पालघर : पालघर तालुक्यात सन २०१६ पासून उभारणी सुरू असणारे मनोर जवळील ट्रॉमा केअर सेंटर तसेच दोन वर्षांपासून सुरू असणारे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे कामकाज निधी अभावी रखडले असताना पालघर आरोग्य पथकाच्या श्रेणीवर्धन अंतर्गत १०० खाटांचे ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण व अग्रीम संशोधन संस्थेच्या इमारतीचे बांधकाम निधी अभावी रखडले आहे. यामुळे शहरातील प्रसूती, वैद्यकीय उपचार व बाल उपचार केंद्रांच्या उभारणीला विलंब होणार आहे.
ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे. जे. समूह रुग्णालय, मुंबई यांच्या अधिपत्याखाली आरोग्य पथक (हेल्थ युनिट) पालघर येथे कार्यरत होते. या आरोग्य संस्थेची इमारत धोकादायक झाल्याने या संस्थेचे श्रेणीवर्धन करून १०० खाटांचे रुग्णालय व प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या दृष्टीने वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने मार्च २०२४ मध्ये २८.७० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता दिली. त्यानंतर इमारतीच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने २१.४१ कोटी तर विद्युत कामासाठी ३.१८ कोटी रुपयांच्या तांत्रिक मान्यता प्राप्त झाली.
या आरोग्य पथक इमारतीमध्ये तळमजल्यासह चार मजल्यांच्या इमारतीचे बांधकाम करण्यात येणार असून त्या अंतर्गत ७०२३ चौरस मीटर बांधकाम करण्यात येणार आहे. या कामाचा कार्यारंभ आदेश १३ ऑक्टोबर २०२५ मध्ये देण्यात आला असून हे काम बारा महिन्यात म्हणजे १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे. या चार मजली इमारतीमध्ये बाह्यरुग्ण विभाग, आपत्कालीन विभाग, प्रसूती, पुरुष व महिलांसाठी उपचार विभाग, अतिदक्षता विभाग, शिशु व बालक विभाग यांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत या आरोग्य संस्थेच्या इमारतीच्या २७२ पाईल फाउंडेशनचे काम पूर्ण झाले असून एकूण कामाच्या १५ टक्के काम झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त झाली आहे. इमारतीच्या एकूण खर्चापैकी सद्यस्थितीत ३.१५ कोटी रुपये रकमेचे काम पूर्ण झाले असले तरी निधी अभावी कामाची गती निविदेस शर्ती प्रमाणे राखण्यास कंत्राटदाराने असमर्थता दर्शवली आहे. यामुळे तालुक्यातील इतर आरोग्य संस्था प्रमाणेच पालघर आरोग्य पथक अंतर्गत १०० खाटांच्या रुग्णालयाचे काम रेंगाळले अशी परिस्थिती आहे. या आरोग्य केंद्राच्या उभारणी साठी निधी उपलब्ध व्हावा यादृष्टीने शासनाकडे पाठपुरावा सुरु असल्याची माहिती सहयोगी प्राध्यापक तथा पालघर आरोग्य पथकाचे प्रभारी अधिकारी डॉ. राकेश वाघमारे यांनी लोकसत्ता ला सांगितले.
हेल्थ युनिटमधील क्लिनिकल सेवांचा विस्तार
जे. जे. रुग्णालय, मुंबई यांच्या सहकार्याने हेल्थ युनिट पालघरमध्ये क्लिनिकल सेवांचा विस्तार, स्वतंत्र ऑपरेशन थिएटर व व्यापक क्षेत्रीय आरोग्य मोहिमेची आखणी विकसित महाराष्ट्र २०४७ अंतर्गत ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि सर जे. जे. समूह रुग्णालय, मुंबई यांच्याशी संलग्न असलेल्या हेल्थ युनिट पालघर (ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र) येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने ग्रामीण रुग्णालय, पालघरमार्फत क्लिनिकल सेवांचा विस्तार करण्यात येत आहे. सर जे. जे. रुग्णालयाच्या तांत्रिक आणि वैद्यकीय मार्गदर्शनाखाली येथे दैनंदिन आरोग्य सेवा पुरवल्या जाणार असून त्यामध्ये आपत्कालीन प्रसूती व नवजात शिशू सेवा, नियोजित व आपत्कालीन शस्त्रक्रिया तसेच बालरुग्णांसाठी अंतर्गत उपचार सेवा यांचा समावेश असेल. यामुळे ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये दर्जेदार आरोग्य सेवा अधिक जवळ पोहोचणार आहेत. सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा रेसिडेन्सी कार्यक्रमांतर्गत (DRP) पदव्युत्तर निवासी डॉक्टरांची नियुक्ती केली जात असून शस्त्रक्रिया, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र, बालरोग आणि भूलतज्ज्ञ विभागांमध्ये पूर्णवेळ वरिष्ठ निवासी डॉक्टरही नियुक्त केले जाणार आहेत.
