पालघर : पालघर जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा दर्जा सुधारत असताना काही अपवादात्मक घटनांमध्ये माता अथवा बाल मृत्यू होण्याचे प्रकार घडत आहेत. गर्भवती महिला तसेच पाच वर्षांपर्यंत असणाऱ्या बालकांवर नियमित लक्ष ठेवण्यासाठी तसेच माता बाल संगोपन यंत्रणा सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषदेने आरोग्य सनियंत्रण कक्ष कार्यरत केला आहे. यामुळे काही प्रसंगी दुर्लक्षित राहणाऱ्या माता, बालक अथवा कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून होणारा हलगर्जीपणा, नकळतपणे होणारे दुर्लक्ष व त्यामुळे घडणाऱ्या अप्रिय घटनांवर आळा बसेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी प्रतिपादन केले.

जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील आरोग्य सेवेत योगदान देणाऱ्या २५ पेक्षा अधिक बँक, उद्योग, सेवाभावी संस्था यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मनोज रानडे उपस्थित होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त अधिकारी सचिन कवठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटराव हुंडेकर, शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत साळुंखे, डॉ. वैदेही माळवी, सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

पालघर जिल्ह्यात ९९.९१ टक्के संस्थात्मक प्रसूती होत असल्याबद्दल मनोज रानडे यांनी समाधान व्यक्त केले. मात्र कमी वयात लग्न होत असल्याने २५- २६ वर्षापर्यंत संबंधित माता तिसऱ्या चौथ्या खेपेला गरोदर राहत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. जिल्ह्यात कुटुंब कल्याण नियोजन कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्हा आरोग्य यंत्रणेत असलेल्या त्रुटींचा अभ्यास करण्यात आला असून त्या भरून काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध होत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच जिल्हा परिषदेच्या सेस निधीमधून अशा कामांसाठी भरीव तरतूद होत असल्या कडे त्यांनी लक्ष वेधले.

अशा परिस्थितीत माता बालसंगोपन दरम्यान अधिकारी कर्मचाऱ्यांकडून अधिक सूक्ष्म नियोजन व दक्षता घेतली गेल्यास जिल्ह्याचा नावलौकिक कायम राखला जाईल असे त्यांनी प्रतिपादन केले. पुढील वर्षापर्यंत जिल्ह्यातील सर्व तरुण मुलींची हिमोग्लोबिन पातळी राखण्याच्या दृष्टीने रक्त तपासणी करून त्यांना सक्षम माता बनवण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रयत्नशील राहील असेही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले. आरोग्य विभागात शासकीय यंत्रणे सोबत सामाजिक संस्थेचे योगदान अधोरेखित करत आरोग्य विभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांनी प्रास्ताविक करताना कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया तसेच असंसर्ग आजार नियंत्रणात जिल्हा राज्यात अव्वल असल्याची माहिती दिली. जिल्ह्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच २८ उपकेंद्र यांनी राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमात राष्ट्रीय मानांकन प्राप्त केले असून २०२८ पर्यंत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय मानांकन प्राप्त होईल यासाठी योजनेची आखणी केल्याचे सांगितले. जिल्ह्यातील ७.०९ लक्ष नागरिकांची सिकल सेल तपासणी होऊन त्यापैकी ४९२ नागरिकांना या आजाराचे निदान झाले असून ७७२३ नागरिक या आजाराचे वाहक असल्याचे तपासणी दरम्यान आढळून आले आहे. सिकलसेल रुग्ण कुपोषित होऊन त्यांचा मृत्यू होऊ नये तसेच या आजाराचा अनुवंशिक प्रसार होऊ नये यासाठी समुपदेशन करण्याचे कार्य सुरू असल्याची माहिती दिली. जिल्ह्यात बिरसा मुंडा वैद्यकीय सहाय्यता निधी मधून २३ अति गंभीर झालेल्या माता बालकांना विनामूल्य उपचार दिले गेल्याची माहिती सांगत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करत आरोग्य विभागाचे विकसित मॉडेल तयार करू असा आशावाद व्यक्त केला.

याप्रसंगी जिल्हा आरोग्य यंत्रणेला विविध उपक्रमांद्वारे मदत व सहकार्य करणाऱ्या बँका, उद्योग समूह, वैद्यकीय संस्था, सामाजिक संस्था तसेच वैद्यकीय अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.

आरोग्य सनियंत्रण कक्षाची कार्यपद्धती

जिल्हा प्रशासनाने काही वर्षांपासून पावसाळ्याच्या कालावधी दरम्यान गर्भवती माता व बालकांवर उपचार करण्याच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करीत असत. याच आपत्ती व्यवस्थापन कक्षाला बारामाही सुरू ठेवून गरोदर माता व पाच वर्षांपर्यंत असणाऱ्या बालकांच्या आरोग्य संदर्भात उद्भवणाऱ्या समस्या समजून त्यांना वेळीच उपचार देणे व आवश्यकता भासल्यास त्यांना संदर्भीय आरोग्य सेवा पुरवणे, १०८ अथवा १०२ ची रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे तसेच माता व बालकांची प्रकृती चांगली राखण्यासाठी देखरेख ठेवण्याची व्यवस्था या कक्षामार्फत केली जाणार आहे. गरोदर मातांना प्रसूतीसाठी जाताना तसेच प्रसूती पश्चात घरी परततात वाहतूक व्यवस्था पुरवणे, इतर अडचणी संदर्भात देखरेख ठेवून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी हा कक्ष कार्यरत राहणार आहे. पाच वर्षा पलीकडील बालके शिक्षणाच्या प्रवाहात येतील यासाठी देखील या कक्षाने प्रयत्न करावेत ही अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करण्यात आली.