पालघर: जिल्ह्यात दर्जेदार आरोग्य सेवा देताना त्यांचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्याचबरोबरीने रुग्णांना संपर्कासाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत. वैद्यकीय व रक्त तपासणीसाठी तालुका स्तरावर असणाऱ्या प्रयोगशाळा अद्ययावत करण्यात आल्या असून नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यांच्या इमारती देखील नव्याने उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील अनेक दुर्गम गावांना भेडसावणारी भौगोलिक आव्हाने लक्षात घेऊन, प्रशासनाने माता व बाल नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) प्रणाली कार्यान्वित केली आहे. जिल्हा, तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील नियंत्रण कक्ष संपूर्ण जिल्ह्यातील गर्भवती महिला आणि नवजात बालकांवर सक्रियपणे लक्ष ठेवून आहेत. उच्च जोखीम असलेल्या (हाय-रिस्क) गरोदरपणावर लक्ष ठेवणे, वेळेवर वैद्यकीय उपचार सुनिश्चित करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना पुढील उपचारांसाठी पाठवणे (रेफरल) यांत या सुविधा महत्त्वाची भूमिका बजावली जात आहे.
देखरेख आणि प्रतिसाद क्षमता सुधारण्यासाठी, राष्ट्रीय आरोग्य अभियाना’ंतर्गत अतिरिक्त कॉल ऑपरेटर्स आणि डेटा एन्ट्री कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. तसेच, कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी आणि आरोग्य संस्थांमधील समन्वय सुधारण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार केल्या जात आहेत.
प्रशासन संपूर्ण जिल्ह्यात निदान आणि आरोग्यसेवा पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. प्रगत ‘टीबी नॅट’ निदान यंत्रे आणि डिजिटल क्ष- किरण सुविधांसाठी प्रस्ताव तयार केले जात आहेत. त्याचबरोबर, आरोग्य संस्थांमधील पायाभूत सुविधांची कमतरता दूर करण्यासाठी आणि ‘राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानके’ प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांना मदत दिली जाईल. महाराष्ट्र दिन आणि स्वातंत्र्यदिन यांसारख्या राष्ट्रीय प्रसंगी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्था, आरोग्य कर्मचारी आणि राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानके मार्गदर्शक यांचा गौरव केला जाईल.
तालुका स्तरावर आवश्यक होणार रक्त चाचण्या
सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रसूती दरम्यान असणाऱ्या बहुतांश चाचण्या होत असून काही विशिष्ट रक्तांच्या तपासणी करिता खाजगी संस्थांची मदत घ्यावी लागत असे. यावर तोडगा म्हणून तालुका स्तरावरील प्रयोगशाळा अद्ययावत करण्यात आल्या असून त्यामध्ये नव्याने दोन प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅब टेक्निशियन) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक तालुका सहज हाताळणी करण्याजोगे असणारे पोर्टेबल एक्स-रे मशीन उपलब्ध करून देण्यात आले असून त्याच्या आधारे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये क्षयरोग व इतर आजारांचे निदान करणे शक्य होणार आहे.
तालुकास्तरावर बायोकेमिस्ट्री, हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसीस, यकृताच्या संबंधित लिव्हर फंक्शन टेस्ट तसेच क्षय रोगाच्या निदानासाठी असणाऱ्या इतर उच्च रक्त तपासण्यासाठी सुविधा करण्यात आली आहे. या तालुकास्तरीय प्रयोगशाळेसाठी व त्यासाठी लागणाऱ्या उपभोग वस्तूंच्या खरेदीसाठी सव्वातीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती देण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुधारणा
सध्या जिल्ह्यात ४६ प्राथमिक आरोग्य केंद्र असून २२ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र प्रस्तावित करण्यात आली आहेत. अधिकतर नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र ही पालघर, बोईसर, डहाणू व वाडा परिसरात उभारण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी जागेची उपलब्धता तपासणी जात आहे. या कामी समन्वय साधण्यासाठी निवृत्त नायब तहसीलदार व्यक्तीची यांची प्रशासकीय अधिकारी पदी नेमणूक करण्यात आली असून ग्रामपंचायत तिकडे जागा उपलब्ध नसल्यास वनविभागाकडून जागेच्या उपलब्धतेसाठी पाठपुरावा केला जाणार आहे. या शिवाय धानिवारी, पारगाव, व धुंदलवाडी येथील प्री – फॅब आरोग्य केंद्राची उभारणी पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली
- वैद्यकीय आपत्ती नियंत्रण कक्ष (जिल्हा परिषद) : ८८५६४५४७४७
- जिल्हा नियंत्रण अधिकारी (शल्य चिकित्सक) :
- ९०९६४६८५०० (डॉ. प्रभाकर भोये)
- ७२०८५५२२३६ (डॉ. उमेश सुरळकर)