४४० स्वतंत्र शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर चा प्रस्ताव
हेल्थ युनिट पालघर येथे सर जे. जे. रुग्णालय, मुंबई यांच्या सहकार्याने शस्त्रक्रिया आणि अस्थिरोग रुग्णांसाठी स्वतंत्र ऑपरेशन थिएटर उभारण्याचा प्रस्ताव आहे. या सुविधेमध्ये मोतीबिंदू आणि इतर नेत्रशस्त्रक्रिया, हर्निया, हायड्रोसील, लिपोमा व सिस्ट काढण्याच्या शस्त्रक्रिया तसेच निवडक अस्थिरोग शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. सर जे. जे. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक नियमित भेटी देऊन हेल्थ युनिटमधील निवासी डॉक्टर आणि परिचारिका यांच्या समन्वयाने या शस्त्रक्रिया पार पाडणार आहे.
व्यापक समुदाय आरोग्य जनजागृती आणि सेवा मोहीम
जिल्हाभर व्यापक क्षेत्रीय आरोग्य सेवा मोहीम राबविण्यात येत असून प्रतिबंधात्मक आणि समुदाय आधारित आरोग्य सेवांवर विशेष भर दिला जात आहे.
अंगणवाडीतील बालकांसाठी आरोग्य तपासणी, रक्तक्षय निदान आणि वाढ मापन गर्भवती व प्रसूतीनंतरच्या मातांसाठी आरोग्य सेवा तसेच उच्च-जोखमीच्या गर्भधारणेची ओळख आणि व्यवस्थापन आदिवासी भागांमध्ये सिकल सेल रोगासाठी व्यापक तपासणी मोहीम शालेय विद्यार्थी आणि आश्रमशाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिरे या सर्व उपक्रमांची अंमलबजावणी हेल्थ युनिट पालघर आणि जिल्हा आरोग्य विभागाच्या संयुक्त सहकार्याने केली जाणार आहे.
विकसित महाराष्ट्र २०४७ साठी आरोग्य आराखडा
पालघर जिल्ह्याने ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ अंतर्गत आरोग्य क्षेत्रासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात आर्थिक वर्ष २०२६-२७ ते २०२९-३० पर्यंतचे टप्प्याटप्प्याने उद्दिष्टे, मोजता येण्याजोगे कार्यप्रदर्शन निर्देशांक आणि विविध निधी स्रोतांचा समावेश असलेली वित्तीय रणनीती नमूद करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा नियोजन आणि विकास समिती, राज्य शासन निधी, JICA सहाय्य, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री सहायता निधी, पालघर आणि सीएसआर भागीदारी यांचा समावेश आहे.
समतोल आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेसाठी कटिबद्धता
हे सर्व उपक्रम एकत्रितपणे पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेतील गेल्या काही वर्षांतील सर्वात व्यापक सुधारणांपैकी एक मानले जात आहेत. ग्रामीण आणि आदिवासी भागांतील प्रत्येक नागरिकाला सुलभ, दर्जेदार आणि समतोल आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या राज्य शासनाच्या वचनबद्धतेची ही पुनःप्रचिती असून ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या व्यापक उद्दिष्टांना देखील यामुळे बळकटी मिळणार आहे.
