होणे तसेच समन्वयासाठी नोडल अधिकारी नेमणे आवश्यक झाले आहे. नागरिकांची तपासणी, औषधोपचार करण्यासोबत विविध आजारांविषयी जनजागृती करण्यास देखील जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या बँका, उद्योग समूह, सामाजिक संस्था यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन जिल्हा परिषदेने ३० पेक्षा अधिक संस्थांचा गौरव केला आहे.